प्रा. राम शिंदे व समर्थकांकडून लोकसहभागातून 166 आॅक्सिजन सिलिंडर - 166 oxygen cylinders from public participation by Ram Shinde and supporters | Politics Marathi News - Sarkarnama

प्रा. राम शिंदे व समर्थकांकडून लोकसहभागातून 166 आॅक्सिजन सिलिंडर

वसंत सानप
बुधवार, 14 एप्रिल 2021

कोविड सेंटरसाठी विनामूल्य उपचार घेऊन बरे झालेले शेतकरी घरी गेल्यानंतर स्वयंस्फूर्तीने अन्न धान्याचा पुरवठा करीत आहेत.

जामखेड : शहरातील कोविड सेंटरला समाजातून मदतीचा हात मिळत असताना भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे व त्यांच्या समर्थकांनी लोकसहभागातून 166 ऑक्‍सिजन सिलिंडर नुकतेच दिले आहेत. त्यामुळे रुग्णांची मोठी सोय झाली आहे. 

ग्रामीण आरोग्य प्रकल्पांतर्गत हे सेंटर सुरू असून, या प्रकल्पाचे संचालक डॉ. रवी आरोळे आणि डॉ. शोभा आरोळे ही भावंडं कोविड सेंटरचे काम पाहतात. शासनाच्या माध्यमातून तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी पी. पी. कोकणी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे हे समन्वयकाच्या भूमिकेतून नियोजनात सक्रिय आहेत. 

मंत्री शिंदे यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आणि ते पुन्हा सक्रीय झाले आहेत. जामखेड भाजपच्या वतीने 71 सिलिंडरचा पुरवठा संबंधित कोविड सेंटरला केला. नगरपालिकेच्या पाणीपुरवठा समितीचे सभापती अमित चिंतामणी यांनी स्वतःच्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळून 40 सिलिंडरचा पुरवठा केला. ज्योतीक्रांती मल्टिस्टेटचे अध्यक्ष आजिनाथ हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी 55 सिलिंडर दिले. 

सिलिंडरची हवी मदत 

येथील कोविड सेंटरला दररोज 90 ऑक्‍सिजन सिलिंडरची गरज पडते. येथील गरज लक्षात घेऊन विविध क्षेत्रातील दानशुरांनी, संस्थांनी मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे. तसेच येथील विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर जनरेटरकरीता इंधनाची गरज आहे. त्यासाठी पेट्रोलपंप चालकांनी मदत करावी, अशी अपेक्षा कोविड सेंटरच्या व्यवस्थापनेकडून होत आहे. 

शेतकरी करतात अन्नधान्य पुरवठा 
कोविड सेंटरसाठी विनामूल्य उपचार घेऊन बरे झालेले शेतकरी घरी गेल्यानंतर स्वयंस्फूर्तीने अन्न धान्याचा पुरवठा करीत आहेत. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र सुरवसे, तालुकाध्यक्ष अजय काशीद, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काशीद, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, भाजीपाला व्यापारी संघटनेने यांनीही कोविड सेंटरला अन्नधान्य, किराणा, भाजीपाला व इतर अनुषंगिक साहित्याचा पुरवठा केला आहे. 
 

 

Edited By- Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख