टिळक भोसांनी केली श्रीगोंद्यातील शासकीय कार्यालयांतील स्वच्छतेची पोलखोल

टिळक भोस यांनी संभाजी ब्रिगेडचे श्रीगोंदे शहराध्यक्ष सतीश बोरूडे यांच्या समवेत हा व्हिडिओ केला.
टिळक भोसांनी केली श्रीगोंद्यातील शासकीय कार्यालयांतील स्वच्छतेची पोलखोल
shrigonda.jpg

अहमदनगर : देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014ला या अभियानाची दिल्लीत सुरवात केली होती. हे अभियान ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागात राबविले जात आहे. या अभियानावर कोट्यावधींचा खर्च होत आहे. या अभियानाचा खरच उपयोग होतो आहे का? तसेच श्रीगोंदे येथील पोलिसांनी श्रीगोंदे पोलिस ठाण्याचा चेहरा मोहरा बदलला असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली होती. या सर्व प्रकारावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून श्रीगोंदे शहरातील शनी चौकातील परिस्थिती सप्रमाण मांडली. हा व्हिडिओ आज राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

टिळक भोस यांनी संभाजी ब्रिगेडचे श्रीगोंदे शहराध्यक्ष सतीश बोरूडे यांच्या समवेत हा व्हिडिओ केला. यात शनी चौकातील तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय व पोलिस ठाणे यांच्या परिसरात कशी अस्वच्छता पसरली आहे हे दाखविले आहे. श्रीगोंदे पोलिस ठाण्याच्या भिंती लगतच कशी अस्वच्छता आहे याचा नमुनाच सादर करण्यात आला आहे. यात शासकीय बांधकामाचे अजब नमुनेही भोस यांनी दाखवत भाष्य केले आहे.

हेही वाचा...

भोस म्हणाले, देशभरासह श्रीगोंदे शहरातही नगरपरिषदेच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येते. त्यावर लाखो रुपये खर्च होतात. शासकीय कर्मचारी व कार्यालयांना शासकीय अभियान लागू नसते का? तलाठी कार्यालयाला डासांचा त्रास होत आहे. पोलिस निरीक्षक जरी पोलिस ठाण्याचा चेहरा मोहरा बदलला असल्याचे सांगत असले तरी वस्तूस्थिती अशी नाही. 

तलाठी कार्यालयाचे बांधकाम निकृष्ठ झाले आहे. या कार्यालयाच्या भिंती जवळ पायऱ्या आहेत. त्या जिथे संपतात तेथे दरवाजाच नाही. केवळ भिंत आहे. मग या पायऱ्या ठेवल्या कशाला. हा सगळा बांधकामाचा अजब नमुना आहे. 

हेही वाचा...

श्रीगोंदे पोलिस ठाण्याचा बदललेला चेहरा श्रीगोंदे पोलिसांनी दाखविला. पण ती केवळ एकच बाजू आहे. वस्तूस्थिती नाही. पोलिस ठाण्याच्या समोर पेविंग ब्लॉक बसविण्यात आले. पूर्वी वृक्ष लावलेले खड्डे पुन्हा खोदून त्यात वृक्ष लावली आहेत. श्रीगोंदे पोलिसांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांनाच वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची फसवणूक केली आहे. पोलिस ठाण्यातील कैद्यांच्या बराकीच्या खिडकी जवळ ड्रेनेजचे पाणी साचले आहे. त्यामुळे साथीचे रोग पसरत आहेत. उपचारावर नागरिकांचे पैसे खर्च होत आहेत. डॉक्टरांचे मजलेच्या मजले उभे राहत आहेत. या अस्वच्छतेमुळे लोक आजारी पडल्यास त्यांची जबाबदारी पोलिस घेतील का, असा प्रश्नच भोस यांनी पोलिसांना विचारला आहे.

या अडगळीच्या जागा प्रशासनाने स्वच्छ कराव्यात. त्या जागांत पार्किंग ठेवावे. त्यातून श्रीगोंद्यातील पार्किंगची समस्या सुटेल, असा सल्लाही भोस यांनी दिला आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in