वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरेंची पारनेरमधून बदली

देवरे यांच्या बदलीचा आदेश आज राज्य शासनाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांना काढला आहे.
वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरेंची पारनेरमधून बदली
jyoti devare.jpg

अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यात त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदार नीलेश लंके व जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले होते. या भावनिक क्लिपमुळे राज्यातील राजकारण तापले होते. आमदार लंकेंवर भाजपकडून आरोप करण्यात आले होते. देवरे यांच्या विरोधात वातावरण तापले होते. देवरे यांच्या संदर्भात भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होते त्याचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी विभागीय आयुक्तांना पाठविला होता. तसेच क्लिपची चौकशीचा अहवालही वरिष्ठांना पाठविला होता. त्यानुसार देवरे यांच्या बदलीचा आदेश आज राज्य शासनाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांना काढला आहे. त्यानुसार देवरे यांची बदलीचा आदेश निघाला आहे.

शासनाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. बदलीच्या ठिकाणी हजर न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचेही आदेशात सांगण्यात आले आहे. त्यामुळे ज्योती देवरे व नीलेश लंके यांच्या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. देवरे यांची जळगाव येथील संजय गांधी योजना कार्यालयात बदली करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या सहसचिवांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी राज्य महिला आयोग यांच्याकडे, तसेच नाशिक विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्याबाबतचे निर्देश नाशिक विभागीय आयुक्तांनी अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना 24 ऑगस्टला देण्यात आले होते.  त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणी नियुक्त केलेल्या तीन महिला अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीने अहवाल सादर केलेला आहे. तसेच, तहसीलदार ज्योती देवरे यांनी नाशिक विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून अहवाल करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार केलेल्या चौकशी अहवालांनुसार तहसीलदार देवरे यांनी केलेल्या तक्रारीत कोणतेही तथ्य आढळून आलेले नाही.

देवरे यांच्या विरुध्द अरुण आंधळे व निवृत्ती कासुरे यांनी महसूल मंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सादर केलेल्या अहवालानुसार, तहसीलदार देवरे यांनी गंभीर स्वरुपाच्या अनियमितता केलेल्या असल्याने, तसेच अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन पदाचा दुरुपयोग केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. देवरे यांनी समाजमाध्यमे, वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये भाष्य केल्याने जनमानसात शासनाची प्रतिमा मलीन झालेली आहे.

त्यामुळे तहसीलदार देवरे यांनी शासकीय कर्तव्ये व जबाबदाऱ्या तत्परतेने पार पाडलेल्या नाहीत. विभागीय आयुक्तांच्या अहवालानुसार देवरे यांची बदली करण्यात येत आहे, असे आदेशात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in