सत्तेसाठी तुम्ही उड्या मारणारेच आहात; सुजय विखे यांना नेटकऱ्यांचा टोला 

भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी नगर जिल्ह्यात केलेल्या विधानावरून सोशल मीडियावर त्यांना चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. "एका पक्षाने डावलले की मी दुसऱ्या पक्षात उडी मारतो,' या त्यांनी केलेल्या विधानाचा नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
 MP Sujay Vikhe Patil troll in social media
MP Sujay Vikhe Patil troll in social media

पुणे : भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी नगर जिल्ह्यात केलेल्या विधानावरून सोशल मीडियावर त्यांना चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. "एका पक्षाने डावलले की मी दुसऱ्या पक्षात उडी मारतो,' या त्यांनी केलेल्या विधानाचा नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. "तुम्ही सत्तेसाठी उड्या मारणारेच आहात, तुमच्याकडून आणखी काय अपेक्षा,' अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटल्या आहेत. 

मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना डॉ. विखे-पाटील यांनी सहजपणे हे विधान केले होते. मात्र, या विधानावरून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे. विखे तुम्हाला कसल्या आल्या निष्ठा, सत्तेवरच तुमचे प्रेम. पण तुम्ही ज्यांच्याकडे जाल त्यांची सत्ता जात आहे, असा टोमणा एका नेटकऱ्याने मारला आहे.

नगर जिल्ह्यातील मातब्बर घराणे असलेल्या विखे-पाटील यांचा राजकीय इतिहास आणि त्यांनी शिवसेनेशी केलेल्या सलगीची आठवण नेटकऱ्यांनी करून दिली आहे. मूळच्या कॉंग्रेसच्या असलेल्या विखे-पाटील घराण्याचा राजकीय प्रवासाच्या इतिहासावर अनेकांनी टोमणे मारले आहेत. 

युती सरकारच्या काळात तसेच केंद्रातील लोकशाही आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेत प्रवेश करून राधाकृष्ण विखे तसेच त्यांचे वडील बाळासाहेब विखे-पाटील यांनी राज्यात आणि केंद्रात मंत्रिपद मिळविल्याची आठवण करून देण्यात आली आहे. फडणवीस सरकारच्या काळात विरोधी पक्षनेते म्हणून काय आणि कसे काम केले, तसेच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात कसा प्रवेश केला, याची आठवण करून देण्यात आली आहे. 

फडणवीस सरकारच्या काळात विखे-पाटील पाटील कॉंग्रेस पक्षात होते. ते विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते. सुमारे चार वर्षे त्यांच्याकडे हे पद होते. मात्र, या काळात त्यांनी विरोधी पक्षनेत्याऐवजी सत्ताधाऱ्यांच्या सोयीची भूमिका कायम घेतल्याचा आक्षेप नेहमी घेण्यात येतो.

चार वर्षे सत्ताधाऱ्यांच्या सोयीची भूमिका घेतल्यानंतर मुलगा डॉ. सुजय विखे-पाटील यांना खासदार करण्यासाठी थेट भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्ह्यात आणि विशेषत: स्वत:च्या विधानसभा व लोकसभा मतदारसंघात चांगली पकड असल्याने पक्ष कोणताही असला तरी विखे-पाटील यांना निवडून येण्याची फारशी कधी अडचण आली नाही. 

मतदारसंघाचा पाया भक्कम

थोडक्‍यात राजकारणात यशस्वी होण्यासाठी मतदारसंघाचा पाया भक्कम असण्याची गरज विखे-पाटील यांनी कायम लक्षात ठेवल्याने कोणत्याही पक्षात गेले तरी मतदारसंघात ते विखे-पाटील म्हणून निवडून येतात, ही त्यांची जमेची बाजू आहे. डॉ.सुजय विखे यांनी केलेले वक्तव्य हे त्यांच्या या आत्मविश्‍वासातून आलेले आहे. राजकारणात यशस्वी होण्यासाठी त्यांचा फॉर्म्युला योग्य असला तरी नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com