एमपीएससीच्या तारखा जाहीर; मार्च, एप्रिल मध्ये होणार परीक्षा  - MPSC Exams will be held in March and April | Politics Marathi News - Sarkarnama

एमपीएससीच्या तारखा जाहीर; मार्च, एप्रिल मध्ये होणार परीक्षा 

ब्रिजमोहन पाटील
सोमवार, 11 जानेवारी 2021

राज्यसेवा पूर्व परीक्षा १४ मार्च रोजी होईल, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २७ मार्च रोजी होईल तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची परीक्षा ११ एप्रिल रोजी होणार आहे असे आयोगाने काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे. 

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती आणल्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. अखेर आयोगाने या परीक्षांच्या तारखा आज (सोमवारी) जाहीर केल्या. मार्च आणि एप्रिल महिन्यात तीन परीक्षा होणार आहेत.

राज्यसेवा पूर्व परीक्षा १४ मार्च रोजी होईल, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २७ मार्च रोजी होईल तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची परीक्षा ११ एप्रिल रोजी होणार आहे असे आयोगाने काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे. 

मराठा आरक्षणावर स्थगिती येण्यापूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षा ११ आॅक्टोबर, १ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची परीक्षा २२ नोव्हेंबर रोजी होणार होती. या तीन परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या होत्या. पुढच्या परीक्षा कधी होणार याबाबत विचारणा सुरू होती.  

दरम्यान, राज्य सरकारने शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया व नोकरभरती मार्गी लावण्यासाठी एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना  आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (ईडब्लूएस) प्रवर्गातून लाभ देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एमपीएससीने परीक्षांसाठी 'एसईबीसी' प्रवर्गातून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना 'इडब्ल्यूएस' किंवा खुल्या प्रवर्गाचा पर्याय निवडण्याची सूचना आयोगाने केली आहे. त्यासाठी १५ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

मराठा संघटनांनी आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही तो पर्यंत परीक्षा घेऊन नये अशी मागणी केली होती, पण विद्यार्थ्यांनी परीक्षा घ्यावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून लावून धरली आहे. त्यावर अखेर एमपीएससीने निर्णय घेतला आहे. 

एमपीएससीने तिन्ही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही यासाठी पाठपुरावा करत होतो आयोगाने हाताची वेळापत्रक निश्चित केले आहे त्यामध्ये कोणताही बदल करू नये अशी आमची अपेक्षा आहे त्यांच्या तारखा जाहीर केल्याबद्दल आयोगाच्या अभिनंदन 
- महेश घरबुडे , विद्यार्थी

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख