Thane News Police in City And Outskirts Getting Affected By Corona Virus | Sarkarnama

कोरोनाच्या विळख्यात रक्षक... अब तक ९६; उपनिरीक्षकासह आणखी १० पोलिस कर्मचाऱ्यांना लागण

सरकारनामा ब्युरो
रविवार, 24 मे 2020

ठाण्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून मागील दहा दिवसांत एक हजारच्या आसपास कोरोनाबाधितांची भर पडली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या संसर्गाची बाधा सर्वसामान्यांसह थेट रस्त्यावर येऊन लढणाऱ्या रक्षकांनादेखील होऊ लागली आहे

ठाणे : कोरोना लढ्यात योद्‌ध्याप्रमाणे लढणाऱ्या ठाणे शहर पोलिस दलातील ९६ रक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात, शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत एका उपनिरीक्षकासह आणखी दहा पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. कोरोनाची बाधा झालेल्यांमध्ये एका सहाय्यक पोलिस आयुक्तांसह एकूण १२ अधिकारी आणि ८४ कमर्चाऱ्यांचा समावेश आहे.

या सर्वांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आतापर्यंत एका पोलिस महिलेचा मृत्यू झाला असला, तरी तब्बल ४३ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्या दोन कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केले असून ६५ जणांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे.

ठाण्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून मागील दहा दिवसांत एक हजारच्या आसपास कोरोनाबाधितांची भर पडली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या संसर्गाची बाधा सर्वसामान्यांसह थेट रस्त्यावर येऊन लढणाऱ्या रक्षकांनादेखील होऊ लागली आहे. ठाणे, वागळे इस्टेट, भिवंडी आणि उल्हासनगर या चार परिमंडळातील १२ पोलिस ठाण्यांसह मुख्यालय, क्‍युआरटी (शीघ्रकृती दल), बीडीडीएस आणि मालमत्ता (प्रॉपर्टी सेल) गुन्हे शाखेच्या पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. 

सुदैवाने, कल्याण परिमंडळात अद्याप कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. शुक्रवार व शनिवार या दोन दिवसांत एक उपनिरीक्षक (प्रशासन) व रिडर ब्रॅंचचे सहाय्यक फौजदारासह कळवा पोलिस ठाण्यातील चार, वर्तकनगर, शिळ डायघर, क्‍युआरटी, मालमत्ता गुन्हे शाखा प्रत्येकी एक आणि सुरक्षा विभागातील महिला पोलिसाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्याने सर्वांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुख्यालयासह १२ पोलिस ठाण्यात संसर्ग

पोलिस मुख्यालयासह १२ पोलिस ठाण्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ठाणे महापालिका परिसरातील पोलिसांची संख्या सर्वाधिक आहे. यात कळवा, मुंब्रा, ठाणे नगर, वागळे इस्टेट, कोपरी, कासारवडवली, कापूरबावडी, वर्तकनगर, नौपाडा, नारपोली, अंबरनाथ आणि मध्यवर्ती पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांसह मुख्यालय, नियंत्रण कक्ष, प्रशासन, विशेष शाखा, प्रॉपर्टी सेल, इंक्रोचमेन्ट, क्‍युआरटी, सुरक्षा विभाग आणि रिडर ब्रॅंच या विभागातील पोलिसांना लागण झाली आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख