प्रदेश काँग्रेस कार्यकारणीवर यंदा नगरचे चार जण

पक्षाचे महासचिव खासदार के. सी. वेणूगोपाल यांनी काल नवी दिल्ली येथील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयातून नव्या कार्यकारिणीची घोषणा केली.
congress.jpg
congress.jpg

अहमदनगर ः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनायक देशमुख यांना सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. अशी संधी मिळालेले ते अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव पदाधिकारी ठरले आहेत. नवीन प्रदेश कार्यकारणीत यंदा जिल्ह्यातील चारच जणांना पदे मिळाली आहेत. तसेच प्रदेश सरचिटणीसपदी उत्कर्षा रुपवते यांचीही निवड जाहीर करण्यात आली आहे. यात काँग्रेसचे माजी अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण व सचिन गुंजाळ यांना सचिव पदाची संधी मिळाली आहे. यातील रुपवते मूळच्या नगरमधील असल्या तरी त्या सध्या मुंबईतच राहतात.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या मान्यतेने पक्षाचे महासचिव खासदार के. सी. वेणूगोपाल यांनी काल नवी दिल्ली येथील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयातून नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. नव्या कार्यकारिणीत राज्यातून उपाध्यक्षपदी 18, सरचिटणीसपदी 65 तर सचिवपदी 104 व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली. या शिवाय 6 जणांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. 

हेही वाचा...

देशमुख यांची सलग दुसऱ्यांदा प्रदेश सरचिटणीस या पदावर नियुक्ती करण्यात आली. असा प्रकारे सलग दुसऱ्यांदा नियुक्ती मिळालेले ते जिल्ह्यातील एकमेव पदाधिकारी ठरले आहेत. मागील कार्यकारिणीत देशमुख व माजी आमदार नंदकुमार झावरे हे दोन सरचिटणीस होते. या वेळच्या कार्यकारिणीत जिल्ह्यातून केवळ विनायकराव देशमुख यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

देशमुख यांनी काँग्रेस संघटनेत प्रदीर्घ काम केले आहे. 1994 ते 1998 जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष, 1998 ते 2002 जिल्हा सरचिटणीस, 2002 ते 2004 जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष, 2004 ते 2009 जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, 2010 ते 2014 योजना सनियंत्रण समितीचे प्रदेशाध्यक्ष, 2016 ते आतापर्यंत प्रदेश सरचिटणीस व आजपासून पुन्हा प्रदेश सरचिटणीस पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. देशमुख सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाए संविधान या विशेष अभियानाचे राज्य समन्वयक आहेत.

हेही वाचा...

दीप चव्हाण हे अहमदनगर नगरपालिकेत माजी नगराध्यक्ष, महापालिकेतील माजी महापौर, अभ्यासू नगरसेवक म्हणून परिचित आहेत. त्यांच्याकडे काहीकाळ अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षपदाची धुराही होती. सचिन गुंजाळ हे पत्रकार आहेत. उत्कर्षा रूपवते यांच्याकडे प्रदेश सरचिटणीसपदा बरोबरच प्रदेश प्रवक्तेपदही देण्यात आले आहे. 

या चार नियुक्त्यांमुळे काँग्रेसने जिल्ह्यातील स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे. आमदार राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेसला खिंडार पडले आहे. ही स्थिती सुधारण्याचे मोठे आव्हान या चौघांसमोर असणार आहे. जिल्ह्यात लवकरच नगरपंचायत, विधान परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आहेत. यात पक्षाची स्थिती सुधारावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com