शिक्षकांबद्दलचे ते विधान मी केलेलेच नाही - अण्णा हजारे - I have not made that statement about teachers - Anna Hazare | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

शिक्षकांबद्दलचे ते विधान मी केलेलेच नाही - अण्णा हजारे

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 31 ऑगस्ट 2021

त्यांनी शिक्षकांसंदर्भात न बोललेले आक्षेपार्ह वाक्य एका वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले.

अहमदनगर ः राळेगणसिद्धी येथील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे पाणलोट, वनीकरण व भ्रष्टाचार निर्मुलन कामासाठी जगात प्रसिद्ध आहेत. त्यांनी शिक्षकांसंदर्भात न बोललेले आक्षेपार्ह वाक्य एका वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले. त्यामुळे अण्णा हजारे यांच्यावर सोशल मीडियावरून जोरदार टीका होत आहे. समाजातून या संदर्भात उलटसूलट प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे हजारे यांनी प्रसिद्धीपत्रक काढून खुलासा दिला आहे. 

अण्णा हजारे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, औरंगाबाद येथील एका स्थानिक वर्तमानपत्रात ‘नाही तरी शिक्षक शाळेत जाऊन कोणता उजेड पाडतात : अण्णा हजारे’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली बातमी वाचण्यात आली. बातमी वाचून आश्चर्य वाटले. जे विधान मी केलेलेच नाही, ते माझ्या तोंडी घालून समाजात द्वेष भावना निर्माण करण्यासाठी अशी खोटी बातमी प्रसिद्ध करण्यात आली असे वाटते. 

हेही वाचा...

पूरग्रस्तांना वाचविण्यासाठी धावले जिल्हा प्रशासन

यापूर्वीही अनेकदा याच वर्तमानपत्रातून माझ्याबद्दल आणि जन आंदोलनाबद्दल चुकीच्या व खोट्या बातम्या, लेख आलेले आहेत. या पूर्वी त्यांच्यावर कारवाईसंबंधी कायदेशीर नोटीस बजावली होती. ही नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली होती. समाजात शिक्षकाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. देशाचे भवितव्य असलेली नवीन पिढी घडविण्याचे काम शिक्षकच करीत असतात. त्यामुळे समाजात शिक्षकांविषयी आदराची भावना आहे. मीही शिक्षकांविषयी नेहमीच आदर व्यक्त केलेला आहे. परंतु काल प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे मला खेद वाटला. 

हेही वाचा...

नगर शहरातील पुरासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आली तक्रार

संपूर्ण शिक्षक वर्गात संभ्रम निर्माण झाल्याचे सोशल मीडियावर दिसून आले. ही बाब समाजाच्या दृष्टीने चांगली नाही. मी नेहमी सांगत असतो की, दिवसेंदिवस वाढती द्वेषभावना ही समाज व देशासाठी घातक आहे. काही अविचारी लोक समाजात दुही, द्वेषभावना आणि तेढ निर्माण होईल असा प्रयत्न सातत्याने करीत असतात. त्यामुळे समाजाचे मोठे नुकसान होत असते. शिक्षकी पेशा हा एक पवित्र पेशा आहे. शिक्षकांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये. तसेच गैरसमज करून न घेता आपले ज्ञानदानाचे पवित्र काम सुरू ठेवावे, असेही अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख