राजकीय तंटा उक्कडगावात शांततेच्या मुळावर
Crime.jpg

राजकीय तंटा उक्कडगावात शांततेच्या मुळावर

श्रीगोंदे तालुक्यातील उक्कडगाव येथे बुधवारी (ता. 8) ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांची निवड होती.

श्रीगोंदे : गावात वाद होऊ नये. सलोख्याचे वातावरण रहावे यासाठी प्रशासनाकडून प्रत्येक गावात तंटामुक्ती समिती स्थापन करण्यास सांगण्यात आले आहे. या समितीने गावात भांडण-तंटे होऊ नये यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. पण काही गावात ही समितीच राजकीय भांडणाचे कारण ठरत आहे, असाच काहीसा प्रकार श्रीगोंदे तालुक्यात झाला. यात दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

श्रीगोंदे तालुक्यातील उक्कडगाव येथे बुधवारी (ता. 8) ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांची निवड होती. दोन्ही बाजूंकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

हेही वाचा...

शांतताप्रिय असणाऱ्या गावांमध्ये उक्कडगावची ओळख आहे. गावातील वाद जागीच मिटवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी गावाचा एकोपा चर्चेत आहे. बुधवारी तेथे झालेला राडा गावाची शांतता भंग करणारा ठरला. तंटामुक्तीच्या अध्यक्षांच्या निवडीच्या ग्रामसभेतील गोंधळात परस्परांविरुद्ध फिर्यादी आल्याने वीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या दोन्ही घटनांचा निकाल न्यायालयात होईल, पण गावाची शांतता मात्र भंग होण्यास तंटामुक्तीच्या अध्यक्षांची निवड कारणीभूत ठरली आहे. 

उक्कडगावच्या लोकांचा संपर्क श्रीगोंद्यापेक्षा शिरूर (जि. पुणे) येथे जास्त आहे. शिरूरच्या जवळ असणारे हे गाव कमालीचे शांत असते. गावातील राजकारणात सगळ्याच पक्षांचे तगडे कार्यकर्ते आहेत. काहींनी तालुकापातळीवर चांगले काम करीत ठसा उमटविला आहे. बेलवंडी पोलिसांत या गावातील तक्रारींचे प्रमाण त्यामानाने कमी असल्याचे गावकरी भूषणाने सांगतात. मात्र, कालच्या प्रकाराने या शांततेला दृष्ट लागली, हे मात्र निश्चित. 

तेथील महिला सरपंचांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्याचा प्रकार निंदनीय आहे. त्याच वेळी समोर ग्रामसभेत असणाऱ्या महिलेलाही धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्याचा प्रकारही घृणास्पद आहे. या दोन्ही प्रकारांत एकूण वीस जण आरोपी झाले आहेत. गावातील शांतता भंग होऊ नये, गावात सलोख्याचे वातावरण राहावे, यासाठी तंटामुक्ती अध्यक्षांची नेमणूक करण्यात येते. ही निवड करण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे. 

हेही वाचा...

गाव ठरवील तो अध्यक्ष होतो व त्यासाठी होणाऱ्या सभेत तंटा होऊ नये, ही प्रशासनाची अपेक्षा आहे. येथे मात्र उलटेच घडले. गावाने एकत्रित अध्यक्ष निवडणे आवश्यक असताना, निवडीतच राडा झाला. 

समजलेल्या माहितीनुसार, दोन गटांचे राजकीय हेवेदावे उफाळून आले आणि गोंधळ झाला. दोन्ही गटांना त्यांचाच अध्यक्ष हवा होता. त्यावरून वादंग झाले आणि दोन महिलांच्या बाबतीत चुकीचा प्रसंग घडला. आता तरी गावकारभाऱ्यांनी शहाणे होऊन, पुन्हा एकत्र बसून वाद मिटवावा व गावातील पूर्वीची शांतता पुन्हा आणण्यासाठी दोन्ही बाजूंनी एक पाऊल मागे घ्यावे, अशी सामान्यांची अपेक्षा आहे. 


राजकारण निकोप असावे. गावाच्या विकासात राजकारणाचा उपयोग व्हावा. उक्कडगावात चुकीचे घडले आहे. तंटामुक्ती अध्यक्ष निवडीच्या सभेतच महिलांचा विनयभंग करण्याचा प्रकार होत असेल, तर आम्हाला भविष्यात गावाकडे बारीक लक्ष द्यावे लागेल. एकत्रित येऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत.

- संपतराव शिंदे, पोलिस निरीक्षक, बेलवंडी 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in