नगर एमआयडीसी प्रश्नी किरण काळेंची आमदार संग्राम जगतापांवर कडी

अहमदनगर एमआयडीसीतील उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उद्योग राज्य मंत्री आदिती तटकरे शनिवारी व रविवारी नगरमध्ये आहेत.
नगर एमआयडीसी प्रश्नी किरण काळेंची आमदार संग्राम जगतापांवर कडी
thorat ahmednagar midc.jpg

अहमदनगर : अहमदनगर एमआयडीसीतील उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उद्योग राज्य मंत्री आदिती तटकरे शनिवारी व रविवारी नगरमध्ये आहेत. यावेळी त्या नगरमधील उद्योजकांची बैठक घेणार आहेत. तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन उद्योजकांचे प्रश्न मांडत ते सोडविण्याचे आश्वासनही मिळविले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांत एमआयडीसीवरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.  

नगर एमआयडीसीतील उद्योजकांच्या प्रलंबित प्रश्‍नां संदर्भात मागील महिन्यात 10 जुलैला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, आमी संघटनेच्या उद्योजकांच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उद्योजकांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी थोरात यांना साकडे घालत उद्योजकांचे प्रश्न सोडण्यासाठी या बैठकीमध्ये मागणी केली होती.

हेही वाचा...

या बैठकीत थोरात यांनी उद्योजकांना न्याय देण्याचे काम राज्यातील महाविकास आघाडी सरकार करेल. नगर एमआयडीसी मधील उद्योजकांना यापूर्वी देखील वेळोवेळी मदत करण्याची भूमिका ही माझी राहिली आहे, असे सांगत मंत्रालयामध्ये यासंदर्भात उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याशी मी चर्चा करेल असे सांगितले होते.


थोरात यांनी उद्योग मंत्री व संबंधित प्रश्नांच्या अनुषंगाने त्या त्या विभागांचे मंत्री तसेच अधिकारी यांच्याशी लेखी पत्र व्यवहार मागील महिन्यामध्ये केला होता. बुधवारी मंत्रालयात बाळासाहेब थोरात यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची प्रत्यक्ष भेट घेऊन उद्योजकांच्या प्रश्नावर चर्चा केली. यावेळी एमआयडीसीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक कृष्णा यांच्यासह एमआयडीसी विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते अशी माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे.


या बैठकीमध्ये उद्योजकांच्या अनेक मागण्या सकारात्मक रित्या मार्गी लावण्याचे आदेश उद्योगमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. एमआयडीसीमध्ये ट्रक टर्मिनलची मागणी करण्यात आली होती. त्याबाबत नगर एमआयडीसीमध्ये ट्रक टर्मिनलची भूखंड क्रमांक 36 वर उभारणी करून या ठिकाणी ट्रक चालकांसाठीच्या पार्किंग व्यवस्थेसह सुविधा केंद्र उभे करणे, सुलभ शौचालय, स्नानगृह, भोजनालय उभे करणे यासह आराखडा सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. 

नाशिक याठिकाणी एमआयडीसीचे विभागीय अधिकारी बसतात. नगरमधील उद्योजकांना विविध कामांसाठी सातत्याने नाशिकला खेटा घालाव्या लागतात. उद्योजकांचा हा त्रास दूर व्हावा यासाठी नगर एमआयडीसीतील एरिया मॅनेजर यांना अधिक अधिकार देत उद्योजकांना नाशिकला जावे लागणार नाही या संदर्भात देखील कार्यवाही तातडीने करण्याची सूचना देण्यात आली आहे. 


दुहेरी कर आकारणीच्या बाबतीमध्ये उद्योजकांनी प्रश्न मांडला होता. या बाबतीमध्ये दोन भिन्न यंत्रणांकडून कर संकलित करण्याऐवजी एकाच यंत्रणेकडून कर संकलित करून तो एमआयडीसीची प्रशासकीय यंत्रणा आणि ग्रामपंचायत यांच्यामध्ये योग्यरीत्या वाटप करण्या संदर्भामध्ये आवश्यक ती पावले तातडीने उचलण्याच्या बाबतीमध्ये सूचना करण्यात आल्या आहेत. 


राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या अहमदनगर दौऱ्या आधी ही माहिती किरण काळे यांनी दिली आहे. राज्यमंत्री तटकरे या आमदार संग्राम जगताप यांच्या समवेत एमआयडीसीतील उद्योजकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. तत्पूर्वीच ही भेट झाल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेत नगरच्या उद्योजकांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतल्यामुळे एमआयडीसीमधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लागत असल्याबद्दल उद्योजकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भविष्यात देखील थोरात यांच्या माध्यमातून उद्योजकांना कायम सर्वतोपरी साहाय्य करण्याचे काम महाविकासआघाडी सरकारच्या माध्यमातून करण्यासाठी शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने काम केले जाईल.
- किरण काळे, अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

नगर शहर एमआयडीसी विस्तारीकरणासाठी पाठपुरावा करणार 
नगर शहराला उद्योग नगरी करण्याच्या दृष्टीने नगर शहराला लागून असणाऱ्या परिक्षेत्रांमध्ये एमआयडीसी क्षेत्राच्या विस्तारीकरणासाठी काँग्रेस पक्षाच्या पुढाकारातून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकार कडून सर्वतोपरी मदत मिळण्यासाठी पुढाकार घेत पाठपुरावा करणार असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सांगितले आहे. 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in