वाहन कायद्यातील दंडाची रक्कम वाढणार? - Vehicle fine may be increased Hints Anil Parab | Politics Marathi News - Sarkarnama

वाहन कायद्यातील दंडाची रक्कम वाढणार?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 20 जानेवारी 2021

बेशिस्त वाहनचालकांसह भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्रीय मोटारवाहन कायदात बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने नवीन मोटार वाहन कायदा लागू केला; मात्र राज्य सरकारने यावर अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही

मुंबई  : बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन कायद्यात बदल करण्यात आले आहेत. या बदलांची अंमलबजावणी लवकरच राज्यात होण्याची शक्‍यता आहे. यासंदर्भात देशातील सर्व परिवहन मंत्र्यांची दिल्लीत दोन दिवस बैठक आहे. त्यानंतर राज्यातील वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम वाढवण्याच्या निर्णयाचे संकेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले.

बेशिस्त वाहनचालकांसह भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्रीय मोटारवाहन कायदात बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने नवीन मोटार वाहन कायदा लागू केला; मात्र राज्य सरकारने यावर अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही; मात्र दंडवाढीसह नवीन सुधारणांचा राज्य सरकार अभ्यास करीत असून, त्यावर लावकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, राज्यात खासगी, सार्वजनिक आणि माल वाहतूक चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी ५० प्रशिक्षण संस्था उभारण्याचा निर्धार परिवहन मंत्र्यांनी रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्‌घाटनामध्ये व्यक्त केला. यासोबतच वाहनचालकांच्या डोळ्यांची तपासणी आणि शारीरिक प्रकृती तपासण्यासाठी आयटी विभागाची मदत घेतली जाणार आहे. चालकांप्रमाणेच वाहनांचे फिटनेस तपासणे, वाहनचालक परवाना देताना मानवी हस्तक्षेप न होता स्वयंचलित चाचणी घेण्यासाठी आयटी विभागाची मदत घेतली जात असल्याचीही माहिती परब यांनी दिली.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख