महाआघाडी फक्त अधिकाऱ्यांच्या बदल्यांत व्यस्त : खासदार डॉ. सुजय विखे पाटील
sujay vikhe.jpg

महाआघाडी फक्त अधिकाऱ्यांच्या बदल्यांत व्यस्त : खासदार डॉ. सुजय विखे पाटील

अहमदनगर शहराबाहेरील बाह्यवळण रस्त्याच्या दुसऱ्या टप्याच्या कामाचे भुमिपूजन खासदार डॉ. विखे पाटील यांनी वाळुंज (ता. अहमदनगर) येथे केले.

अहमदनगर तालुका ः राज्यातील जनता कोरोनाने त्रस्त असताना महाआघाडी सरकार फक्त अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात व्यस्त आहे. एकट्या केंद्र सरकारने अहमदनगर लोकसभा मतदार संघात पाच हजार कोटींची विविध विकास कामे चालू केली आहेत, असे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. 

अहमदनगर शहराबाहेरील बाह्यवळण रस्त्याच्या दुसऱ्या टप्याच्या कामाचे भुमिपूजन खासदार डॉ. विखे पाटील यांनी वाळुंज (ता. अहमदनगर) येथे केले. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी आमदार शिवाजी कर्डिले होते. आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक प्रफूल्ल दिवाण आदी उपस्थित होते.

हेही वाचा...

खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, उत्तर महाराष्ट्रातील आमदारांनी जेवढा निधी आणला नाही, त्यापेक्षा जास्त निधी एकट्या अहमदनगर लोकसभा मतदार संघात आणला. सूरत-हैदराबाद महामार्गावर नगर तालुक्यातील ९ गावांची १४९ हेक्टर जमीन भूसंपादित होणार आहे. महामार्गावर 3 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. या महामार्गामुळे अहमदनगर शहराचा आणि अहमदनगर तालुक्याचा विकास होईल. 
कर्डिले म्हणाले, या बाह्यवळण रस्यावरील विळद ते चांदबिबी महाल दरम्यान सात उड्डाणपुले होणार असून या १ हजार २६ कोटी रुपयातील सहाशे कोटी प्रत्यक्ष कामावर तर चारशे कोटी भूसंपादनाच्या कामावर खर्च होणार आहेत. 

आमदार संग्राम जगताप म्हणाले, अहमदनगरच्या बाह्यवळण रस्त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. बाह्यवळणाच्या चौपदरी करणामुळे अपघातास आळा बसेल. या वेळी आमदार बबनराव पाचपुते यांनी ही आपले मन व्यवत केले. खासदार डॉ. विखे पाटील यांचा वाळुंज ग्रामस्थ व बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे व संतोष म्हस्के यांनी सत्कार केला.

नगर शहर हे मराठवाडा, विदर्भ व दक्षिण भागात जाणाऱ्या महामार्गाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. या भागातून होणाऱ्या जड वाहतुकीचा शहराच्या विविध भागावर मोठा ताण पडून वाहतूक कोंडी होणे ही कायमची समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी शहराबाहेरून केंद्रशासनातर्फे बाह्यवळण (रिंगरोड) चा प्रकल्प हाती घेतला. यासाठी एक हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात डांबरीकरण, चौपदरीकरण ही कामे केली जाणार आहेत. या बाह्यवळण रस्त्यावर नगर-मनमाड रस्ता, नगर-कल्याण रस्ता, नगर-पुणे रस्ता, नगर-दौंड रस्ता, नगर-सोलापूर रस्ता, नगर-जामखेड रस्ता व नगर-औरंगाबाद रस्ता या प्रमुख रस्त्यांना हा बाह्यवळण रस्ता क्रॉस करणार आहे. मुंबईच्या जी. एच. व्ही. या कंपनीकडे या बाह्यवळण रस्त्याच्या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्यास यश आले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in