खासदार विखेंनी केले पाचपुतेंचे सारथ्य

खासदार डॉ. विखे पाटील यांनी आमदार पाचपुते यांच्या केलेल्या सारथ्याची जोरदार चर्चा होत आहे.
खासदार विखेंनी केले पाचपुतेंचे सारथ्य
Sarkarnama (6).jpg

श्रीगोंदे : जिल्ह्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काल श्रीगोंदे दौरा केला. यावेळी त्यांनी दुचाकीवर आमदार बबनराव पाचपुते यांना बसवून फेरफटका मारला. खासदार डॉ. विखे पाटील यांनी आमदार पाचपुते यांच्या केलेल्या सारथ्याची जोरदार चर्चा होत आहे.

यावेळी ‘सकाळ’शी बोलताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, ‘‘जिल्ह्यात सगळ्याच तालुक्यांवर लक्ष आहे. मात्र, श्रीगोंद्यातील राजकारण समजण्यापलीकडचे झाले आहे. तालुक्यात पक्षाला मानणाऱ्या नव्या-जुन्या कार्यकर्त्यांची सांगड घालून जिल्हा परिषदेसह सगळ्याच सार्वत्रिक निवडणुकांत जातीने लक्ष घालून, भाजपाच्या झेंड्याखाली ताकदीने निवडणुका लढविणार आहोत. श्रीगोंदेकरांचे आमच्या कुटुंबावर कायमच प्रेम आहे. आजोबांपासून या तालुक्याची नाळ आमच्याशी जुळलेली असून, त्यानंतरच्या पिढीने ती घट्ट करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. जिल्ह्याच्या राजकारणावर जसे आमचे लक्ष आहे, तसेच श्रीगोंद्यावरही आहे. येथे जुन्यांसह नव्या कार्यकर्त्यांचा संगम असल्याने, सगळ्यांना सोबत घेऊन काम करतोय. आता विखे कुटुंब हा विषय राहिलेला नाही. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून काम करताना जबाबदारी जास्त आहे.’’

हेही वाचा...

‘‘श्रीगोंद्यातील आगामी निवडणुकांत लक्ष घालणार आहे. आमदार बबनराव पाचपुते यांच्यासोबत या निवडणुका ताकदीनिशी करू. भाजपचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी ताकद लावू. त्यासाठी पक्षाशी बांधिलकी असणाऱ्या कार्यकर्त्यांना एकत्र करून निवडणुका करू. जिल्हा परिषद, पंचायत समितीत जातीने लक्ष घालणार आहे. तालुक्यात दोन सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका आहेत. सहकाराच्या निवडणुकांत राजकारण नसते, स्थानिक पातळीवरील मुद्द्यांवर त्या लढल्या जात आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा झालेली नाही, मात्र तो निर्णय येथील प्रमुखांवर सोडणार आहे,’’ असे त्यांनी सांगितले.

श्रीगोंद्यात आपल्या विचारांना मानणारे दुसऱ्या पक्षातील नेतेही आहेत. त्यांचे कसे करणार, असे विचारल्यावर विखे म्हणाले, ‘‘आपले कोणावरही दडपण राहणार नाही. राजकारणविरहित कोणाचे आमच्या कुटुंबावर प्रेम असेल, तर त्याला कोणाचीही हरकत नाही. मात्र, निवडणका या भाजपच्याच चिन्हावर लढणार असल्याने, आमच्यासोबत कोणी यायचे याचा निर्णय त्यांनी घ्यावा.’’


महामार्गाबाबत नागरिकांच्या म्हणण्याला प्राधान्य; पण...
राष्ट्रीय महामार्गाचे काम फुटपाथ व गटारासाठी बंद पाडले आहे. हे काम सुरू होऊन दीड वर्ष झाले. आजपर्यंत कुठेही अडथळा आला नाही, मग आत्ताच का आला, याचा शोध घेतोय. पालिकेने यापूर्वी रस्ते केले. त्यावेळी फुटपाथ व गटारे का केली नाहीत? आजच हा प्रश्न पुढे कसा आला? या दोन्ही कामांबाबत अतिरिक्त निधीची तरतूद केलेली नाही. नागरिकांची इच्छा असल्यास तो निधी येईपर्यंत काम बंद ठेवू. मात्र, ठेकेदाराचे अन्य काम झाल्यावर तो निघून गेला तर जबाबदारी कुणी घ्यायची? त्यापेक्षा काम होऊ द्या; बाजूचे अतिक्रमण बांधकाम विभाग व पालिकेने एकत्रित काढावे, नंतर फुटपाथ व गटाराचे काम करू. हा मध्यम मार्ग असून, त्याबाबत नागरिक, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करू.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in