बड्या नेत्याच्या सांगण्यावरून नीलेश लंकेंचे मौन...

बदली नंतरही आमदार लंकेंचे कार्यकर्ते आक्रमक आहेत मात्र आमदार लंके यांनी देवरे यांच्या संदर्भात मौन बाळगणे पसंत केले आहे.
बड्या नेत्याच्या सांगण्यावरून नीलेश लंकेंचे मौन...
devre vs lanke.jpg

अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यात त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदार नीलेश लंके व जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले होते. या भावनिक क्लिपमुळे राज्यातील राजकारण तापले होते. आमदार लंकेंवर भाजपकडून आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात आमदार नीलेश लंके यांच्या राज्यभरातील जनसामान्यांत असलेल्या प्रतिमेला धक्का बसला. तहसीलदार देवरे यांची आता जळगाव जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना कार्यालयात बदली झाली आहे. बदली नंतरही आमदार लंकेंचे कार्यकर्ते आक्रमक आहेत मात्र आमदार लंके यांनी देवरे यांच्या संदर्भात मौन बाळगणे पसंत केले आहे.

तहसीलदार देवरे यांचा ऑडिओ व्हायरल झाल्यावर आमदार नीलेश लंके यांचा व्हिडिओ व्हारल झाला होता. यात त्यांनी ज्योती देवरे या भ्रष्ट अधिकारी असून त्यांच्यावर कारवाई होणार आहे. त्यामुळे त्या भावनिक प्रयोग करत असल्याचा आरोप केला होता. आमदार लंके यांच्यावर माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी जोरदार टीका केली होती. चित्रा वाघ यांनी तर देवरे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. 

हेही वाचा...

जिल्हाधिकारी कार्यालय व पारनेर तहसील कार्यालयात प्रसार माध्यमांसमोर तहसीलदार देवरे यांनी आमदार लंके यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आमदार लंके यांनी अण्णा हजारे यांची भेट घेत देवरे यांच्या भ्रष्टाचारा संदर्भातील कागदपत्रे सादर केली होती. आमदार लंके भेटून गेल्यावर दुसऱ्याच दिवशी तहसीलदार देवरे यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली होती. आमदार लंके व तहसीलदार देवरे यांच्या वादाचा कलगी-तुरा राज्यभर चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर अचानक आमदार लंके यांच्याकडून प्रतिक्रिया येणे बंद झाले. राज्यातील एका बड्या नेत्याच्या सांगण्यावरून आमदार लंके यांनी देवरे यांच्या विरोधात बोलणे टाळत असल्याची चर्चा सुरू झाली मात्र त्यांचे कार्यकर्ते व समर्थक आक्रमकच राहिले. 

तहसीलदार देवरे यांनी राज्य महिला आयोगाला दिलेले पत्र व तहसीलदार देवरे यांच्यावरील चौकशीचा अहवाल प्रसार माध्यमांत व्हायरल झाला. त्याच वेळी पारनेर तहसील कार्यालयातील कर्मचारी व तलाठ्यांनी देवरे यांच्या बदलीसाठी आंदोलन केले. पारनेर तालुक्याचा महसूल विभागाचा कारभार ठप्प झाला. देवरे यांनी आमदार लंके यांच्या दबावातून ही आंदोलने होत असल्याचा आरोप केले होता. मात्र आमदार लंके यांनी देवरेंवर कोणतेही आरोप करणे टाळले. अखेर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तहसीलदार देवरे व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. यात कर्मचाऱ्यांची समजूत काढून देवरे यांची लवकर बदली करण्याचे आश्वासनही दिल्याची चर्चा रंगली. कर्मचाऱ्यांनी अखेर आंदोलन मागे घेतले.  

हेही वाचा...

आमदार लंके यांनी विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी समाज प्रबोधनकार निवृत्ती इंदुरोकर महाराज, राज्यातील दिग्गज मंत्री व राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांना बोलावले होते. या दिग्गजांनी भाषणातून तहसीलदार देवरे व भाजपच्या चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावेळी आमदार लंके यांनी भाषणांतून देवरे यांच्या संदर्भात वक्तव्य करणे टाळले. 

आमदार लंके यांचे कट्टर समर्थक असलेल्या राहुल झावरे यांनी लोकायुक्तांकडे देवरे यांनी भ्रष्टाचार केल्या संदर्भात तक्रार केली. महसूल कर्मचाऱ्यांचेही आंदोलन स्थगित झाले. देवरे-लंके दिवस थंड होतो नाही तोच राहुल झावरे यांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला. राहुल झावरे यांनी हा गुन्हा तहसीलदार देवरे, भाजपचे नेते सुजीत झावरे व मनसे तालुकाध्यक्षांनी राजकीय सूड बुद्धीने दाखल केला असल्याचा आरोप केला. या गुन्ह्या नंतर दोनच दिवसांत तहसीलदार देवरेंच्या बदलीचा आदेश निघाला. आदेश निघताच राहुल झावरे यांनी अखेर ज्योती देवरेंच्या पापाचा घडा भरला अशी प्रतिक्रिया दिली. चित्रा वाघ यांनी आमदार लंके व त्यांच्या कार्यकर्त्यांवर आगपाखड केली. बदली झाल्यावरही देवरे यांच्या विरोधात आमदार लंके यांच्या समर्थकाने लाचलुचपत विभागात तक्रार दाखल केली. मात्र एवढे घडत असताना आमदार लंके यांनी देवरे यांच्या विरोधात कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांचे हे मौनच आता चर्चेचा विषय ठरले आहे. पारनेर तालुक्यातील आमदारांचे मौन व कार्यकर्त्यांची आक्रमकता यावर उलट सुलट राजकीय चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in