पावसाची वाट पाहणाऱ्या नगर जिल्ह्याला ढगफुटीने झोडपले

काहींनी तर पाटबंधारे विभागाकडे पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली.
पावसाची वाट पाहणाऱ्या नगर जिल्ह्याला ढगफुटीने झोडपले
pur.jpg

अहमदनगर ः अहमदनगर जिल्हा तसा पर्जन्यछायेचा प्रदेश. आकारमानाने राज्यात सर्वांत मोठा. अवाढव्य. पाणी येथे नेहमीच कळीचा मुद्दा ठरला आहे. अकोले तालुका सोडला तर इतर तालुक्यांत जेमतेम पाऊस होतो. जिल्ह्यात सरासरी 448.1 मिलीमीटर एवढाच पाऊस पडतो. अहमदनगर जिल्हा हा नाशिक विभागात मोडतो. नाशिक विभागाची पावसाची सरासरी 707.1 मिलीमीटर एवढीच आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील पर्जन्यमान किती कमी आहे. याचा सहज अंदाज येतो.

यंदाच्या पावसाळ्याची सुरवात चांगली झाली. मान्सून पूर्व व मान्सूनचे आगमनाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. शेतकऱ्यांनी मशागतीची कामे केली. पेरणी केली. अनं पावसाने नेमकी दडी मारली. ती कालपर्यंत. सुमारे दोन महिने पुरेशा प्रमाणात पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते.

हेही वाचा...

काहींनी तर पाटबंधारे विभागाकडे पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली. हवामान विभागाने तीन दिवस पाऊस सांगितला होता. त्यातील दोन दिवस कोरडेच गेल्याने शेतकरी चिंतेत होते. थोडे फार उगवलेले जगविण्याची चिंता होती. अशातच काल रात्री वरूण राजा नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई, पाथर्डी व शेवगात तालुक्यातील डोंगरभागात भलताच मेहरबान झाला. 

नगर तालुक्यातील जेऊर व पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील डोंगरभागांत अचानक मुसळधार पाऊस झाला. पाहणाऱ्यांनी या प्रसंगाला ढगफुटीची उपमा दिली. एकट्या पाथर्डी तालुक्यात एका रात्रीत 198.9 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. शेवगावमध्ये 85.7 मिलीमीटर पाऊस झाला. शेवगावमधील बोधेगाव परिसरात 117.5 तर चापडगाव परिसरात 108.5 मिलीमीटर पाऊस झाला. पाथर्डी तालुक्यातील पाथर्डीत 182, माणिकदौंडी 193.3, टाकळी 194.3, कोरडगाव 265.5, करंजी 229 तर मिरी परिसरात 129.3 मिलीमीटर पाऊस झाला. नगर तालुक्यातील भिंगार परिसरात 119.3 तर जेऊर परिसरात 71 मिलीमीटर पाऊस झाला. मात्र जेऊर हे गाव डोंगर कुशीत असल्याने पावसाचे पाणी वेगात गावात शिरले.

हेही वाचा...

काल रात्री झालेल्या शेतकऱ्यांची पिके गेली. नदी काठच्या नागरिकांचे संसार उघड्यावर आले. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी आणि  शेवगाव या दोन तालुक्यांच्या हद्दीवरील नांदणी नदीला पूर आल्याने पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव, औरंगपूर व पागोरी पिंपळगाव तसेच शेवगाव तालुक्यातील आखेगाव, वरुर, ठाकुर पिंपळगाव या नदीकाठावरील गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरे पाण्यात गेली आहेत, बचाव पथके नसल्याने अडचण होत आहे. 

पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत परंतु प्रभावी सुविधा नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. बचावकार्यासाठी नेवासा पैठण येथून बोट मागविण्यात  आली आहे.आखेगाव येथे नदीला पाणी आल्याने घरात पाणी शिरले आहे शेकडी घरे पाण्यात आहेत बाबासाहेब पालवे यांची वस्ती पाण्यात गेल्याने असंख्य कुटुंब अडकले आहेत रात्रभर घराच्या गच्चीवर भर पावसात थांबले आहेत. 

ठाकुर पिंपळगाव येथे ट्रक वर अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात यश आले आहे. अनेक ठिकाणी जनावरे वाहून गेल्याच्या तक्रारी आहेत, वीज पुरवठा खंडित झाल्याने नेटवर्क व संपर्क करणे अडचणीचे ठरत आहे रात्री 11 वाजले पासून पावसाने सुरवात केली सकाळपर्यंत कमी अधिक पाऊस सुरू आहे  आता पर्यंत 50 जणांना वाचवण्यात यश आले असून 100 नागरिक अजूनही अडकले आहेत.  

जेऊरमधील नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देत पाठपुरावा सुरू केला आहे. कर्डिले यांनी जेऊरमधील नागरिकांशी चर्चाही केली. जेऊर परिसरात मोठा पाऊस झाल्याने सीना नदी दुथडी भरून वाहत आहेत. नगर शहरातील सीना नदीवरील पूल काही कालावधीसाठी पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील पूर स्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भोसले स्वतः शेवगावमध्ये दाखल झाले. त्यांनी पूर स्थितीची व झालेल्या नुकसानीची पाहणी करून अधिकाऱ्यांना पंचनामे संदर्भातील सूचना दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in