नगरमधील रस्त्यांमुळे आमदार संग्राम जगताप ठरतायेत राज्यभरात टीकेचा विषय

शहरातील रस्त्यांच्या दुरवस्तेवरून आमदार संग्राम जगताप हे सोशल मीडियावर टीकेचा विषय ठरत आहेत.
amc.jpg
amc.jpg

अहमदनगर : अहमदनगर शहर हे महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेले महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळे या शहरातून राज्यातील महत्त्वाचे महामार्ग जातात. या शिवाय अहमदनगर जिल्ह्याच्या जवळ पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर सारखे महत्त्वाचे जिल्हे आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. हेच नगरी रस्ते राज्यभर वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध झाले आहेत. अहमदनगर महापालिकेत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. यापूर्वीही सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस होते. त्यामुळे शहरातील रस्त्यांच्या दुरवस्तेवरून आमदार संग्राम जगताप हे सोशल मीडियावर टीकेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे आमदार संग्राम जगताप व अहमदनगर शहराची प्रतिमा मलिन होत आहे. Roads in Ahmednagar make MLA Sangram Jagtap a subject of criticism across the state

अहमदनगर शहरात महापालिका आहे. मात्र येथील रस्ते ग्रामपंचायतीला शोभतील असे झाले आहेत. महापालिकेकडून ऐन पावसाळ्यात रस्ता पॅचिंगची कामे काढली जातात. त्यामुळे रस्त्यांचे पॅचिंगही अधिक काळ टिकत नाही. मात्र हे शहरातील हे रस्ते खराब होण्याची कारणे वेगळीच आहेत. शहरातील रस्त्यांचे फोटो व व्हिडिओ नागरिक सोशल मीडियावर टाकून खिल्ली उडवित आहेत. सोशल मीडियावर नगरच्या या रस्त्यांची राज्यभर चेष्टा होत आहे. यातून ऐतिहासिक नगर शहराची प्रतिमा मलिन होत आहे.

हेही वाचा...

केंद्र सरकारच्या अमृत भुयारी गटार योजनेतून शहरातील भुयारी गटार व मलःनिस्सारणासाठी 124 कोटींचा निधी मंजूर झाला होता. दोन वर्षांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. त्याला आता तीन वर्षे झाली तरीही काम केवळ 60 टक्के पूर्ण झाले आहे. मात्र या कामासाठी ठेकेदाराने शहरातील सर्व महत्त्वाचे रस्ते खोदून ठेवले आहेत. निविदा प्रक्रियेत खोदलेले रस्ते दुरुस्त करून देण्यास सांगितले होते. मात्र आज तागायत एकही रस्ता ठेकेदाराने दुरुस्त करून दिलेला नाही. शहरातील सर्व रस्ते दुरुस्तीसाठी निधी महापालिकेजवळ नाही. त्यामुळे रस्ते पॅचिंगची कामे महापालिकेने सुरू केली आहेत. 

महावितरणकडून शहरातील गणेश विसर्जन व मोहरम मार्गावरील विद्युत खांब काढून भुयारी विद्यत तारांचे काम हाती घेण्यात आले होते. त्यासाठी महावितरणने शहरातील मिरवणूक मार्गावरील रस्ते खोदले. हे रस्ते खोदल्या बद्दल महावितरणने महापालिकेला पैसेही दिले होते. मात्र अमृत भुयारी गटार योजनेची कामेच पूर्ण झालेली नसल्याने शहरातील रस्ते तयार करण्यास महापालिकेचा बांधकाम विभाग तयार नाही.

हेही वाचा...

अमृतच्या ठेकेदाराच्या कामाची मुदत संपूनही त्याला कामासाठी मुदतवाढ दिली जात आहे. या ठेकेदाराची बिलेही महापालिकेकडून दिली जात आहेत. महावितरणच्या भुयारी विद्युत तारांच्या कामात टक्केवारी मागितली जात असल्याने या कामाचाही निधी परत गेला आहे. त्यामुळे शहरात फसलेल्या योजनांचे खड्डे रस्त्यावर दिसत आहेत. 

राजकीय उदासिनता
शहरातील रस्ते खराब होण्यास जबाबदार असलेल्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची व शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी मोठा निधी आणण्याची मानसिकता अहमदनगर शहरातील आमदारांसह राजकीय नेते दाखव नाहीत. त्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्ता झाली आहे. ठेकेदारांकडून टक्केवारी मिळविण्यासाठी त्यांना पाठिशी घालण्याचे प्रकार महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून होत आहेत, अशा भ्रष्ट अधिकारी व उदासिन राजकीय नेत्यामुळे शहराच्या रस्त्याची दुरवस्ता झाली आहे. 

एवढेच रस्ते उरलेत चांगले
नगर शहरातील यश पॅलेस ते कोठी, बालिकाश्रम रस्ता, सर्जेपुरातील हत्ती चौक ते फलटण पोलिस चौकी रस्ता, अशोका हॉटेल ते नटराज चौक व जीपीओ चौक ते हतमपुरा चौक रस्ता एवढेच रस्ते शहरात सुस्थितीत राहिले आहेत. बाकी सर्व रस्त्यांची चाळण झाली आहे. 

धुळीचे शहर
रस्त्यांना जागोजाग खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्ड्यांतील माती वाहतुकीमुळे बाहेर येत आहे. यातच शहरातील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने जडवाहतूक शहरातून जात आहे. त्यामुळे शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. वाहनांची चाके उडवित असलेल्या धुळीचे लोट रस्त्यांवर दिसत आहेत. या धूळ व रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कल्याण रस्ता नक्की कोणाकडे
नगर-कल्याण रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झालेला असला तरी या रस्त्याचा नगर शहरातील भाग अजूनही राज्य महामार्गाकडे होता. तो वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम प्रलंबित आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com