मला या वादात पडायचं नाही - अण्णा हजारे 

तहसीलदार देवरे यांनी आज सकाळी हजारे यांची भेट घेतली. देवरे यांनी यावेळी हजारेंना राखी बांधली व "तुमचे आशीर्वाद मला असू द्या," अशी विनंती केली
मला या वादात पडायचं नाही - अण्णा हजारे 
WhatsApp Image 2021-08-22 at 5.18.50 PM.jpeg

राळेगणसिद्धी : व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपच्या पार्श्वभूमीवर आज पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी "आत्महत्येचा विचार करणे योग्य नाही. तो डोक्यातून काढून पुढील वाटचाल करा," असा सबुरीचा सल्ला हजारे यांनी यावेळी तहसीलदार देवरे यांना दिला. 

तहसीलदार देवरे यांनी  आज सकाळी हजारे यांची भेट घेतली. देवरे यांनी यावेळी हजारेंना राखी बांधली व "तुमचे आशीर्वाद मला असू द्या," अशी विनंती केली, अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 

हेही वाचा...


त्यावर अण्णा म्हणाले की, खरे तर मला या वादात पडायचे नाही, मात्र जीवनात संकटे येतच असतात. त्याला न घाबरता धैर्याने सामोरे गेले पाहिजे. संकटावर मात केली पाहिजे. कारण मनुष्य जन्म हा एकदाच आहे. आपले चारित्र्य शुद्ध ठेवले आणि तुकाराम मुंढे या अधिकाऱ्यासारखे न डगमगता काम चालू ठेवले तर संकटे आपलं काही करू शकत नाहीत. 

मी माझा संघर्ष लढण्याची तयारी केली आहे. फक्त मला लढ म्हणा व माझ्यावर तुमचा आशीर्वाद कायम असो. मी महिला असल्यामुळे त्रास होतोय कदाचित मी पुरुष असते तर मला त्रास झाला नसता. मी भ्रष्टाचार केलेला नाही तो पुढे जाऊन सिध्द होईल. चौकशी समितीसमोर माझी जायला माझी तयारी आहे. मात्र ती चौकशी वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांकडून व्हायला पाहिजे. 

- ज्योती देवरे, तहसीलदार, पारनेर


काल असे म्हणाले होते अण्णा हजारे
देवरे ऑडिओ प्रकरणी आमदार नीलेश लंके यांनी काल अण्णा हजारे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी तहसीलदार देवरे यांच्या चौकशीचा अहवाल अण्णा हजारे यांना सादर केला होता. त्या वेळी अण्णा हजारे म्हणाले होते की, तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यासंबंधीच्या बातमी टीव्हीवर पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी बोललो आहे. अशा गोष्टींमुळे तालुक्याची बदनामी होत आहे. त्यामुळे असे अधिकारी तालुक्याला नको आहेत तसेच जास्त काळ तालुक्याला ठेवू नयेत, अशा तीव्र शब्दांत हजारे यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी जनतेची सेवा करायला पाहिजे. वेळ पडली तरी मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करील असे अण्णा हजारे यावेळी म्हणाले होते. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in