Many Doctors are Off Duty in Nagpur's MAYO Hospital | Sarkarnama

कोरोना व्यतिरिक्त अन्य रुग्णांचे नातेवाईक नागपूरच्या रुग्णालयात शोधताहेत डाॅक्टर!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 जून 2020

औषधवैद्यक, श्‍वसनरोग आणि बधिरीकरणशास्त्र विभागातील डॉक्‍टरांची भूमिका कोरोनाच्या उपचारांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे या विभागातील सर्वच निवासी डॉक्‍टर, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक कामावर असल्याचे दिसून येते. इतर आजारांवर उपचार करणारे डॉक्‍टर मात्र सापडत नाहीत, असे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आ

नागपूर  : कोरोना संकट आल्यापासून बाह्यरुग्ण विभागासह अनेक वॉर्डांमध्ये कोरोनावर उपचार करणारे डॉक्‍टर कोविड वॉर्डात दिसतात. मात्र, मेडिकलमधील अनेक वॉर्डांमध्ये डॉक्‍टरही दिसत नाहीत आणि रुग्णही दिसत नाहीत, अशी परिस्थिती आहे. कोरोनाच्या काळात अनेक डाॅक्टर सेवेतून बाजूला असल्याचे दिसून येते आहे. केवळ डाॅक्टरच नव्हे तर अनेक कर्मचारीही गैरहजर असल्याची चर्चा मेयो-मेडिकलच्या आवारात होताना दिसते.

साहेब, पोराले भोवळ आली. तो पडला. हाड मोडलं. तालुक्‍यातील डॉक्‍टरकडे नेलं परंतु त्यांनी मेडिकलमध्ये पाठवलं. येथी आलो... परंतु डॉक्‍टर खुर्चीत दिसले नाही. कोणालेही विचारलं तर डॉक्‍टर आले नाही, हेच सांगतात...साहेब डॉक्‍टरला सुटी आहे का? आता लेकराले कोठी घेऊन जाऊ...ही व्यथा अनेक पालकांची आहे. कोरोनाच्या संकटकालात मेडिकल, मेयोतील औषधवैद्यक, श्‍वसनरोग, बधिरीकरण तसेच कान नाक घसा विभागातील डॉक्‍टर सोडून इतर विभागाच्या बाह्यरुग्ण कक्षात डॉक्‍टर दिसत नाही. कोरोनामुळे या डॉक्‍टरांना सुटी दिली का? असा प्रश्‍न खुद्द रुग्णाचे नातेवाईक विचारत आहेत.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणारी सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये शासनाने कोविड रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. या सर्वच रुग्णालयांत कमी-अधिक प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा आकडा मुंबई, पुणे, अकोला, अमरावती, नाशिक, नागपूरसह इतरही काही शहरात वाढताना दिसतो आहे. साहजिकच मेडिसीन, श्‍वसनरोग, भुलतज्ज्ञ तसेच कान नाक घसा रोग या शाखांतील डाॅक्टर अधिक ताणाखाली काम करत आहेत.

अनेक डाॅक्टर न सांगताच सुटीवर

औषधवैद्यक, श्‍वसनरोग आणि बधिरीकरणशास्त्र विभागातील डॉक्‍टरांची भूमिका कोरोनाच्या उपचारांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे या विभागातील सर्वच निवासी डॉक्‍टर, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक कामावर असल्याचे दिसून येते. इतर आजारांवर उपचार करणारे डॉक्‍टर मात्र सापडत नाहीत, असे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. अनेक डाॅक्टरांनी प्रशासनाला कल्पना न देताच कामावरुन दूर राहणे पसंत केल्याचीही चर्चा आहे. या संदर्भात प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 

नॉन-क्‍लिनिकल विभागातील डाॅक्टरांना शिकवण्याशिवाय इतर फारसे काम नसते. यामुळे नॉनक्‍लिनिकल डॉक्‍टर आपल्या खुर्चीत दिसतात.  दुसरीकडे सूक्ष्मजीव शास्त्र, जीवरसायन शास्त्र विभागातील डॉक्‍टरांकडे विषाणू प्रयोगशाळेत नमूने तपासण्याची जबाबदारी असल्याने ते प्रयोगशाळेत काम करताना आढळून येतात.रुग्णांच्या रक्तासह इतर काही तपासणी करण्याचा भार  विकृतीशास्त्र विभागातील डॉक्‍टरांवर आहे. सरकारी रुग्णालयातील डॉक्‍टर, परिचारिकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम पीएसएम विभागातील डॉक्‍टरांकडून सातत्याने सुरू आहे, असेही सांगण्यात आले आहे.

परिचर म्हणतात....आताच होते...

सकाळी डाॅक्टर येऊन हजेरी लावतात आणि तास-दोन तास थांबतात. त्यानंतर मात्र ते अचानक गायब होतात. रुग्णाचे नातेवाईक साहजिकच परिचरांना डाॅक्टरांबद्दल विचारणा करतात. ''आत्ताच इथं होते....बहुदा वाॅर्डात गेले असतील,'' असे ठराविक साचाचे उत्तर मिळते. नातेवाईक वाॅर्डात जाऊन पाहून येतात. पण डाॅक्टर सापडत नाहीत. मग मात्र परिचरांची पंचाईत होते. नागपूरच्या सुपर स्पेशालिटीसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतही हेच चित्र असल्याचे दिसते.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख