आयटी पार्क व कॉल सेंटरमधला फरक आमदारांना कळत नाही हे दुर्दैवी - किरण काळे

काल रात्री उशिराकिरण काळे यांच्यासह आठ ते दहा जणांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात विनयभंग, बळजबरीने कार्यालयात प्रवेश करून दमदाटी करणे या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
kiran kale.jpg
kiran kale.jpg

अहमदनगर : अहमदनगर एमआयडीसीमधील उद्योजकांशी शनिवारी (ता. 28) व रविवारी (ता. 29) महाराष्ट्रातील उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी चर्चा केली होती. त्यावेळी आमदार संग्राम जगताप हेही उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप यांनीच आदिती तटकरे यांना आमंत्रित केले होते.

राज्यमंत्री तटकरे अहमदनगर दौऱ्यावर येण्यापूर्वीच काँग्रेसचे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी महसूल मंत्र्यांसह राज्याच्या उद्योग मंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे अहमदनगर एमआयडीसीतील राजकारण तापणार यांची दाट शक्यता होती. 

तटकरे यांचा दौरा झाल्यावर काल (ता. 2) किरण काळे यांनी अचानक एमआयडीसीतील आमदार संग्राम जगताप यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या आयटी सेंटरला भेट देऊन गंभीर आरोप केले होते.  तसेच काही फोटोही सोशल मीडियावर टाकले होते.

हेही वाचा...

त्यानंतर काल रात्री उशिरा किरण काळे यांच्यासह आठ ते दहा जणांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात विनयभंग, बळजबरीने कार्यालयात प्रवेश करून दमदाटी करणे या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात किरण काळे यांनी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषद त्यांनी आयटी सेंटरला भेट दिलेल्याचा व्हिडिओच दाखवला. तसेच आमदार संग्राम जगताप, त्यांचे कार्यकर्ते व एमआयडीसीतील आयटी पार्कवर गंभीर आरोप केले.

किरण काळे म्हणाले, आमच्यावर झालेले आरोप हे धादांत खोटे असून ही माझी व माझ्या सहकार्‍यांची अग्निपरीक्षा आहे. या अग्नी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आम्ही निर्भिडपणे तयार आहोत. कारण की आम्ही स्वच्छ आहोत. 

हेही वाचा...

मी व माझ्या काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही सहकार्याने काल आयटी पार्कची पाहणी करत असताना कोणत्याही महिलेचा विनयभंग, महिलांना शिवीगाळ, धक्काबुक्की, दमदाटी असे कृत्य केलेले नाही. आयटी पार्कच्या नावाखाली त्या ठिकाणी कॉल सेंटर चालवले जात आहे. या कॉल सेंटरमध्ये आम्ही जबरदस्तीने प्रवेश केलेला नाही. हा प्रवेश त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हरकत नसल्यामुळेच झालेला आहे. जर तशी त्यांना हरकत असती तर त्यांनी तशा पद्धतीने आम्हाला सूचना केल्या असत्या. आम्ही त्या सूचनांचे पालन केले असते. मात्र त्यांनी त्या ठिकाणी आमच्याशी योग्य पद्धतीने संवाद साधला आणि कोणत्याही प्रकारची बाचाबाची अथवा ज्या पद्धतीने फिर्यादीमध्ये उल्लेख केला आहे तशी घटना घडलेली नाही. आम्ही आयटी पार्कची पाहणी करत असताना कोणत्याही महिला अथवा पुरुष शौचालयांमध्ये प्रवेश केलेला नाही. 

आयटी पार्कमध्ये आम्ही प्रवेश केल्यानंतर व तेथे काय केले याचे व्हिडिओ आमच्याकडे आहे. त्यात कोणत्याही महिलेशी चुकीचं वर्तन करताना दिसून आलेले नाहीत. उलट तेथील महिलांशी चांगला संवाद झाला. फिर्यादी भगिनी विषयी आम्हाला राग वाटत नाही कारण फिर्यादीने केलेली तक्रार ही राजकीय दबावातून केलेली आहे. 

आम्ही पोलिसांची भेट घेऊन त्यांना देखील हे सर्व फुटेज उपलब्ध करून देणार असून त्यांच्याकडे कंपनीने दिलेले फुटेज आणि आमचे फुटेज त्याची पडताळणी करून दूध का दूध आणि पाणी का पाणी लवकरच होईल आणि नगरकरा समोर सत्य काय आहे ते येईल. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही ! आमचा कायदा सुव्यवस्था यंत्रणेवर आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. 

माता-भगिनींना, महिलांना, आया-बहिणींना पुढे घालून अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करणे ही या शहराच्या आमदारांना जुनी सवय असून हा त्यांचा जुना धंदा आहे. सन्माननीय आमदार महोदयांनी महिलांना पुढे करण्याऐवजी स्वतः आयटी पार्कला येऊन खुली चर्चा करण्याचे आव्हान काँग्रेसचे स्वीकारले असते आणि त्यातून उत्तरे या शहराला दिली असती तर शहराला आणि या शहरातल्या तरुणाईला बरे वाटले असते. मात्र महिलांना पुढे करणे ही संस्कृती या शहरासाठी घातक आहे. 

मी छत्रपती शिवाजी महाराजांना, राजमाता जिजाऊंना, शाहू-फुले-आंबेडकरांना आणि त्यांच्या संस्कारांना मानणारा माणूस आहे. त्यामुळे ज्या माता-भगिनीने, महिलेने माझ्या विरोधात आणि माझ्या सहकाऱ्यां विरोधात एफआयआर दाखल केली आहे तिचा मला अजिबात कोणताही राग नसून तिच्या बद्दल माझ्या मनात मध्ये द्वेष नसून उलट माझी तिच्याप्रती सहानुभूती आहे.

त्या भगिनीवर राष्ट्रवादीच्या आमदार यांनी तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दबाव टाकून खोटी एफआयआर त्याठिकाणी देण्यासाठी भाग पाडले आहे. कालचा घटनाक्रम समजून घेतला तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, बाळासाहेब जगताप, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, शशिकांत घिगे हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसले होते आणि पोलिसां वर खोटा गुन्हा दाखल करून घेण्यासाठी अनेक वेळा दबाव त्या ठिकाणी आणत होते.

ते तर गुंड
आमची पोलिस प्रशासनाबद्दल कोणत्याही प्रकारची तक्रार नसून पोलिसांवर राष्ट्रवादीच्या आमदारांनी आणि त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी दबाव आणल्यामुळे पोलिसांचा ही कदाचित नाईलाज झाला असावा. ज्या आमदारांनी आणि त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी या देशांमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय फोडण्याचा विक्रम केला आहे अशा आमदारांकडून आणि त्याच्या गुंड कार्यकर्त्यांकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा करणेच चुकीचे आहे.

नगर शहर हे बदनाम नसून नगर शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. संत परंपरेचा जिल्ह्याला वारसा आहे. मात्र दुर्दैवाने नगर शहर हे चुकीच्या कारभाऱ्यांच्या हाती गेले असून नीच पातळीचे राजकारण या शहरामध्ये हे कारभारी करताहेत. हे राजकारणी नसून मूळचे गुंड आहेत. त्यांच्यावर खुनाचे, एसपी ऑफिस हल्ल्याचे गंभीर आरोप आहेत.

आमदार जगतापांना आव्हान
नगरकर जनता सोशिक आहे असा आरोप जनतेवर वारंवार होताना ऐकायला मिळतो. परंतु नगरची जनता सोशीक नसून आता जागरूक होत आहे. येणाऱ्या काळात अशा रावणरुपी प्रवृत्तीचे दहन सामुहिक रित्या कायमस्वरूपी मुळासकट उच्चाटन करण्याची नागरी चळवळ या शहरामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून उभी करण्याचे काम आम्ही निर्भीडपणे करणार आहोत. आयटी पार्क व कॉल सेंटरमधला फरक आमदारांना कळत नाही हे दुर्दैवी आहे. मी स्वतः एम.बी.ए. आहे. आयटी पार्कमध्ये इंग्रजीतून कारभार चालतो. त्यामुळे माझे आमदार संग्राम जगताप यांना खुले आव्हान आहे की, एमआयडीसीतील आयटी संदर्भात इंग्रजीतून माझ्याशी चर्चा करा. 

आज या ठिकाणी पत्रकार परिषदेला सामोरे जाण्यापूर्वी मी या शहराचे माजी आमदार दिवंगत अनिल राठोड यांच्या शिवालय कार्यालय या ठिकाणी माझ्या सहकार्‍यां सह जाऊन त्यांच्या प्रतिमेस वंदन करून आलो आहे. स्व.अनिल राठोड यांनी या शहरामध्ये सतत अन्याय विरुद्ध वाचा फोडत या शहरातील सर्वसामान्य माणसाला प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याची भूमिका सातत्याने घेतली होती आणि त्यांच्या याच मार्गावर मी आणि माझी काँग्रेस सातत्याने काम करत आहे. त्यामुळे आज अनिल भैय्या यांची आठवण होत आहे. मात्र आज जरी ते हयात नसले तरी देखील या शहराला विकासाचा चेहरामोहरा देत असताना सर्वसामान्यांना दहशती पासून संरक्षण देणे हा देखील आमच्या भुमिकेचा मुख्य भाग आहे, असे किरण काळे यांनी स्पष्ट केले.

किरण काळे हे दुपारी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांच्याजवळील व्हिडिओ फुटेज सादर करणार आहेत. तसेच चुकीचे गुन्हे दाखल करायला लावणाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com