निघोजच्या दोन ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण - Two Gram Panchayat Members of Nighoj Kidnapped | Politics Marathi News - Sarkarnama

निघोजच्या दोन ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

सरपंचांची निवड अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना, सहलीवर गेलेल्या निघोज येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांचे धारदार शस्त्राचा धाक दाखवून अपहरण केल्याची घटना घडली आहे.

निघोज  : सरपंचांची निवड अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना, सहलीवर गेलेल्या निघोज येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांचे धारदार शस्त्राचा धाक दाखवून अपहरण केल्याची घटना घडली आहे.

रविवारी सहलीवर गेलेले हे सदस्य लघुशंकेसाठी खेड (जि. पुणे) परिसरात थांबले तेव्हा अज्ञात आठ ते दहा जणांनी या सदस्यांचे अपहरण केले. अपहरण झाले, की सदस्य स्वत: विरोधी गटात सामील झाले, याबाबत पारनेर तालुक्‍यात उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी 'बंद' पाळत निषेध व्यक्त केला.

निघोज ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. संदीप वराळ पॅनलला आठ, सत्ताधारी ग्रामविकास पॅनलला चार व महाविकास आघाडीला दोन, तर वाडी-वस्ती मंडळाला तीन जागा मिळाल्या. सोडतीत निघोज ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी जाहीर होताच महाविकास आघाडीच्या सुधामती कवाद यांनी पदावर दावा ठोकून, माजी सरपंच ठकाराम लंके यांच्या पुढाकारातून समविचारी नऊ सदस्यांना सहलीवर नेले. 

कोल्हापूर येथून देवदर्शन उरकून येताना खेडमधील रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या दिगंबर भागाजी लाळगे व गणेश दत्तू कवाद या दोन सदस्यांना शस्त्राचा धाक दाखवून अज्ञात दहा ते बारा जणांनी वाहनात बसवून पोबारा केला. या वेळी सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या सुधामती कवाद यांचे पती विठ्ठल कवाद यांना मारहाण करण्यात आली. पॅनलप्रमुख ठकाराम लंके यांनी खेड पोलिसांना माहिती दिली. खेड पोलिस ठाण्यात सचिन वराळ यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपहरण झाले, की स्वतःच गेले?
निघोजच्या सरपंचपदाची निवड अवघ्या दोन दिवसांवर आली असताना, सदस्यांचे अचानक अपहरण करण्यात आल्याची घटना आज घडली असताना, सहलीवर गेलेल्या काही सदस्यांच्या 'लोकेशन'वरूनच त्यांचा ठावठिकाणा लागल्याचे बोलले जाते. त्यामुळे या सदस्यांचे अपहरण झाले, की नाराज होऊन हे सदस्य गेले, याबाबत पारनेर तालुक्‍यात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख