'देवरे यांचा आता आत्महत्येचा विचार नाही'

तहसीलदार देवरे यांच्या ऑडिओ संदर्भात चौकशी करण्यासाठी व त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी जिल्हा पोलिसांचे एक पथक पारनेरला गेले होते.
'देवरे यांचा आता आत्महत्येचा विचार नाही'
jyoti devare.jpg

अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या एका ऑडिओ क्लिपमुळे राज्यात खळबळ उडाली असून पारनेरच्या लोकप्रतिनिधीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी या क्लिपमध्ये दिला आहे. यात त्यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख हा तेथील आमदार नीलेश लंके यांच्यावर असल्याचे त्यांनी वर्णन केलेल्या प्रसंगातून दिसून येते. या प्रकरणी आमदार नीलेश लंकेही आक्रमक झाले असून त्यांनी देवरे यांच्या भ्रष्टाचाराची कागदपत्रेच अण्णा हजारे यांच्या समोर सादर केली. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी देवरे यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी एक पथक देवरे यांच्या भेटीला पाठवले होते. 

तहसीलदार देवरे यांच्या ऑडिओ संदर्भात चौकशी करण्यासाठी व त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी जिल्हा पोलिसांचे एक पथक पारनेरला गेले होते. या संदर्भात पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना प्रश्न विचारले असता ते म्हणाले, तहसीलदार देवरे यांच्या ऑडिओ क्लिप संदर्भात यापूर्वीच पोलिस निरीक्षकांनी त्यांची भेट घेतली होती. यात देवरे यांनी मी आत्महत्या करणार नाही असे सांगितले होते. आज पुन्हा आमच्या गृह विभागाच्या पोलिस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे यांनाही त्यांच्याकडे पाठविले होते. सोनवणे यांची देवरे यांच्याशी चर्चा झाली. देवरे यांनी स्पष्टपणे मी असे काही करणार नाही. मी माझे कार्यालयीन कामकाज करत आहे. माझा आता असा कोणताही विचार नाही. माझ्याकडून आत्महत्येच्या विचारात काही बोलले गेले होते पण माझ्या डोक्यात असे काही विचार सध्या नाहीत, असे देवरे यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाने सहकार्य करण्याची अपेक्षाही देवरे यांनी आमच्याकडे दाखविली आहे, असे पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा..

जिल्हाधिकाऱ्यांनीही नेमले चौकशी पथक
तहसीलदार देवरे ऑडिओ प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी एक त्रिसदस्यीय समिती तयार केली आहे. या समितीत पुनर्वसन उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ या अध्यक्ष आहेत तर सदस्य म्हणून महसूल उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील व सामान्य प्रशासन विभागाच्या तहसीलदार वैशाली आव्हाड सदस्य आहे. 

देवरे यांच्या समर्थनात संघटना
देवरे यांच्या समर्थनात महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने मुख्यमंत्री व राज्याच्या मुख्य सचिवांना निवेदन पाठविले आहे. यात देवरे प्रकरणी राज्यस्तरावरून वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेली स्वतंत्र समिती तात्काळ स्थापन करून या समिती मार्फत पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्र्यांसह पाच मंत्र्यांना निवेदन देऊन देवरे यांचा सातत्याने मानसिक छळ करून त्रास देणाऱ्या सामाजिक व राजकीय घटकांवर कारवाई तसेच देवरे कुटुंबीयांना संरक्षणाची मागणी केली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in