jalgaon government medical college dean transferred | Sarkarnama

`कोरोना' संसर्ग रोखण्यात अपयश; जळगावचे `डीन' हटविले

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 मे 2020

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यातील अपयश आणि इतर तक्रारींमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांची बदली करण्यात आली आहे. 

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यातील अपयश, जिल्हा शल्य चिकित्सकांशी असलेला कथित वाद व असमन्वय, त्यामुळे झालेल्या तक्रारींच्या पार्श्‍वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांची बदली करण्यात आली आहे. कोल्हापूर मेडिकल कॉलेजच्या डीन डॉ. मिनाक्षी गजभिये यांची त्यांच्याजागी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. गजभिये या जळगाव कॉलेजचा कायमस्वरुपी अधिष्ठाता म्हणून पदभार स्वीकारतील.

राज्याचे `कोविड- 19`चे नोडल अधिकारी तथा वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी याबाबतचे आदेश आज जारी केले. यासह धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांचीही बदली झाली असून त्यांच्या जागी नगरच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या महिनाभरात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. जळगाव जिल्हा 17 एप्रिलपर्यंत ग्रीन झोनमध्ये होता. मात्र, महिनाभरात कोरोना संसर्गाचा उद्रेक होऊन सद्य:स्थितीत रुग्णसंख्या चारशेपर्यंत जाऊन पोचली आहे.

दोघा अधिकाऱ्यांमध्ये वाद 

अशा स्थितीत आरोग्य यंत्रणेचे प्रमुख म्हणून शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांच्यातील असमन्वय वारंवार समोर आला. दोघांमधील कथित वादाचा मुद्दा जिल्हाधिकारी, पालकमंत्री गुलाबराव पाटलांपर्यंत गेला. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत हा मुद्दा समोर आल्यानंतर त्यांनीही दोघा अधिकाऱ्यांना समज दिली. मात्र, तरीही एकूणच कोरोना नियंत्रणात सुधारणा झालेली नाही. 

.. अखेर बदलीचे आदेश 

दोघा अधिकाऱ्यांमधील वादाबाबत अधिष्ठाता डॉ. खैरे यांच्याविरोधात तक्रारीही झाल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत राज्य शासनाला अहवाल दिला होता. आता नेमका कोरोना संसर्गाचा ठपका ठेवत खैरेंची बदली करण्यात आली आहे. महाविद्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे शनिवारपर्यंत पदभार सोपविण्याचे तसेच नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेशात म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख