एसटीच्या आंतरराज्य वाहतुकीस पुण्यात प्रारंभ - Maharashtra State Transport Buses started playing inter State also | Politics Marathi News - Sarkarnama

एसटीच्या आंतरराज्य वाहतुकीस पुण्यात प्रारंभ

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

बसमध्ये प्रत्येकाला मास्कची गरज भासेल. बसमध्ये सॅनिटायझर असेल. तसेच प्रत्येक फेरीनंतर बसचे सॅनिटाझेशन होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड आणि विभागीय वाहतूक व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर रणभरे यांनी दिली. या बस रोज सुटणार आहेत. त्याचे आरक्षण आगाऊ पद्धतीने प्रवाशांना उपलब्ध असेल

पुणे :  पुणे शहरातील शिवाजीनगर आणि स्वारगेट तर पिंपरी चिंचवडमधून स्थानकातून एसटी महामंडळाकडून आंतरराज्य वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना इंदोर, पणजी, सुरत, विजापूर, बिदर, गुलबर्गा, गाणगापूर आदी ठिकाणी जाण्यासाठी रोज बस उपलब्ध झाल्या आहेत. या बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना कोणत्याही पासची गरज भासणार नाही. तसेच एसटी महामंडळाच्या जुन्याच दराने बस वाहतूक होणार आहे. 

मात्र, बसमध्ये प्रत्येकाला मास्कची गरज भासेल. बसमध्ये सॅनिटायझर असेल. तसेच प्रत्येक फेरीनंतर बसचे सॅनिटाझेशन होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड आणि विभागीय वाहतूक व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर रणभरे यांनी दिली. या बस रोज सुटणार आहेत. त्याचे आरक्षण आगाऊ पद्धतीने प्रवाशांना उपलब्ध असेल.

शिवाजीनगर स्थानकातून इंदोर, पणजी, सुरतसाठी बस सुटेल. पणजीसाठी स्लीपर कोच बस असेल. सकाळी साडेपाच आणि सायंकाळी साडेसात वाजता ती सुटेल. त्यासाठी 795 रुपये तिकिट असेल. लहान मुलांसाठी 400 रुपये तिकिट असेल. इंदोरसाठी साधी बस सकाळी सहा वाजता तर, सुरतसाठी निमआराम बस सकाळी आठ वाजता सुटेल. त्यासाठी अनुक्रमे 720 आणि 645 रुपये तिकिट असेल. लहान मुलांसाठी अनुक्रमे 365 आणि 325 रुपये तिकिट असेल.

पिंपरी चिंचवड स्थानकातून विजापूरसाठी सकाळी सात वाजता तर, गाणगापूरसाठी सकाळी आठ वाजून 45 मिनिटांनी बस सुटेल. या दोन्ही मार्गांवरील बस साध्या असून त्यांच्यासाठी अनुक्रमे 450 आणि 490 रुपये तिकिट असेल.

स्वारगेटवरून बिदर, गुलबर्गा, विजापूर, आणि गाणगापूरसाठी रोज बस सुटेल. अनुक्रमे सकाळी साडेसहा, नऊ आणि साडेआठ वाजता त्या सुटतील. चारही मार्गांवरील बस साध्या असतील. त्यासाठी अनुक्रमे 575, 490, 430 आणि 465 रुपये तिकिट असेल. लहान मुलांसाठी अनुक्रमे 295, 250, 220 आणि 235 रुपये तिकिट असेल.

पुणे शहरातून कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यासाठी त्यांना या पूर्वी रेल्वे किंवा खासगी बसवर अवलंबून राहवे लागत होते. आता त्यासाठी एसटी महामंडळाच्या बस सुरू झाल्या आहेत. त्यामुळे तेथील प्रवाशांनाही पुण्यात येण्यासाठी पर्याय उपलब्ध झाले आहेत.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख