उधळलेल्या बैलांना वेसन घालण्याची गरज - चित्रा वाघ

भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज पारनेर येथे जाऊन तहसीलदार ज्योती देवरे यांची भेट घेऊन चर्चा केली.
उधळलेल्या बैलांना वेसन घालण्याची गरज - चित्रा वाघ
chitra wagh 3.jpg

अहमदनगर ः पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा ऑडिओ राज्यभर व्हायरल झाला होता. यात त्यांनी लोकप्रतिनिधी व महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. या संदर्भात भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज पारनेर येथे जाऊन तहसीलदार ज्योती देवरे यांची भेट घेत चर्चा केली. तसेच अहमदनगरमध्ये येऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.


पत्रकार परिषदेत चित्रा वाघ म्हणाल्या, पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांना लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी त्रास दिल्यावर त्याचा उद्रेक ऑडिओ क्लिपमधून झाला. ही क्लिप मी किमान 50 वेळा ऐकली. ही क्लिप राज्यातील सर्व महिलांनी नक्कीच ऐकली असेल. देवरे रडणाऱ्या नाहीत. लढणाऱ्या, भिडणाऱ्या आहेत. महिलेची कोंडी करायची, लोकप्रतिनिधी समोर झुकवायला लावायचे, ही प्रवृत्ती योग्य नाही. मी देवरे यांना भेटले. त्या मानसिकदृष्ट्या सावरल्या आहेत. मात्र लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. 

हेही वाचा...


हे महाराष्ट्रात घडते आहे. तालिबानपेक्षा येथे काही वेगळे होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, रमाई यांच्या नावाचा उल्लेख आता केवळ भाषणांत उरला आहे. महिला सशक्तिकरण आचे नाव घेणाऱ्या पक्षातीलच आमदाराने असे वागणे कितपत योग्य आहे. या आमदाराला महिलांना शिव्या देण्याचा अधिकार कुणी दिला. शासकीय महिला कर्मचाऱ्याला शिव्या देतात हे कितपत योग्य आहे. राज्यात 500 पेक्षाही जास्त महिला तहसीलदार आहेत. त्यांना मी कधी भेटले नाही पण त्यांचे मेसेज येत आहेत. तमाम तहसीलदारांचा ज्योती देवरे या आवाज आहेत.


या प्रकरणी मुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे. प्रांत अधिकारी सुधाकर भोसले यांनी लोकप्रतिनिधींचे ऐका नाही तर एट्रोसिटी दाखल होईल, असे सांगणे हे गंभीर नाही का. पोलिस अधीक्षका समोरच महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व एका कर्मचाऱ्याला मारहाण होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही. कारण देवरे जिवंत आहेत. ती मरायला हवी होती तरच गुन्हा दाखल झाला असता का, असा उद्विग्न सवाल वाघ यांनी उपस्थित केला. तसेच पोलिस अधीक्षक बळप यांच्या निलंबनाची मागणी केली.


जिवंत बाईच्या बोलण्याला काही किंमत नाही. जिल्हा अधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्याकडे बोलण्यासारखे काहीच नाही. ते दीपाली चव्हाणसारखे मरणाची वाट पाहत आहेत काय. देवरे यांच्यावर 16 आरोप ठेवले. हा अहवाल लिक कसा झाला. सार्वजनिक झालेला अहवाल मी पहिल्यांदाच पाहिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना मी अहवाल लिक करणाऱ्यांची चौकशी केली का विचारले असता. चौकशी चालू आहे असे उत्तर मिळाले. आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खात आहे. आमदार लंके यांनी प्रशासनाला वेठीस धरले आहे काय?


देवरे यांच्यावरील आरोप महसूल विभाग ठरवेल. आमदारांना शिवीगाळ व मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला. आमदारांच्या शपथा घेऊन पोलिस विभागात नोकरी स्वीकारली काय. या घटनेवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रतिक्रिया द्यावीशी वाटली नाही, हे दुर्दैव आहे. परवा रक्षाबंधन होते. देवरे यांना घाबरू नको असे मुख्यमंत्री बोलले नाहीत.


अशा घटना सत्तेतील आमदारांविरोधातच का घडतात. सत्ता व पैशाचा माज चढला आहे. सत्तेच्या उधळलेल्या बैलांना वेसन घालण्याची गरज आहे. उधळलेल्या घोड्यांना लगाम घालायला हवा. संपूर्ण पोलिस यंत्रणा दावणीला बांधलेली आहे. महिला घाबरतात तेथे शिवशाही कसली. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणारे मुख्यमंत्री महिलांना संकटात टाकून आमदारांना वाचवित आहेत.


हा तर भ्याडपणा
मुंबईत गेल्यावर महसूलमंत्री थोरात यांना भेटणार आहे. त्यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. राज्यात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना बळ देण्याचे काम होत आहे. देवरे यांची तक्रार प्रातिनिधीक स्वरूपाची आहे. देवरे यांचा ऑडिओ येताच आमदारांचा व्हिडिओ येतो, संप करायला सांगितले जाते. याला भ्याडपणा म्हटले जाते. पुरूषार्थ नाही. एका महिलेला घाबरवता. भाजपची पूर्ण ताकद देवरेंच्या पाठीशी आहे. 


महिला आयोगाला अध्यक्ष द्यायला वेळ नाही
राज्य सरकारला महिला आयोगाला अध्यक्ष द्यायला वेळ नाही. राज्य सरकार व्यस्त आहे. त्यांच्या लेखी महिलांना महत्त्व नाही. राज्यात कोणत्या वाटाघाटी सुरू आहेत. मंत्री यशोमती ठाकूर यांनी आठ वेळा महिला आयोगाचे अध्यक्ष नेमण्याची फाईल सादर केली तरीही अध्यक्ष देण्यात येत नाहीत. राज्यातील महिलांनी आपल्या समस्या कोणाला मांडायच्या. मुख्यमंत्र्यांना महिलांचे प्रश्न महत्त्वाचे वाटत नाही का. तहसीलदार होणे म्हणजे कोणाच्या पायाला हात लावून मंत्रीपद मिळविण्या ऐवढे सोपे नाही.


त्रिसदस्य समितीच करते लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन
देवरे प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिसदस्य समिती स्थापन केली आहे. ही समितीच लोकप्रतिनिधींना सहकार्य करत आहेत. ही बाब मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितली. मिळालेले पुरावे मी महसूल मंत्र्यांना सादर करणार आहे. देवरेंच्या चौकशीसाठी राज्यस्तरीय समिती नेमावी.


इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी
निवृत्ती इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन महिला गांभीर्याने ऐकतात. तुम्ही समाजप्रबोधन करावे. एखाद्याला उपमा देणे योग्य नाही. इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in