शिस्तीचे धडे देणाऱ्यांकडून होतेय बेशिस्तीचे दर्शन

जिल्हा प्राथमिक बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत बोलण्यास प्रवेश नाकारल्याने विरोधी गटाच्या सभासदांनी आंदोलन करून निषेध केला. या वेळी घोषणाबाजीही केली.
शिस्तीचे धडे देणाऱ्यांकडून होतेय बेशिस्तीचे दर्शन
andolan.jpg

अहमदनगर ः शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे देणाऱ्या गुरुजनांना मात्र जिल्हा प्राथमिक बॅंकेच्या सभच्या वेळी मात्र त्यांना या शिस्तीच्या धड्यांचा विसर पडत आहे. कोविड काळात शिक्षकांकडून मदत करण्यात आलेली आहे. समाजात आज पुन्हा शिक्षकांची प्रतिमा चांगली झालेली आहे. मात्र बॅंकेमुळे कायमच प्रतिमा मलिन होत आहे. ही प्रतिमा मलिन होऊ नये, म्हणून बॅंकेच्या संचालक मंडळाने ऑनलाईन सभेत विरोधकांसह इतर सभासदांना बोलण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे प्रतिमा मलिन होणे टळले.

जिल्हा प्राथमिक बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत बोलण्यास प्रवेश नाकारल्याने विरोधी गटाच्या सभासदांनी आंदोलन करून निषेध केला. या वेळी घोषणाबाजीही केली. तसेच प्रतिसभा घेतली. या सभेत अनेक मान्यवरांनी भाषणे केली. मात्र या भाषणा दरम्यान, काहींनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. या वेळीकाहींचे शब्द पातळी घसरल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे देणारे हेच ते शिक्षक आहेत का? असा प्रश्‍न यावेळी शिक्षकांमधून उपस्थित करून शब्द पातळी घसरणाऱ्यांवर टीका करण्यात आली. 

शिक्षक बँकेतील ज्येष्ठ नेते डॉ. संजय कळमकर म्हणाले, अतिदक्षता विभागात असलेल्या शिक्षकाला आपण कर्ज देत नाही. पण मृत्यूनंतर मात्र त्याचे कर्ज माफ करून त्याच्या कुटुंबाला १५ लाखाची मदत करतो. त्यापेक्षा तो अतिदक्षता विभागात असतानाच त्याचा जीव वाचविण्यासाठी १५ लाखातील त्याला रक्कम द्यावी. सुदैवाने त्या सभासदाचे प्राण वाचल्यास त्याच्याकडून कर्ज दिले म्हणून वसूल करावे. दुर्दैवाने मृत्यू झाल्यास नंतर त्याला १५ लाखापेक्षा कमी मदत करावी. आपली बॅंक जिवंत सभासदांपेक्षा मृत्यू झाल्यानंतर जास्त फायदा देत आहे. याचा विचार कोठे तरी झाला पाहिजे. ५०० रुपये कपात करताना ते सेवानिवृत्तीला सभासदास परत मिळावे, कोविड काळ गेल्यानंतर इतक्या निधीची गरज बॅंकेस पडणार नाही. बॅंक भावनेवर न चालवता व्यवहार्य व सभासद हिताच्या दृष्टीने चालवावी.

हेही वाचा...

राज्य संघटक, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राजेंद्र निमसे यांनी सांगितले की, सत्ताधारी संचालक मंडळाने विरोधकांच्या विरोधाला घाबरून व त्यांना मत व्यक्त करण्याची संधी मिळू नये, म्हणून प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या हॉलमध्ये सभा घेण्याऐवजी पंचतारंकित हॉलेमध्ये आॅनलाइन सभा घेऊन वारेमाप खर्च करत शिक्षक बॅंकेची पत घालवली आहे. बॅंकेच्या या संचालक मंडळाने याची जबाबदारी स्वीकारून संचालक पदाचा राजीनामा देण्याबाबत जिल्हा उपनिबंधक (सहकार) यांना निवेदन देणार आहे. 

शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी बॅंकेतील सत्ताधाऱ्यांनी घड्याळ घोटाळा व इतर घोटाळे केलेले आहे. ते झाकण्यासाठी बंद दाराआड सभा घेण्यात आलेली आहे. सत्ताधाऱ्यांनी केलेल्या घड्याळ घोटाळ्या संदर्भात आपण औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे. या सभेबाबत आपण जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रारही करणार आहे, असे स्पष्ट केले.

रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे यांनी बॅंकेतील सत्ताधारी घोटाळे बाज असून त्यांचे घोटाळे उघडे होऊ नये, म्हणून ते विरोधी गटाच्या सभासदांना मते मांडण्यापासून वंचित ठेवत आहेत. बॅकेतील सत्ताही तालिबानी सरकारसारखी आहे. त्यांचा कारभार सभासदांसमोर मांडून त्यांची सत्ता उधळून लावणार आहे, अशी घनाघाती टीका केली.  

शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संजय धामणे यांनी तर सभासदांच्या विश्‍वासाला पात्र हे सत्ताधारी राहिलेले नाहीत. त्यामुळे या संचालक मंडळाने राजीनामे देऊन बाजूला होणे गरजेचे आहे. कोविडमुळे या संचालक मंडळाला मुदत वाढ मिळालेली आहे. त्यांनी चांगले काम करण्याऐवजी सभासदांच्या खिशावर डल्ला मारण्याचे काम केले आहे, असा आरोप केला. शिक्षक नेते नवनाथ आडसूळ यांनी तर सत्ताधाऱ्यांनी सभासदांची दिशाभूल केलेली असून त्यांनी स्वतःचा स्वार्थ साधण्यास सुरवात केलेली आहे. या संचालक मंडळाने तातडीने राजीनामे द्यावे, असे सांगितले. 

शिक्षक बँकेचे अध्यक्ष सलिमखान पठाण यांनी सभा आॅनलाइन घेण्यात आल्यामुळे सभागृहात येऊन बोलण्यास मज्जाव करण्यात आलेला होता. सर्वांना आॅनलाइन बोलण्यास पाच मिनिटांचा वेळ देण्यात आलेला होता. सर्वसाधारण सभासद ते नेते असा सर्वांना सारखा वेळ दिलेला होता, असा खुलासा केला आहे. 

शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे यांनी शासनाच्या आदेशानुसार ऑनलाइन सभा घेण्यात आलेली आहे. राज्यातील सर्व संस्थांच्या सभा सध्या ऑनलाइन सुरु आहेत. ज्यांनी ज्यांनी बोलण्याची परवानगी संचालक मंडळाला मागितली. त्यांना बोलण्याची संधी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व सभासद बॅंकेच्या कारभारावर व आजच्या सभेवर समाधानी आहेत. विरोधकांना गोंधळ घालता न आल्याचे दुःख झाल्याने त्यांच्याकडून बेताल आरोप सुरु आहेत, असे सांगत विरोधकांवर टीका केली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in