Rohit Pawar says, I did not take any photo | Sarkarnama

रोहित पवार म्हणतात, 'मी एकही फोटो काढला नाही' 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 जून 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कर्जत-जामखेडमध्ये आपण अनेक वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. जामखेडला तर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले होते, पण प्रशासनाने योग्य नियोजन करुन जामखेड कोरोनामुक्त केले. शिवाय, कोरोनामुक्तीचा "जामखेड पॅटर्न' यानिमित्ताने उदयाला आला. याचे संपूर्ण श्रेय हे तेथील प्रशासन व लोकांच्या सहकार्याला आहे, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. 

पुणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कर्जत-जामखेडमध्ये आपण अनेक वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. जामखेडला तर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले होते, पण प्रशासनाने योग्य नियोजन करुन जामखेड कोरोनामुक्त केले. शिवाय, कोरोनामुक्तीचा "जामखेड पॅटर्न' यानिमित्ताने उदयाला आला. याचे संपूर्ण श्रेय हे तेथील प्रशासन व लोकांच्या सहकार्याला आहे, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. 

ते म्हणाले की, या दरम्यान, लोकांना अन्नधान्य, भाजीपाला, दूध या कशाचीही कमतरता पडणार नाही, याची दक्षता घेतली. रेशनकार्ड असलेले, नसलेले आणि गरजू यापैकी कोणीही उपाशीपोटी राहणार नाही, यासाठी गहू, तांदूळ, तेल, कांदे-बटाटे, डाळी, किराणा माल हे सर्व साहित्य पुरवले. यामध्ये स्वतः एकही फोटो काढला नाही. किंबहुना फोटो काढणे नाही तर लोकांच्या पोटाची सोय होणे महत्त्वाचे होते. म्हणून दिखावा व राजकारण जाणीवपूर्वक दूर ठेवत हे सर्व साहित्य प्रशासनाच्या ताब्यात देऊन कोणताही भेदभाव न करता त्याचे लोकांना वाटप करण्यास सांगितलं. म्हणून तर जामखेड कोरोनामुक्त करण्यात यश आले, असे मी म्हणेन. 

कोरोनामुक्त मतदारसंघ केल्यानंतर बाहेरून होणारा कोरोनाचा संसर्ग रोखणे, हे आमच्यापुढे एक आव्हान होते. कारण लॉकडाउन शिथिल होत असल्यामुळे पुणे-मुंबई सारख्या कंटेनमेंट भागातून अनेक लोक गावाकडे येत होते. आतापर्यंत त्यांना आपापल्या गावातील शाळेत क्वारंटाइन केले जात होते. पण तिथे लाईट, स्वच्छता, जेवण, टॉयलेट अशा तक्रारी काही ठिकाणांवरून आल्या. त्यामुळे लोक स्वतःहून क्वारंटाइन न होता गपचूप घरी निघून जात होते. यामुळे त्यांच्या कुटुंबाला व इतरांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण होतो, असे रोहित पवार यांनी सांगितले. 

ते म्हणाले की, ही बाब लक्षात घेऊन यातून मार्ग काढण्यासाठी कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्‍यात मध्यवर्ती क्वारंटाइन सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. तिथे स्वतंत्र टॉयलेट, जेवणाची सुविधा पुरवण्यात येत आहे. हा एक पहिलाच प्रयोग आहे, पण तिथं क्वारंटाइन केलेल्या लोकांसाठी सर्व सुविधा पुरवत आहोत. याचा तिहेरी फायदा होणार आहे. 

"सेवा हा सर्वांत मोठा धर्म असतो. त्यामुळे यानिमित्ताने लोकांची सेवा करण्याची संधी मिळेल, दुसरे म्हणजे कर्जत-जामखेड मतदारसंघात कोरोनाला प्रतिबंध घालण्यास मदत होईल आणि तिसरा फायदा म्हणजे प्रशासनाला नियोजन करणेही सोयीचे होईल,' अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली. 

प्रांताधिकारी, तहसीलदार व अन्य अधिकाऱ्यांसोबत या सर्व ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. प्रशासनाला आवश्‍यक त्या सूचना दिल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख