जूनमध्ये शाळा नकोच; पालकांचा कडाडून विरोध; मुख्यमंत्री कार्यालयात ई-मेलद्वारे तक्रारी

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू करायचे, यावर सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाला मार्गदर्शक सूचना पाठवण्यास तज्ज्ञांनी सुरुवात केली आहे.
Parents opposing Opening of Schools in June
Parents opposing Opening of Schools in June

कल्याण : येत्या १५ जूनपासून शाळा सुरू करण्याचा मानस शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला होता; मात्र या भूमिकेला पालकांसह शिक्षणतज्ज्ञांनी तीव्र विरोध केला आहे. या पार्श्‍वभूमीवर जूनमध्ये शाळा सुरू करायची की नाही? शाळेत पाळावयाचे नियम, शिक्षणपद्धती याबाबत आपली मते मुख्यमंत्री कार्यालयात ई-मेलद्वारे पाठवायला तज्ज्ञांनी सुरुवात केली आहे. 

जूनमध्ये शाळा सुरू करणे शक्‍य नसल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले आहे, तर लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने जून महिन्यात आम्ही मुलांना शाळेत पाठवणारच नाही, अशी ठाम भूमिका पालकांनी घेतली आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू करायचे, यावर सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाला मार्गदर्शक सूचना पाठवण्यास तज्ज्ञांनी सुरुवात केली आहे. 

यामध्ये जूनपासून शाळा सुरू न करता दोन महिने कोरोना आजाराची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असे मत सरकारकडे नोंदविले जात आहे. ऑगस्टपर्यंतही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नाही तर वेगळा विचार करा, अशा सूचनाही केल्या आहेत. काहींनी सप्टेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू करून ८० वार्षिक सुट्यांपैकी ७५ सुट्या रद्द कराव्यात; जेणेकरून अभ्यासक्रम पूर्ण करता येईल, असे मतही नोंदवले आहे.

काय आहेत समस्या?

- लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी
- शाळेत पुस्तक, वह्यांची वारंवार हाताळणी
- सोशल डिस्टन्सिंगचे आव्हान
- विद्यार्थ्यांचे तोंड, डोळे, नाकाला नकळत हात लावणे
- जनजागृतीचे आवाहन

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सरकारने बस सेवा सुरू करावी. जूनमध्ये शाळा सुरू करण्याची घाई करू नये, असे मत सरकारला ईमेलद्वारे कळविले आहे. संघटना स्तरावर काम करणारे तज्ज्ञही मेलद्वारे आपल्या सूचना सरकारकडे मांडत असल्याने यावर योग्य निर्णय सरकार घेईल, ही अपेक्षा आहे. - गुलाबराव पाटील, मुख्याध्यापक, कल्याण

आणखी काही दिवस शाळा बुडाली तरी चालेल. जूनमध्ये शाळा सुरू होण्याबाबत पालकांमध्ये संभ्रमाचे आणि भीतीदायक वातावरण आहे; मात्र तूर्तास मुलांना शाळेत न पाठवण्यावर पालकवर्ग ठाम आहे -प्रियांका वाराणकर, पालक, डोंबिवली

शिक्षणमंत्र्यांनी एखादा मानस व्यक्त करण्यापूर्वी आरोग्य, गृह इतर खात्यांशी चर्चा करावी. यंदाचे वर्ष हे आर्थिक संकटाचे आणि जीव वाचवण्याचे आहे. शाळा सुरू करण्याची घाई करू नये; कारण पावसाळ्यात साथीच्या रोगांचाही प्रादुर्भाव होतो. त्यामुळे नवीन समस्या निर्माण होतील. रेड झोनमधील शाळांचाही प्रश्‍न मोठा असून, याबाबत ई-मेलद्वारे सरकारला कळविले आहे - सुधीर घागस, सचिव, महाराष्ट्र राज्य, शिक्षण क्रांती संघटना

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com