आता राज्य महिला आयोगाकडे देवरेंची तक्रार

देवरे यांनी 15 ऑगस्टला राज्य महिला आयोगाकडे त्यांना होणाऱ्या त्रासा बाबतची तक्रार मांडली होती. यात आमदार व काही अधिकाऱ्यांचा उल्लेख आहे. ही तक्रार सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
jyoti devare.jpg
jyoti devare.jpg

अहमदनगर ः पारनेरच्या तहसीदार देवरे यांच्या भावनिक ऑडिओ क्लिप राज्यभर व्हायरल झाली. त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाले आहे. देवरे यांच्या बाजूने महसूल संघटना उभ्या ठाकल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्य समिती तयार केली आहे. तर देवरे यांनी 15 ऑगस्टला राज्य महिला आयोगाकडे त्यांना होणाऱ्या त्रासा बाबतची तक्रार मांडली होती. यात आमदार व काही अधिकाऱ्यांचा उल्लेख आहे. ही तक्रार सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

ही तक्रार जशीच्या तशी देत आहोत, मी श्रीमती ज्योती रामदास देवरे, तहसीलदार पारनेर जि. अहमदनगर या पदावर मागील २ वर्षांपासून कार्यरत आहे. मी कोरोना कालावधीत रात्रंदिवस काम करत आहे व कोरोनापासुन लोकांचे जीव वाचविणेकामी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे. तहसिलदार पारनेर या पदावर माझा नियमानुसार कार्यकाल हा ३ वर्षाचा आहे. सदर पदावर कार्यरत असताना लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, तालुक्यातील इतर अधिकारी, काही समाजकटंक, तक्रारदार यांचेकडुन होत असलेली अवहेलना व इतर बाबी खालीलप्रमाणे आहेत.

हेही वाचा...

वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय पारनेर यांनी संदर्भिय पत्रान्वये पुढील बाबी घडलेबाबत कळविलेले आहे. दिनांक ०४/०८/२०२१ रोजी रात्री ८.३० वा. ग्रामीण रुग्णालय पारनेर येथे लाभार्थ्यांना लसीचे टोकण वाटप करणेत आले. त्यानंतर रात्री १०.३० वा. आमदार व डॉ. कावरे यांनी टोकण वाटप करणारे राहुल दिलीप पाटील, कनिष्ठ लिपिक यांना घरुन बोलविले व त्यांचेवरती टोकण विकण्याचे आरोप करुन त्यांना कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता मा. आमदार यांनी मारहाण केली. तसेच कार्यरत महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. उंद्रे व डॉ. अडसुळ यांना शिवीगाळ केली. सदरची घटना ही गटविकास अधिकारी व पोलिस निरीक्षक पारनेर बळप यांचेसमोर घडलेली व असुन सदर घटनेची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी असे वैद्यकीय अधीक्षक यांनी कळविलेले आहे.

सदर अनुषंगाने ही बाब वैद्यकीय अधीक्षक यांनी मला दुरध्वनीवरुन कळविली त्यावेळी त्या खुप रडत होत्या. उंद्रे मॅडम स्वतः व डॉ. अडसुळ मॅडम यांना लोकप्रतिनिधी आईवरुन घाणघाण शिव्या देऊन हात उगारत होते. परंतु तुम्ही बाई असल्याने तुम्हाला मला मारता येत नाही असे ते म्हणत जवळ उपस्थित असलेल्या पोलिस निरीक्षक बळप यांना ते म्हणाले की लेडीज पोलिस यांना या बायांना मारायला आणा. तसेच मी तहसिलदार या नात्याने उपलब्ध कोविड ल ही दुकानदारांच्या मागणीवरुन नियमाप्रमाणे दुकानदार यांना उपलब्ध करुन द्यावी असे सांगितले होते.

आमदारांची अर्वाच्च भाषा

त्यामुळे ते म्हणाले की लोकप्रतिनिधी मोठा की तहसीलदार, अशा भाषेत तहसीलदार यांचेविषयी अर्वाच्च भाषेत बोलल्याचे डॉ. उंद्रे मॅडम यांनी मला दुरध्वनीवरुन कळविले. डॉ. अडसुळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. उंद्रे, लिपिक श्री. पाटील व संपुर्ण स्टाफ रडत आहे अशाप्रकारे डॉ. ठंद्रे मॅडम यांनी मला फोन केला. पोलिस निरिक्षक ही समवेत आहे व ते लोकप्रतिनिधींच्या बाजुने बोलत आहे. गटविकास अधिकारी सुद्धा असताना ते सुद्धा शासकीय कर्मचा-यास मारहाण करताना कोणताही अटकाव करत नाही व लोकप्रतिनिधींच्या बाजुने बोलत आहे असे डॉ. उंद्रे यांनी सांगितले. अशा मारहाण प्रसंगी मी तालुक्यामध्ये केवळ पोलिस निरीक्षक यांचीच मदत घेऊ शकत होते मात्र पोलिस निरिक्षकच त्यांचे समवेत होते. त्यामुळे डॉ. उंद्रे मॅडम यांना मी असहाय्य असल्याची भावना मला झाली. त्यामुळे मी उंद्रे मॅडम यांना जिल्हाधिकारी महोदय यांना संपर्क करुन मदत मागा असे सुचित केले. त्यानंतर त्या जिल्हाधिकारी महोदय यांचेशी बोलल्या.

जिल्हाधिकाऱ्यांना कळविले होते

जिल्हाधिकारी महोदय यांनी लेखी अर्ज करणेचे सूचित केले. त्याप्रमाणे त्यांनी लेखी अर्ज मा.जिल्हा शल्यचिकित्सक अहमदनगर, मा. जिल्हाधिकारी अहमदनगर, तहसिलदार पारनेर व पोलिस निरिक्षक पारनेर यांना दिला. सदर प्रकरणी पोलिस निरिक्षक श्री.बळप यांचेकडून उचित कारवाई होणार नाही व महिला वैद्यकीय अधिक्षक यांना योग्य तो न्याय मिळणार नाही म्हणून त्याबाबतचा अहवाल मी मा. जिल्हाधिकारी महोदय यांचेमार्फत जिल्हा पोलिस अधिक्षक यांचेकडेस अग्रेषित केला आहे. त्यानंतर झालेला प्रकार दडपुन टाकण्यासाठी संबंधित लिपिक यांचा लोकप्रतिनिधी यांनी मला मारलं नाही असा दबावातुन व्हिडीओ तयार करणेत येऊन तो सोशल मिडीयातुन प्रसारीत झाला आहे. पोलिस निरीक्षक बळप यांनी देखिल मारहाण झाली नाही असे वृत्तपत्रांच्या जबाबात नमुद केले आहे.

प्राथमिक शिक्षकच वाळू तस्कर

मी तहसीलदार असुन महिला अधिकारी आहे. यामुळे निश्चीतच महिला अधिकारी म्हणून माझेवर प्रचंड दबाव आला असुन मी अत्यंत तणावाखाली असून सदरचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांचेकडेस पाठविला आहे. लोकप्रतिनिधी मारहाण करत असताना पोलिस निरिक्षक पारनेर समवेत असतानाची याबाबतची ही दुसरी घटना आहे. जिल्हा गौणखनिज अधिकारी वसीम सय्यद व लिपिक सांगळे हे भाळवणी येथील कोविड सेंटरमध्ये गेले असता, लोकप्रतिनिधी स्वतः व बाळासाहेब खिलारी प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद अहमदनगर (हे जि.प. शिक्षक असले तरी पूर्णवेळ वाळू तस्करी करतात व कोणी त्यांना अडविले तर संबंधितांना मारहाण करतात. कधीही शाळेत जात नाही. गेल्या ३ वर्षांत ते कधीही शाळेवर गेलेले नाहीत. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचेमार्फत सदर प्राथमिक शिक्षक यांची चौकशी करावी) यांनी श्री. वसीम सय्यद व लिपिक श्री. सांगळे यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. तेव्हाही पोलिस निरिक्षक पारनेर लोकप्रतिनिधी समवेत उपस्थित होते. नंतर बाहेर आणुन त्यांना मटणाचे जेवण खाऊ घातले. पुन्हा यानंतर माझे तालुक्यात अनधिकृत वा वाहणारे कोणतेही वाहन अडविले तर परत येथुन जाऊ देणार नाही अशा प्रकारे त्यांना धमकविले.

ही गोष्ट खुद्द पोलिस निरीक्षक पारनेर यांनी तहसीलदार यांचेसमोर कथन केली. जेणेकरुन मी देखिल वाळूच्या वाहनांना अडविले तर मला परिणामांना सामोरे जावे लागेल अशी धमकी त्यात होती. गटविकास अधिकारी पारनेर यांना देखिल बाळासाहेब खिलारी प्राथमिक शिक्षक हे कोणत्याही प्रकारचे शालेय कामकाज करत नाही हे माहित असतानाही ते त्यांचेवर कोणतीही कारवाई करत नाही. ज्याठिकाणी लोकप्रतिनिधीमार्फत मारहाणीचे प्रकार होतात त्याठिकाणी पोलिस निरीक्षक पारनेर उपस्थित असतात व पोलिस प्रशासना समवेत लोकप्रतिनिधी कायदा हातात घेतात. सदरची बाब ही महिला तहसिलदारास तणावाखाली ठेवणारी आहे. या परिस्थितीची तात्काळ चौकशी होऊन पोलिस निरिक्षक पारनेर व गटविकास अधिकारी पारनेर यांचेवर प्रशासकीय कारवाई होणेचे गरजेचे आहे,

हेही वाचा...

तसेच लोकप्रतिनिधी यांनी मला देखिल जर मी इतर पक्षांच्या विशेषकरुन शिवसेनेच्या लोकांशी बोलली त्यांची कामे केली तर खोटया अॅट्रोसिटीच्या गुन्हयात तुम्हाला अडकवुन टाकू असे प्रत्यक्ष सांगितले व अॅट्रोसिटी दाखल करणेसाठी शिंदे नामक व्यक्तिला सुपा पोलिस स्टेशन येथे दिवसभर बसवुन ठेवले. नंतर प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांचेमार्फत मला फोन करणेत आला.

प्रांताधिकारी यांनी मला मॅडम तुम्ही लोकप्रतिनिधींचे ऐकुन वागा अन्यथा तुमच्यावर अॅट्रोसिटी दाखल होईल असे सांगितले. मात्र समोर आलेली माणसे ज्या कामासाठी येतात त्यांचा पक्ष मला माहीत नसतो. त्यावेळी कार्यालयातील काही लिपिक लोकप्रतिनिधींना माझेविरुद्ध माहिती पुरवित राहिले. अरुण रोडे, धोंडीबा शेटे, अरुण आंधळे यांना माझेविरुद्ध अर्ज, तक्रारी, उपोषण करण्यास भाग पाडले. अरुण रोडे यांचेवर मी रितसर खंडणीचा गुन्हा दाखल केला, त्या फिर्यादीत अरुण आंधळे व धोंडिबा शेटे यांचेदेखिल नाव आले. धोंडिबा शेटे हे प्राथमिक शिक्षक आहेत. मात्र शिस्तभंगविषयक वर्तन करत ते कधीही शालेय गावात राहत नाही. आधी तक्रारी करून नंतर ब्लॅकमेलिंग करतात. खंडणी मिळाली की आता माझी तक्रार नाही असे लिहून देतात.

तसेच अरुण आंधळे यांनी माझेविरुद्ध कोणताही भ्रष्टाचार हा पुराव्यानिशी सिद्ध झाले नसतानाही माझे फोटो भ्रष्टाचारी तहसिलदार म्हणून सोशल मिडियावर पसरविणे, चुकीच्या बातम्या पसरविणे, माझी प्रतिमा खराब करणे, वैयक्तिक जीवनावर टिकाटिपणी करणे, मानहानी होईल असे बोलणे अशा बाबी तुफान एक्सप्रेस या चॅनेलवरुन करत आहेत. वास्तविक पाहता खंडणीच्या गुन्हयात त्यांचे नाव असताना त्यांना अशी मोकळीक का दिली जाती याचा ही तणाव मला आहे. माझी अरुण आंधळे याचेविरोधारत अब्रु नुकसान भरपाईची व मला तणावात ठेऊन बदनामी करण्याची रितसर फिर्याद आहे. कृपया मा. जिल्हा पोलिस अधिक्षक यांचेमार्फत सदर अरुण आंधळे यांचेवर कारवाई होऊन त्यांचे चॅनल, पत्रकारिता यांच्या सनदशीर परवानगीबाबत चौकशी व्हावी ही विनंती.

अरुण आंधळे यांचे तक्रारीवरुन मागील अहवाल देतेवेळी माझे कार्यकाळात महसुल विभागाने पकडलेले कोणतेही वाहन मी अवैधरित्या सोडलेले नाही. मात्र पोसिल विभागाने पकडलेली वाहने यांना वृत्तपत्रातील बातमीच्या आधारे आम्ही दंडाच्या नोटीसा दिल्या होत्या. दंड वसुल होईपावेतो वाहने सोडु नये असे देखिल दिनांक १४/०१/२०२० रोजीचे पत्रान्वये लेखी आदेशीत केले होते. तरीदेखिल माझेविरुद्ध चौकशी करताना पोलिस विभागाने सोडलेली वाहने ही अहवाल पाठविताना पोलिस विभागाची दाखविण्यात आली नाही. सदर अहवालाबाबत मला कोणतेही म्हणणे मांडणेची संधी देण्यात आली नाही.

मी गेल्या २ वर्षांपासून पारनेर तालुक्यात कोरोना कालावधीत रात्रंदिवस काम करत आहे. भाळवणी येथील कोविड केअर सेंटर हे शासकीय असुन त्याठिकाणी कार्यालयामार्फत वैद्यकीय स्टाफ, औषधे, ऑक्सिजन यासुविधा देण्यात आलेल्या आहेत. मात्र तेथे मोठ्या प्रमाणावार त्याचा उपयोग लोकप्रतिनिधी यांनी स्वतःचे वारेमाप प्रसिद्धीसाठी करुन घेतला आहे. तेथे उपस्थित असलेल्या कार्यकत्यांनी गावोगावी कोरोना सुपर स्प्रेडर बनुन कोरोनाची रुग्णसंख्या वाढविली आहे. स्वतः लोकप्रतिनिधी व त्यांचे कार्यकर्ते हे कधीही मास्क वापरत नाहीत व समोर आलेल्या नागरिकांना देखिल मास्क वापरु नका म्हणुन सांगत असतात. त्यामुळे पारनेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

कारवाई दरम्यान लोकप्रतिनिधींचा फोन

तालुक्यातील कोणतेही दुकान सामाजिक अंतराचे पालन करत नसल्यास सिल केले असता लोकप्रतिनिधी फोन करुन सदर दुकान बंद करु नका असे सांगतात. उदा. टाकळी ढोकेश्वर येथील हॉटेल चौपाटी हे प्रचंड गर्दीमुळे २ वेळा सिल केले. त्यावेळी दत्ता निवडुंगे माझा कार्यकर्ता आहे तात्काळ दुकान उघडुन द्या असे धमकावून सांगितले जाते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पोलिस निरिक्षक पारनेर व गटविकास अधिकारी लोकप्रतिनिधींच्या मर्जीनुसार वागत असलेने कोरोनाविषयक बाबींचे पालन केले जात नाही. त्यामुळे तहसीलदार म्हणून काम करताना मला वेगवेगळया समस्यांना तोंड द्यावे लागत आहे व माझी कुचंबना होत आहे. मी कोरोना कालावधीत रात्रंदिवस काम केले आहे. कोरोना नियंत्रणात आणणेकामी लोकप्रतिनिधींचे विरोधात जाऊन कारवाई केल्या.

दुकाने बंद केली, प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहिर केली. मात्र लोकप्रतिनिधी यांना माझेबद्दल मनात आकस निर्माण झाला व सुडबुद्धीने ते माझेविरुद्ध रोज नवीन तक्रारदारांना तक्रार देण्यास भाग पाडुन माझे मनस्वास्थ खराब करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांनी माझे बदलीचा अर्ज मा. मंत्री महसुल यांचेकडेस दिला. अशा प्रकारे माझी बदली झाल्यास महिला अधिकारी यांचे खच्चीकरण होईल. लोकप्रतिनिधी व प्रशासन हे दोन्हीही समन्वयाने असणे आवश्यक आहे. मात्र प्रशासनाने आपले ऐकले नाही की लगेच त्या शासकीय कर्मचा-याला मारहाण करायची किंवा अॅट्रोसिटी करण्याची धमकी द्यायची किंवा त्याच्या विरोधात ब्लॅकमेलर स्वयंभु समाजसेवकांना सोडून द्यायचे व त्यांचे जीणे हराम करायचे. हीच कार्यपद्धती लोकप्रतिनिधी अं आणत आहेत. त्यामुळे मी महिला अधिकारी असुन माझे खच्चीकरण होत आहे. अशा दडपशाही पुढे हात टेकुन तत्वांशी तडजोड करणे व परिस्थितीला शरण जाणे हे मला जमणारे नाही.

तरी मला माझे कर्तव्य पार पाडत असताना तालुक्यातील लोकप्रतिनिधी मा. आमदार, प्रांताधिकारी श्री. सुधाकर भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संदिप निचीत, तक्रारदार अरुण रोडे, अरुण आंधळे, धोंडीबा शेटे या व्यक्ती प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अडथळा आणून माझे मानसिक स्वास्थ व कामकाजावर परिणाम करत आहेत. त्यामुळे कृपया माझ्या परिस्थिीचा साकल्याने विचार होऊन मला उचित मदत तात्काळ करावी ही विनंती, असे तक्रारीत म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com