ST starts service in 31 divisions | Sarkarnama

लालपरीची 31 विभागांत सेवा सुरू 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 23 मे 2020

लॉकडाउनमुळे गेली दोन महिने बंद असलेले एसटीचे (राज्य परिवहन महामंडळ) चाक शुक्रवारपासून (ता. 22) पुन्हा धावू लागले आहे. राज्यातील रेड झोन व कंटेनमेंट झोन वगळता एसटी महामंडळाच्या 31 विभागांनी शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून एसटीच्या फेऱ्या सुरू केल्या.

मुंबई : लॉकडाउनमुळे गेली दोन महिने बंद असलेले एसटीचे (राज्य परिवहन महामंडळ) चाक शुक्रवारपासून (ता. 22) पुन्हा धावू लागले आहे. राज्यातील रेड झोन व कंटेनमेंट झोन वगळता एसटी महामंडळाच्या 31 विभागांनी शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून एसटीच्या फेऱ्या सुरू केल्या.

दिवसभरात 457 निवडक मार्गांवर एसटी बसच्या 2606 फेऱ्या झाल्या. त्यातून 11 हजार 151 प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत प्रवास केला. मजूर, शेतकरी, सरकारी कर्मचाऱ्यांसह अनेकांनी या सेवेचा लाभ घेतला. आपली लाडकी लालपरी पुन्हा रस्त्यावर धावू लागल्याने अनेक प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. 

एसटीच्या विभागनिहाय फेऱ्या व प्रवासी संख्या

विभाग   फेऱ्या प्रवासी संख्या
पुणे  288 752
नाशिक  420 1159
नागपूर  599 3225
अमरावती 378 1872
मुंबई  205 893
औरंगाबाद  716 3251
एकूण  2606 11152

 

एसटी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन मिळणार ः परब 

मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभरातील एसटीची (राज्य परिवहन महामंडळ) सेवा पूर्णपणे बंद होती, त्यामुळे आधीच आर्थिक तोट्यात असलेल्या एसटीकडे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठीही पुरेसे पैसे नव्हते.

अखेर राज्य सरकारने एसटीला सवलत प्रतिपूर्ती रकमेतून 250 कोटी रुपये दिले. मात्र, वेतनाचा निर्णय जाहीर न झाल्याने महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजाची भावना होती. अखेर शुक्रवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना 100 टक्के पगार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर केले. 

एसटी कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याच्या 7 तारखेला होतात. मात्र, एप्रिल महिन्याचा पगार अद्याप न झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांमधून चिंता व्यक्त करण्यात येत होती. राज्यातील एसटीची सेवा पूर्णपणे बंद असतानाही मुंबईतील अत्यावश्‍यक सेवेसाठी एसटी बस धावत होत्या.

अशा परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्याने राज्य एसटी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र एसटी कॉंग्रेस इंटक, एसटी कर्मचारी कॉंग्रेस आणि एसटी कामगार सेनेने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे संपूर्ण पगार देण्याची मागणी केली होती. 

राज्य सरकारने एसटीला सवलत प्रतिपूर्ती रकमेतून 250 कोटी रुपये दिले, त्यामुळे परिवहन मंत्री परब यांनी एसटी संघटनांची ही मागणी मान्य केली. एसटीचे गैरहजर कर्मचारी, सुटीवर असणारे आणि सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा संपूर्ण पगार मिळणार आहे. एसटी महामंडळाने तसे आदेशही दिले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख