ठाण्यातील आठ हजार खाटा नक्की गेल्या कोठे? नगरसेवकाचा आयुक्तांना सवाल

ठाणे शहरात सध्या 'कोरोना'च्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये खाटा मिळत नसल्याचे चित्र आहे. एखाद्या रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानंतरच तेथे अत्यवस्थ स्थितीतील रुग्णांना दाखल केले जाते; तर बेडअभावी सौम्य लक्षणे असलेल्या अनेक रुग्णांवर घरातच उपचार सुरू असल्याचे समजते
Thane Corporation Questions about Availability of Beds for Corona Patients
Thane Corporation Questions about Availability of Beds for Corona Patients

ठाणे : कोरोनाबाधित रुग्णांसाठी तत्काळ खाटा उपलब्ध होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. महापालिकेने अधिग्रहित केलेल्या रुग्णालयांतील बेडची संख्या केवळ एक हजार ८८ आहे. मात्र, आयुक्त विजय सिंघल यांनी फेसबुकवरील मुलाखतीत जाहीर केल्यानुसार ठाणे शहरातील आठ हजार खाटा कोठे आहेत, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे. महापालिका प्रशासनाकडून केवळ आकड्यांची धूळफेक केली जात आहे का, अशी शंकाही पवार यांनी व्यक्त केली आहे.

ठाणे शहरात सध्या 'कोरोना'च्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये खाटा मिळत नसल्याचे चित्र आहे. एखाद्या रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानंतरच तेथे अत्यवस्थ स्थितीतील रुग्णांना दाखल केले जाते; तर बेडअभावी सौम्य लक्षणे असलेल्या अनेक रुग्णांवर घरातच उपचार सुरू असल्याचे समजते. ठाणे महापालिकेच्या वतीने www.covidbedthane.in ही वेबसाईट तयार करण्यात आली. या ठिकाणी उपलब्ध खाटांबाबत रुग्णांना थेट माहिती मिळते. मात्र, प्रत्यक्षात तेथे गेल्यानंतर महापालिकेच्या संमतीशिवाय दाखल केले जाणार नसल्याचे सांगण्यात येते. त्यातून रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ उडत आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.

काही रुग्णालयांचे क्रमांकही टाकण्यात आलेले नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे, असे नारायण पवार यांनी आयुक्त सिंघल यांना ई-मेलद्वारे पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. महापालिकेच्या वेबसाईटवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये २७०, कौशल्य हॉस्पिटलमध्ये ९१, वेदांत रुग्णालयात ११६, सफायर हॉस्पिटलमध्ये १३७, काळसेकर हॉस्पिटलमध्ये १४०, होरायझॉन प्राईममध्ये ५६, ठाणे हेल्थ केअरमध्ये ३९, टायटन हॉस्पिटलमध्ये ५१, मेट्रोपॉल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व वेदांतमध्ये प्रत्येकी ४७, लाईफ केअरमध्ये २४, सिद्धिविनायक मॅटर्निटी ऍण्ड जनरल हॉस्पिटलमध्ये ५० आणि पाणंदीकर हॉस्पिटलमध्ये २० जागांची तरतूद असल्याचे सांगण्यात आले, असे पवार यांनी नमूद केले आहे.

दोन हजार खाटांची आवश्यकता

''अशा प्रकारे शहरात केवळ एक हजार ८८ खाटा उपलब्ध असल्याचे दिसून येते. क्वारंटाईन केंद्र व हॉटेलांच्या माध्यमातून एक हजार ३६७  खाटा उपलब्ध आहेत. अशा पद्धतीने केवळ सुमारे अडीच हजार खाटा उपलब्ध आहेत. ठाणे महापालिकेतर्फे ५ जून रोजी जारी केलेल्या विशेष आरोग्य बुलेटिनमध्ये ठाणे महापालिका क्षेत्रात ३ हजार ६८२ रुग्ण आढळल्याचे नमूद केले आहे. त्यातील ४६ टक्के म्हणजे एक हजार ६७० रुग्ण घरी पाठविले असून, दोन हजार १२ रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत पालिका क्षेत्रातील दोन हजार १२ रुग्णांसाठी खाटांची आवश्‍यकता आहे,'' असे पवार यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

तपशील जाहीर करा

महापालिका क्षेत्रात ८  हजार खाटा उपलब्ध असल्याचे आयुक्तांनी म्हटले; परंतु अजूनही रुग्णांना खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. मग त्या खाटा नक्की कुठे आहेत, याचा तपशील आयुक्त विजय सिंघल यांनी जाहीर करावा, अशी मागणी नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com