तंटामुक्ती समितीच्या निवडीत महिला सरपंचाचा विनयभंग - Disrespect of a woman sarpanch in the election of a dispute resolution committee | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

तंटामुक्ती समितीच्या निवडीत महिला सरपंचाचा विनयभंग

रावसाहेब चक्रे
गुरुवार, 9 सप्टेंबर 2021

श्रीगोंदे तालुक्यातील उक्कडगाव येथे काल (ता. 8) ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांची निवड होती.

देवदैठण : गावात वाद होऊ नये. सलोख्याचे वातावरण रहावे यासाठी प्रशासनाकडून प्रत्येक गावात तंटामुक्ती समिती स्थापन करण्यास सांगण्यात आले आहे. या समितीने गावात भांडण-तंटे होऊ नये यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. पण काही गावात ही समितीच राजकीय भांडणाचे कारण ठरत आहे, असाच काहीसा प्रकार श्रीगोंदे तालुक्यात झाला.   

श्रीगोंदे तालुक्यातील उक्कडगाव येथे काल (ता. 8) ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांची निवड होती. कोरोनामुळे येथील महादेव मंदिराच्या प्रांगणात ही सभा झाली. सभेत दिलीप कातोरे यांनी अनिल दशरथ महाडीक यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचविले. महिला असलेल्या तेथील सरपंचांनी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदासाठी गणेश महाडीक यांचे नाव जाहीर करताच, अध्यक्षपद आम्हाला मान्य नाही, असे म्हणत विरोधी गटाने गोंधळ घातला. यात महिला सरपंचांना धक्काबुक्की व विनयभंग केल्याची फिर्याद आहे.

हेही वाचा...

आमदार रोहित पवारांनी पावसाच्या पाहणीसाठी चालविला ट्रॅक्टर

विलास तुकाराम महाडीक, राहुल सोपान महाडीक, नितीन सोपान महाडीक, संकेत भीमक महाडीक, अनिल दशरथ महाडीक, राजू बाबूराव कातोरे, दशरथ बापूराव कातोरे, दिलीप कौशीराम कातोरे आदींनी गोंधळ घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सरपंचांनी त्यांना शांत राहण्यास सांगितले. अर्ध्या तासासाठी सभा तहकूब करून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. सरपंच ग्रामपंचायत कार्यालयात जात असताना विलास तुकाराम महाडीक यांनी पाठीमागून येऊन त्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा...

zp सभेत वाकचौरेंकडून भांडाफोड : प्रकरण मंजुरीसाठी चालविला ट्रॅक्टर

उपसरपंच बापू कातोरे, विश्वास कातोरे व सदस्य प्रसाद महाडीक यांनी, सरपंचांना शिवीगाळ करू नका, असे म्हणताच दोन्ही गटांत बाचाबाची झाली. ग्रामविकास अधिकारी राजू विधाते यांनी दोन्ही गटांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विरोधी गटातील उमेदवार निघून गेले. दरम्यान, गणेश महाडीक यांची अध्यक्षपदी, तर गणेश सीताराम कातोरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. घडलेल्या प्रकाराबाबत सरपंचांनी बेलवंडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

तंटामुक्ती अध्यक्षांची निवड जनतेतून व्हावी, ही आमची इच्छा आहे. आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही. तेथे फक्त बाचाबाची झाली. दिलेली फिर्याद ही राजकीय द्वेषातून देण्यात आली आहे. तसे काही घडलेले नाही.
- विलास महाडीक, ग्रामस्थ, देवदैठण
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख