खूशखबर ः शेतकऱ्यांना मिळणार आता ऑनलाइन तारण कर्ज

शेतकऱ्यांना गोदाम पावतीवर ऑनलाइन पद्धतीने तारण कर्ज उपलब्ध होण्यासाठी राज्य वखार महामंडळ व राज्य सहकारी बॅंकेच्या वतीने ऑनलाइन तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे,
 Farmers will now get online mortgage loans
Farmers will now get online mortgage loans

कऱ्हाड ः लॉकडाउनच्या काळात शेतमाल बाजारपेठेत नेताना अडचणी आल्यास अथवा शेतमालास योग्य किंमत मिळत नसल्यास शेतकऱ्यांना नजीकच्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामांत मालाची साठवणूक करता येणार आहे. तसेच, प्राप्त गोदाम पावतीवर ऑनलाइन पद्धतीने तारण कर्ज उपलब्ध होण्यासाठी राज्य वखार महामंडळ व राज्य सहकारी बॅंकेच्या वतीने ऑनलाइन तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. 

दरम्यान, ऑनलाइन तारण कर्ज ही योजना तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार आहे. त्यासाठीचा प्रतिसाद पाहून अन्य बॅंकांच्या माध्यमातूनही सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. 

मंत्री पाटील म्हणाले की, राज्य वखार महामंडळाची राज्यात विविध ठिकाणी गोदामे आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत अन्नधान्य, शेतमाल, औद्योगिक मालाची मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यात येते. गोदामातील साठवणुकीवर वखार मंडळ पावती देते. संबंधित वखार पावती वखार अधिनियम 1960 नुसार पराक्रम्य असून त्यावर बॅंकेमार्फत तारण कर्ज उपलब्ध होते. वखार पावतीवर शेतकऱ्यास प्रत्यक्ष बॅंकेत जाऊन विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. 

या नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत शेतकरी वखार महामंडळाच्या संगणकीय प्रणालीच्या आधारे ऑनलाइन पद्धतीने बॅंकेस तारण कर्जासाठी आवश्‍यक ती कागदपत्रे सादर करू शकतात. तसेच, मोबाईल ऍपच्या आधारे मराठीतही अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. स्मार्ट फोनद्वारे शेतकऱ्यांना आवश्‍यक कागदपत्रे स्कॅन करुन पाठवता येतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा बॅंकेत जाण्याचा वेळ आणि पैसेही वाचतील. 

बाळासाहेब पाटील म्हणाले, तारण कर्जाचा नऊ टक्के व्याज दर असून अन्य बॅंकेच्या तुलनेत हा सर्वात कमी आहे. तारण कर्जाची मर्यादा प्रति शेतकरी पाच लाख इतकी आहे. वखार महामंडळाकडून शेतकऱ्यांना साठवणूक भाड्यात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. या योजनेमुळे ज्या वेळी संबंधित शेतीमालाचा भाव बाजारात पडलेला असेल, त्या वेळी तो गोदामात साठवून ठेवता येईल आणि बाजारभावात वाढ होईल, त्या वेळी शेतकऱ्यांना तो विक्रीसाठी नेता येईल. 

या योजनेतंर्गत तारण कर्ज देणे, त्याची परतफेड, सध्याचा बाजार भाव, उपलब्ध अन्न धान्याचा साठा या बाबी ऑनलाइन होणार असल्याने शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. ऑनलाइन तत्काळ कर्ज उपलब्ध झाल्याने शेतकरी बांधवांच्या वेळेची तसेच कागदपत्रांसाठीच्या प्रवास खर्चात बचत होईल, असा विश्वासही मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com