खासदार डॉ. विखे यांनी आंदोलकांकडे फिरविली पाठ
Sarkarnama (9).jpg

खासदार डॉ. विखे यांनी आंदोलकांकडे फिरविली पाठ

राहुरी फॅक्टरी येथे श्री विवेकानंद नर्सिंग होमच्या सभागृहातआज (मंगळवारी) सकाळी दहा वाजता खासदार डॉ. सुजय विखे यांनी कारखान्याच्या संचालक मंडळाची तब्बल एक तास बैठक घेतली.

राहुरी : डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या दोनशे कामगारांनी वेतन व इतर थकीत २५ कोटी ३६ लाख रुपये मिळण्यासाठी सुरू केलेल्या उपोषण व धरणे आंदोलनावर आज (मंगळवारी) दुसऱ्या दिवशी कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे, आंदोलन सुरूच राहिले. कारखान्याचे सर्वेसर्वा खासदार डॉ. सुजय विखे यांनी आंदोलनकर्त्या कामगारांकडे पाठ फिरविल्याने, कामगारांच्या संतापाचा कडेलोट झाला.  आंदोलक कामगारांनी तीव्र शब्दात खासदार डॉ. विखे यांचा निषेध केला.

राहुरी फॅक्टरी येथे श्री विवेकानंद नर्सिंग होमच्या सभागृहात आज (मंगळवारी) सकाळी दहा वाजता खासदार डॉ. सुजय विखे यांनी कारखान्याच्या संचालक मंडळाची तब्बल एक तास बैठक घेतली.  कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे, माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस व सर्व संचालक बैठकीस उपस्थित होते. कामगारांच्या मागण्यांवर बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली.  परंतु, संचालक मंडळाच्या बैठकीतील तपशील समजला नाही. 

हेही वाचा..

पत्रकारांवर कारवाईचा इशारा...!
कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर खासदार डॉ. विखे यांनी कामगार युनियनचे उपाध्यक्ष अर्जुन दुशिंग, बाळासाहेब ढोकणे, दिलीप कोहकडे, नामदेव धसाळ, कृती समितीचे अध्यक्ष सुरेश थोरात, चंद्रकांत कराळे यांच्यासमवेत संवाद साधला.  युनियनच्या प्रतिनिधींशी अनौपचारिक चर्चा केली आहे. या चर्चेची माझ्या नावावर बातमी प्रसिद्ध करू नये.  अन्यथा, संबंधित पत्रकारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. असा इशारा खासदार डॉ. विखे यांनी उपस्थित पत्रकारांना दिला. 

उद्या (बुधवारी) पत्रकार परिषद...!
कारखान्याच्या आंदोलनकर्त्या कामगारांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.  त्यामुळे,  कारखान्याच्या संचालक मंडळाची भूमिका पत्रकार परिषद घेऊन, माध्यमांसमोर मांडली जाईल.  कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे उद्या (बुधवारी) पत्रकार परिषदेत अधिकृत भूमिका जाहीर करतील. असे खासदार डॉ. विके यांनी पत्रकारांना सांगितले.
 
आंदोलन स्थळाकडे पाठ...!
युनियनच्या प्रतिनिधींशी संवाद साधल्यावर खासदार डॉ. विखे यांनी आंदोलन स्थळा समोरून राहुरीच्या दिशेने प्रयाण केले. त्यांच्या पाठोपाठ कारखान्याचे संचालक मंडळ आपापल्या दिशेने निघून गेले.  आंदोलनस्थळी वाट पाहणाऱ्या कामगारांची पुरती निराशा झाली.  त्यामुळे, कामगारांचा संताप अनावर झाला.  आंदोलन स्थळापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर संचालक मंडळ व युनियनच्या प्रतिनिधींशी चर्चा करून, आंदोलक कामगारांकडे पाठ फिरविल्याने कामगारांनी खासदार डॉ. विखे व संचालक मंडळाचा धिक्कार करून, निषेधाच्या घोषणा दिल्या.

युनियनला कामगारांनी सुनावले..!
युनियनचे उपाध्यक्ष अर्जुन दुशिंग यांनी खासदार डॉ. विखे यांच्यासमवेत झालेल्या चर्चेचा तपशील कामगारांना समोर मांडला.  "खासदार डॉ. विखे येत्या दोन दिवसात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची पुन्हा भेटून, संचालक मंडळाला मुदतवाढ मिळावी. अशी मागणी करणार आहेत. कारखान्याच्या मालकीची जमिनी विक्रीचा प्रस्ताव दीड वर्षांपासून धर्मादाय आयुक्त यांच्याकडे प्रलंबित आहे. त्यावर येत्या दोन दिवसात निर्णय अपेक्षित आहे. पैशांची उपलब्धता होताच येत्या तीन-चार दिवसात खासदार डॉ. विखे आंदोलनस्थळी येऊन, कामगारांशी चर्चा करणार आहेत." असे दुशिंग यांनी सांगितले.


त्यावर कामगारांनी युनियनच्या प्रतिनिधींना धारेवर धरले.  तुम्ही आमच्या बाजूने आहात. की, कारखाना व्यवस्थापनाच्या बाजूने आहात. तुमची भूमिका स्पष्ट करा. अन्यथा चालते व्हा. अशा शब्दात कामगार नेते इंद्रभान पेरणे यांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले. या संदर्भात महाराष्ट्रभर चर्चा आहे.

थकीत वेतन बुडविण्याचा डाव...!
तनपुरे कारखान्याच्या कामगारांची मागील पाच वर्षातील वेतन व इतर थकीत २५ कोटी ३६ लाखांची रक्कम बुडविण्याचा डाव आहे.  त्यामुळे, आंदोलनाकडे पाठ फिरविण्यात आली. खासदार डॉ. विखे यांनी दिलेला शब्द पाळावा. त्यांच्या काळातील थकबाकी अदा करावी.  अन्यथा, आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करु.  आंदोलनाची धार आणखी तीव्र करू. थकीत शेवटचा रुपया घेईपर्यंत आंदोलन थांबणार नाही.  असा इशारा कामगार नेते इंद्रभान पेरणे, सचिन काळे, सीताराम नालकर, राजू सांगळे, बाळासाहेब तारडे, सुरेश तनपुरे, नामदेव शिंदे यांनी दिला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in