अहमदनगर जिल्हा विभाजनाची नांदी?

श्रीरामपूर, शिर्डी अथवा संगमनेरला जिल्ह्याचे ठिकाण करावे अशीमागणी होत आहे. त्यासाठी कृती समित्याही कार्यरत आहेत. संगमनेरला प्रशाकीय महत्त्व वाढविण्याच्या दृष्टीने महसूल मंत्री थोरात यांना महत्त्वाचे काम केले आहे.
अहमदनगर जिल्हा विभाजनाची नांदी?
balasaheb thorat.jpg

संगमनेर ः अहमदनगर हा राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याचे विभाजन व्हावे अशी मागणी नेहमीच सुरू असते. जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारला तसा प्रस्तावही गेलेला आहे. मात्र प्रत्यक्षात जिल्हा विभाजन झालेले नाही. श्रीरामपूर, शिर्डी अथवा संगमनेरला जिल्ह्याचे ठिकाण करावे अशी मागणी होत आहे. त्यासाठी कृती समित्याही कार्यरत आहेत. संगमनेरला प्रशाकीय महत्त्व वाढविण्याच्या दृष्टीने महसूल मंत्री थोरात यांना महत्त्वाचे काम केले आहे. 

सर्वाधिक वाहन संख्या असलेले संगमनेर जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. सध्या श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कामकाजासाठी संगमनेर व अकोले पासून दूर असल्याने गैरसोयीचे आहे. त्यामुळे संगमनेरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेतला असून, याबाबत मंत्रालयातील त्यांच्या दालनात बुधवार ( ता. 25 ) रोजी परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन आयुक्त अविनाश ढोकणे आदींच्या उपस्थितीत बैठक झाली. 

हेही वाचा...

त्यानुसार याबाबत लवकर प्रस्ताव सादर होणार आहे. कार्यालय व वाहन चाचणी ट्रॅकसाठी आवश्यक असलेली जागा त्वरीत उपलब्ध करुन देण्याची ग्वाही मंत्री थोरात यांनी दिली आहे. त्यामुळे राज्याच्या परिवहन नोंदणीतील एमएच. 51 हा नवीन क्रमांक मिळण्याची संगमनेरकरांची जुनी मागणी पूर्ण होण्याचे संकेत मिळाले आहेत. 

1987 च्या सुमारास संगमनेरात सुरु होणारे उपप्रादेशिक कार्यालय तांत्रिक कारणे व जागेच्या अनुपलब्धतेमुळे बारगळले होते. सुमारे तीन दशकांच्या प्रतिक्षेनंतर ही मागणी प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता आहे. याबाबत आवश्यकता वाटल्यास शासन धोरणात बदल करण्याचे संकेत परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत. तालुक्याची लोकसंख्या व वाढती वाहनसंख्या पाहता दर आठवड्याला संगमनेरात वाहन नोंदणी शिबिर घेण्यात येणार आहे.

हेही वाचा...

जिल्ह्यात सर्वाधिक पुढारलेल्या संगमनेर तालुक्यातील उपलब्ध संसाधने, कृषीक्षेत्रातील प्रगती, पाण्याची उपलब्धता व व्यवस्थापनातून संगमनेरची बाजारपेठ समृध्द झाली आहे. सहकारातून झालेली आर्थिक प्रगती, शिक्षण, आरोग्य विषयक बाबींची महानगरांच्या धर्तीवरील उपलब्धता, सामाजिक व सुरक्षित वातावरण यात संगमनेर तालुका वैभवशाली आहे. 

दोन वर्षांच्या कोविडकाळात येथील सुसज्ज आणि परिपूर्ण आरोग्य व्यवस्थेने जिल्ह्यात दबदबा निर्माण केला आहे. त्यातच जिल्ह्यात यापूर्वीची नगर ( एमएच 16 ) व श्रीरामपूर ( एमएच. 17 ) अशी दोन उपप्रादेशिक परिवहन कार्यालये अस्तित्वात असताना, संगमनेरात होऊ घातलेले तिसरे कार्यालय जिल्हा मुख्यालयाच्या दिशेने होणारा प्रवास दर्शवीत असल्याने, जिल्हा विभाजनासाठी प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

दोन वर्षापूर्वी संगमनेर जिल्हा मागणी कृती समितीने आंदोलनाच्या माध्यमातून संगमनेर मुख्यालयाची मागणी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रत्यक्ष हा विषय पोहोचवण्यात कृती समितीला यश मिळाले होते. राज्यातील सत्तांतरानंतरही आंदोलनाची ही धग कायम होती. विभाजनाला पोषक खाते नामदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे आल्याने त्याचा फायदा संगमनेर मुख्यालयासाठी होण्याची दाट शक्यता आहे. शहरातील वैभवशाली मध्यवर्ती बसस्थानक, आगामी रेल्वेमार्ग, भव्य न्यायालय, प्रशासकिय भवन, प्रशस्त रस्ते या सुविधा पाहता हा प्रवास जिल्हा विभाजनानंतर मुख्यालयाच्या दिशेने जात असल्याचे संकेत आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in