गर्दी तिकडे आणि मतदान इकडे होईल ः खासदार विखे पाटील

कर्जत नगरपंचायतची निवडणूक डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे
गर्दी तिकडे आणि मतदान इकडे होईल ः खासदार विखे पाटील
sujay vikhe and rohit pawar.jpg

अहमदनगर ः राज्य निवडणूक आयोगाने निकतीच कर्जत नगर पंचायत निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाला तयारीला लागण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे कर्जतमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. ही नगर पंचायत भाजपच्या ताब्यात आहे. ती राष्ट्रवादी काँग्रेसला मिळवून देण्यासाठी आमदार रोहित पवार प्रयत्न करत आहेत. कर्जत तालुक्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आमदार पवार यांना ही नगर पंचायत निवडणूक महत्त्वाची आहे. तर भाजपला आमदारकी गमावल्यावर किमान हे नगर पंचायत टिकविण्याचे आव्हान आहेत.

हेही वाचा...


कर्जत नगरपंचायतची निवडणूक डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नुकतेच कर्जतमध्ये येऊन गेले. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकारी व नगरसेवकांशी चर्चा केली होती. चंद्रकांत पाटील जाताच आमदार रोहित पवार यांनी कर्जतमधील भाजपच्या चाणक्य समजले जाणाऱ्या प्रकाश ढोकरीकरांसह चार जणांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला. त्यामुळे नगर पंचायत निवडणुकीपूर्वी भाजपला कर्जतमध्ये मोठे खिंडार पडले आहे.

भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील काल (ता. 31) एका लसीकरण केंद्राच्या कार्यक्रमानिमित्त कर्जत तालुक्यात आले होते. तेव्हा त्यांना भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, नगरसेवक लालासाहेब शेळके, देविदास खरात आणि नगरसेविका मंगल तोरडमल यांचे पुत्र नितीन तोरडमल यांनी आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथे सृजन हाऊसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याबाबत खासदार डॉ. विखे पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न केले.

हेही वाचा...

यावर खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, ते गेले की पाठविले, याबाबत निरीक्षण करावे लागेल, मात्र गर्दी तिकडे आणि मतदान इकडे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आगामी नगरपंचायत निवडणुकीत जिल्हा बँकेची पुनरावृत्ती होईल. पानगळ झाली की नवीन पालवी फुटते. हा निसर्गाचा नियम आहे. भाजप हा देशव्यापी सर्वात मोठा पक्ष असून, तो वाढीमध्ये गेलेल्यांचे योगदान मोठे आहे, हे नाकारून चालणार नाही. ते जेथे गेले आहेत, तेथे प्रामाणिकपणे राहत तो पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत, अशी आशा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली. 

या वेळी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर, युवक नेते दादासाहेब सोनमाळी, किसान सेलचे सुनील यादव, सरपंच काकासाहेब धांडे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in