देवरेंविरोधात महसूल कर्मचारी व तलाठी संघटना आक्रमक

पारनेर तहसील कार्यालयातील कर्मचारी व पारनेर तालुक्यातील तहसीलदार मंडलाधिकाऱ्यांनी देवरे यांच्या विरोधात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील महसूलचा कारभार ठप्प झाला आहे. तहसील कार्यालयाच्या दारातच हे आंदोलन सुरू झाले आहे
parner andolan.jpg
parner andolan.jpg

अहमदनगर ः तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप राज्यभर व्हायरल झाली. यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संघटनांनी देवरे यांच्या बाजूने मुख्यमंत्र्यांसह अनेकांना निवेदने दिली. मात्र प्रत्यक्षात देवरे यांच्या समवेत काम करणारे त्यांच्या हाताखालील कर्मचारीच आता देवरे यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

पारनेर तालुका महसूल कर्मचारी व तलाठी संघटनेने तहसीलदार देवरे यांच्यावर दडपशाहीचा आरोप करत चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना व मुख्य सचिवांना निवेदन दिले होते. दोन दिवसांपूर्वी संघटनेने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनाही मागणीचे निवेदन दिले होते. या निवेदनातून तहसीलदार देवरे यांची बदली करा अथवा आमच्या सर्वांच्या पारनेर तालुक्यातून बदल्या करा अशी मागणी करण्यात आली. मागणी पूर्ण होत नसल्याने पारनेर तहसील कार्यालयातील कर्मचारी व पारनेर तालुक्यातील तहसीलदार मंडलाधिकाऱ्यांनी देवरे यांच्या विरोधात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील महसूलचा कारभार ठप्प झाला आहे. तहसील कार्यालयाच्या दारातच हे आंदोलन सुरू झाले आहे.

हेही वाचा...

संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीगोंदा- पारनेर प्रांताधिकारी सुधाकर भोसले व पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी सर्व कर्मचारी यांची बैठका घेवून कोविड -19 च्या परिस्थितीमध्ये तालुक्यातील जनतेची ससेहोलपट होवू नये म्हणून आंदोलन स्थगित करण्याची कळकळीची विनंती केली होती. त्यांचे विनंतीस मान देवून व तत्कालीन कोविड-19 ची भीषण परिस्थिती पाहता चर्चा करून सर्व कर्मचारी यांनी तत्कालीन आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित केले होते. परंतु सदर तक्रार अर्जात नमुद बाबींची पुर्तता आजही झालेली नाही. लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 व कोव्हीड-19, सेल्टर कॅम्प मध्ये कर्मचारी यांनी स्वत: केलेला खर्च व ग्रामपंचायत निवडणूक 2020 मध्ये कर्मचा-यांनी स्वतःच्या खिशातून केलेला खर्च आजही अदा केलेला नाही.


वास्तविक पाहता तहसीलदार ज्योती देवरे यांचे महिलांविषयी व सर्व कर्मचारी वर्गाविषयीचे दडपशाहीचे धोरण व चुकीचे कामे करण्याचा दबाव टाकण्याची कार्यपध्दती, नियोजन शुन्य कारभार तसेच राजकीय दृष्ट्या सक्रीय होवून कारभार करणे आदी बाबींमुळे सर्व कर्मचारी वर्ग त्यांचे कारभारास वैतागलेला होता व आजही वैतागलेलाच आहे. आजही तहसीलदार ज्योती देवरे कर्मचाऱ्यांना सूड भावणेची वागणूक देतात त्याविषयी खालील बाबी आम्ही आपणासमोर अधोरेखीत करु इच्छितो.
कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथील संपत भागाजी आंधळे यांना गट नं. 67 मध्ये म.ज.म. अधिनियम 1966 चे कलम 42 ड नुसार रहिवास प्रयोजनासाठी सनद देण्यात आलेली होती. सदर सनद देताना मा. तहसिलदार पारनेर यांनी भूमी अभिलेख अथवा सहायक संचालक नगर रचना विभाग अहमदनगर यांचा अभिप्राय न घेता सनद दिली होती.

त्याअनुषंगाने उपोषणकर्ता अरुण आंधळे नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे उपोषणास बसल्यानंतर तहसीलदार यांनी कर्जुले हर्या सजेचे महिला तलाठी लता निकाळजे यांना कार्यालयात व घरी बोलावून सदर गट हा गावठाण हददीपासून 200 मीटरच्या परिघात येत नसताना देखील तसा दाखला देणेबाबत प्रचंड दबाव टाकला. त्यांची मानसिक संतुलन अतिशय खराब झाले होते. तसेच त्यांना दप्तर तपासणी करुन निलंबीत करण्याची धमकी देखील देण्यात आली. त्यानंतर त्यांची ऑडीट दप्तर तपासणी करण्यात आली. परंतु गंभीर स्वरुपात त्रूटी न आढळून आल्यानंतर तहसिलदार यांना पुढील कारवाई करता आली नाही. (सोबत दत्पर तपासणी फॉर्म जोडला असे.) तसेच तहसीलदार देवरे यांच्या दबावाला बळी न पडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आकसबुधीने वारंवार दप्तर तपासणी करून त्यांना कारवाई बाबत धमकी देवून त्यांचेवर दबाब आणला जातो.

हेही वाचा...


उपोषणकर्ता अरुण आंधळे यांनी माहिती अधिकारातील मागीतलेली माहिती पुरविली या कारणास्तव महसूल सहायक दिगंबर पवार यांचेकडील जमीन संकलनाचा कार्यभार आकस बुध्दीने काढून घेण्यात आला. तसेच बदली झालेले महसूल सहायक प्रल्हाद सलगरे तसेच इतरही संकलनाच्या संचिका पाहण्याकरिता व स्वाक्षरीसाठी (सर्व तहसिल विभागीतील अनुदान व गौणखनिज बाबतीतील संचिका) शासकीय निवासस्थानी तहसिलदार यांनी ताब्यात घेतलेल्या आहेत. परंतु अदयापपर्यंत त्यासंचिका परत केलेल्या नाहीत. यापूर्वीचा संचिका गायब करण्याचा अनुभव पाहता या सर्व संचिका मधील कागदपत्र व सर्व संचिका गायब करुन संबंधीत कर्मचा यांना अडचणीत आणून त्यांची खातेनिहाय चौकशी लावण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. त्यामुळे सर्व कर्मचारी मानसिक तणावाखाली आलेले आहेत.


पारनेर तहसील कार्यालय येथील दाखल केलेले कलम 155 नुसार दुरुस्ती साठी ऑनलाईन मान्यतेसाठी प्रस्ताव असो अथवा हस्तलिखीत प्रस्ताव असो त्यावर तहसीलदार ज्योती देवरे महिनोमहिने निर्णय घेत नाही. त्यामुळे क्षेत्रीय स्तरावर तलाठी व मंडळ अधिकारी यांना जनतेच्या रोशास नाहक सामोरे जावे लागत आहे. तसेच वरिष्ठ अधिकारी आढावा घेणेस आले असता सर्व काम न होणेचे सर्व खापर कर्मचारी यांचे माथे फोडले जाते त्यामुळे कर्मचारी प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत.


अनधिकृत गौणखनिज उत्खनन व वाहतूक याबाबत कर्मचारी अथवा पथक यांनी कारवाई केलेली अनेक वाहणे कुठलाही शासकीय दंड वसूल न करता सोडून आलेली आहेत. (सोबत त्याबाबतचे पुरावे जोडलेले आहे.) वरील सर्व पुरावे पाहता तहसीलदार पारनेर यांनी कोटयावधी रुपये रकमेचा शासकीय महसूल बुडविला आहे. त्याविषयी चौकशी व्हावी.कार्यालयीन खर्च निधीतून सन 2019-2020 व 2020-2021 च्या निधीतून कर्मचारी यांना साधी टाचणी देखील पुरविलेली नाही.


तहसीलदार ज्योती देवरे या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांबाबत नागरिकांमध्ये दोष निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात व वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्यास सांगतात. उदा. दिनांक 29/07/2021 रोजी मौजे वनकुटे ता. पारनेर येथे मा. जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांचा कोव्हीड आढाव्या निमित्त दौरा असताना तेथील सरपंच व ग्रामस्थ यांना तलाठी यांची जिल्हाधिकारी यांचेकडेस तक्रारी करण्याच्या सुचना केल्या मात्र तलाठी यांच्या कामकाजाविषयी नागरिकांच्या व सरपंच यांच्या कोणत्याही तक्रारी नसल्या कारणाने त्यांनी मा. जिल्हाधिकारी यांचेकडेस तक्रारी केल्या नाहीत. यावरुन तहसीलदार यांची कर्मचारी यांचेविषयीची मनातील सुडभावना दिसून येते.


तहसीलदार ज्योती देवरे या महिला कर्मचाऱ्यांना देखील चांगली वागणूक देत नाही. त्या पारनेरला तहसीलदार म्हणून हजर झाल्यापासून महिलांना वेळी/अवेळी बैठकांना बोलावणे रात्री उशिरापर्यंत बैठका घेणे, दबाव टाकणे असे प्रकार चालू असतात. त्याबाबत त्यांना विनंती केली असता मी देखील महिला आहे असे त्या सांगतात.
वरील सर्व परिस्थिती पाहता तहसीलदार देवरे या राजकीय दृष्ट्या सक्रीय असल्यासारख्या वागतात. त्यामुळे खालच्या कर्मचाऱ्यांना त्याचे बरेवाईट परिनामास तोंड दयावे लागते. तसेच कर्मचाऱ्यांना वेगवेगळया प्रकारे धमक्या देत असतात त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे पारनेर तालुक्यात सध्या काम करण्याची मानसिकता राहीलेली नाही. तरी मा. साहेबांनी याविषयी साकल्याने विचार करुन एकतर आम्हा सर्व कर्मचा तालुक्यातून बदली करावी किंवा तहसीलदार देवरे यांची बदली करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी आता काम बंद आंदोलन सुरू झाले आहे.

त्यामुळे  देवरे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.  तहसिल कार्यालयातील सर्व  कर्मचाऱ्यांनी व तलाठी मंडलअधिकारी ससंघटना यात सहभागी झाली आहे.या दोनही संघटनांनी या पुर्वीच निवेदन देऊन कामबंदचा इशारा दिला होता.कर्मचा-यांनी तहसीलदार देवरे यांची बदली करा नाहीतर  आमच्या  तालुक्याबाहेर बदल्या करा अशी मागणी कर्मचारी संघटणेने केली आहे.


या वेळी महसूल संघटनेचे अध्यक्ष महेंद्र रोकडे, तलाठी व मंडलाधिकारी संघटनेचे अध्यक्ष  एस यु मांडगे, मंडळ अधिकारी सचिन पोटे, कोळी, शेकटकर, पंकज जगदाळे, कदम, पवार आदी  सर्व मंडळअधिकारी, अव्वल कारकून,  महसूल सहायक, तलाठी सामील झाले आहेत.

Edited By - Amit Awari

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com