मुख्यमंत्री म्हणतात, विद्यापीठ परीक्षांबाबतची चिंता दूर करा 

एकाही विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यासाठी नेमकी परीक्षा पद्धती आणि वेळापत्रक निश्‍चित करावे. त्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील चिंता दूर करावी. त्यादृष्टीने विविध पर्याय पडताळून पाहण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. अंतिम वर्षासाठी सर्व वर्षांच्या सत्रांच्या सरासरी इतके गुण किंवा श्रेणी प्रदान करण्याची तसेच श्रेणी सुधारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
Uddhav Thackeray discusses with university vice chancellors about exams
Uddhav Thackeray discusses with university vice chancellors about exams

मुंबई ः एकाही विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यासाठी नेमकी परीक्षा पद्धती आणि वेळापत्रक निश्‍चित करावे. त्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील चिंता दूर करावी. त्यादृष्टीने विविध पर्याय पडताळून पाहण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

अंतिम वर्षासाठी सर्व वर्षांच्या सत्रांच्या सरासरी इतके गुण किंवा श्रेणी प्रदान करण्याची तसेच श्रेणी सुधारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. 

कोरोना विषाणूच्या संकटाला संधी मानून महाराष्ट्रातील प्राथमिक ते उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यातील प्रादेशिक विषमता संपविण्यासाठी प्रयत्न करण्याचे, नव्या शिक्षण पद्धतीबाबत संशोधन करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. 

विद्यापीठांच्या परीक्षा तसेच शैक्षणिक वर्षांबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक घेण्यात आली. तीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव अजोय मेहता, विभागाचे सचिव सौरभ विजय, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ आदी सहभागी झाले. 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आगामी शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू करायचे, याबाबत विविध प्रस्ताव तयार केले जात आहेत. पण आता परीक्षांबाबतची अनिश्‍चितता संपविण्याचा विषय प्राधान्याने हाताळावा लागणार आहे. राज्यातील विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील परीक्षेच्या अनिश्‍चिततेची भीती संपविण्याच्या दृष्टीने नियोजन करावे लागणार आहे. जुलैमध्ये परीक्षा शक्‍य नाही, हे स्पष्ट होऊ लागले आहे. 

तंत्रज्ञानाचा वापर करून या संकटाचे संधीत रुपांतर करता येईल का, याचा विचार करायला हवा. परीक्षा वेळेवर होऊ शकलेल्या नाहीत; म्हणून अनेक हुशार विद्यार्थी चिंतेत आहेत. त्यामुळे पर्यायाचा आणि नेमक्‍या पद्धतीचा विचार करू. एकाही विद्यार्थ्याला संसर्ग होणार नाही, याची काळजी घेऊन परीक्षा घेऊ. सरासरी गुण किंवा श्रेणी, तसेच रोजगार किंवा उच्च शिक्षणासाठी किंवा पुढील प्रवेशासाठी आवश्‍यक असलेले गुण/श्रेणी मिळविण्यासाठी परीक्षा देण्याची ऐच्छिक सुविधा यांसह विविध पर्याय पडताळून पाहण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. 

शिक्षणाच्या दर्जात समानता हवी 

"परदेशात ज्या पद्धतीने शिक्षण चालते. खास करून विद्यापीठांमध्ये कसे शिकवले जाते. त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्याठिकाणची शिक्षण पद्धती आपल्याकडे कशी आणता येईल, यासाठी प्रयत्न करावे लागतील. महाराष्ट्रात शिक्षणाच्या दर्जामध्ये सगळीकडे समानता असायला पाहिजे. शिक्षण सुलभ कसे करता येईल, यावर जोर द्यावा लागेल. ग्रामीण भागातील गुणी विद्यार्थ्याला परिस्थितीमुळे मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी शिकता आले नाही; म्हणून अन्याय होऊ नये. अशी व्यवस्था तयार करायला हवी. शिक्षणाचा दर्जा उंचावून त्याला संधी द्यायला हवी, असेही त्यांनी सांगितले. 

डिजिटल माध्यमाचा विचार व्हावा 

आगामी काळात अशी संकट येऊ शकतील, याचा विचार करून शिक्षण, उद्योग, आणि कार्यालये सुरु राहतील अशी पद्धती विकसित करावी. जग थांबता कामा नये. आपल्याकडे सुविधा पूर्ण असायला हव्यातच. त्यासाठी उत्तम कनेक्‍टिव्हिटी वाढविता येईल का याचा विचार करावा. शिक्षण हे जीवनावश्‍यक आहे. आपली मुले शिकत राहिली पाहिजेत. त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. शिक्षण सुलभतेने घरच्या घरी कसे दिले जाईल. त्यासाठी ई-लर्निंग, डिजिटल क्‍लास रूम्स अशा पर्यांयाचही विचार करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. 

विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचाही विचार : सामंत 

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी परीक्षा वेळेत घेण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची आणि नियोजनाची माहिती दिली. ते म्हणाले, कुलगुरूंसमवेत बैठका घेण्यात आल्या आहेत. तसेच वारंवार चर्चा करण्यात येत आहेत. त्या-त्या प्रदेशातील परिस्थिती समजावून घेतली जात आहे. यात विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचाही विचार केला जात आहे. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून प्रयत्न करतो आहोत. परीक्षा घ्याव्यात याच दृष्टीने पर्यांयाचा विचार केला जात आहेत. 

आरोग्याची काळजी घेऊनच नियोजन : तनपुरे 

राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, विद्यार्थी आणि पालकांच्या सातत्याने संपर्कात आहोत. परीक्षा व्हाव्यात असेच प्रयत्न आहेत. पण यातही विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊनच नियोजन करावे लागेल. त्यामध्ये अन्य नामांकित संस्थांनी कोणकोणते पर्याय अवलंबले याचाही विचार करता येऊ शकेल. 

ऑनलाइन शिक्षणपद्धती विकसित करावी लागेल : मेहता 

मुख्य सचिव मेहता म्हणाले, परीक्षा सुरळीतपणे व्हाव्यात, यासाठी सर्वतोपरी असे नियोजन असेल. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची चिंता दूर करण्याचा निश्‍चितच प्रयत्न करण्यात येईल. त्यासाठी नवनवीन पद्धती शोधू. चांगले गुणवत्ताधारक विद्यार्थी आहे, त्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही. याशिवाय आता क्‍लासरूम टिचिंगचे स्वरूप कसे राहील, यासाठी विद्यापीठांनी संशोधन करावे, डिजिटल टिचिंग, ऑनलाइन शिकविण्याची पद्धती विकसित करावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. 

या बैठकीत विविध विषयांच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विविध विद्यापीठांचे कुलगुरू तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, कोविड-19च्या अनुषंगाने विद्यापीठीय परीक्षांबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर आदी सहभागी झाले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com