कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनाच प्रसिद्धीचा हव्यास ः धनंजय महाडिक  - Dhananjay Mahadik criticizes Satej Patil | Politics Marathi News - Sarkarnama

कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनाच प्रसिद्धीचा हव्यास ः धनंजय महाडिक 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 23 मे 2020

पैशाच्या जोरावर वाटेल ते करू शकतो, अशी भावना असणारे आणि परप्रांतीय मजुरांना जेवण देतानाचे फोटो झळकवणारे इव्हेंट करत नाहीत का? रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरसुद्धा ज्यांनी स्वत:ची छबी असणारी पोस्टर चिकटवली, त्यांनी दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करावे.

कोल्हापूर ः पैशाच्या जोरावर वाटेल ते करू शकतो, अशी भावना असणारे आणि परप्रांतीय मजुरांना जेवण देतानाचे फोटो झळकवणारे इव्हेंट करत नाहीत का? रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरसुद्धा ज्यांनी स्वत:ची छबी असणारी पोस्टर चिकटवली, त्यांनी दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करावे, असा टोला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना नाव न घेता लगावला. 

महाराष्ट्र बचाव आंदोलनानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. कोरोना हे संकट आहे, इव्हेंट नव्हे, अशी टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर केली होती. त्यावर प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी प्रत्युत्तर दिले. 

महाडिक म्हणाले,"पालकमंत्र्यांनाच प्रसिद्धीचा हव्यास आहे. गेली दोन महिने चंद्रकांत पाटील कोठे होते, असा सवाल काही राजकीय नेतेमंडळी करत आहेत. पण प्रत्येक आमदारांनी आपापल्या मतदार संघात थांबणे आवश्‍यक होते. त्यामुळे ही टीका निरर्थक आहे. शिवाय ज्यांनी गेल्या आठ-दहा दिवसांत रेल्वेने जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांना दिलेल्या जेवणाच्या डब्यावरसुद्धा स्वत:चे फोटो झळकवले, मग तो इव्हेंट नव्हता काय?'' 

गेल्या दोन महिन्यांत आमदार चंद्रकांत पाटील यांनी सर्वसामान्य, गोरगरिब जनतेला प्रचंड मदत केली आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात मास्क, सॅनिटायझर आणि जीवनावश्‍यक वस्तूंचे लाखो लोकांना वाटप करण्यात आले आहे. या उलट परप्रांतीयांना मदत करणाऱ्या पालक मंत्र्यांनी स्थानिक नागरिकांच्या गरजा, व्यथा-विवंचनासुद्धा जाणून घ्यायला हव्या होत्या. केवळ जिल्हाधिकारी कार्यालयात बसून, कोरोना नियंत्रणात येत नाही, असा टोलाही धनंजय महाडिक यांनी लगावला. 

परप्रांतियांच्या रेल्वे खर्चाचा तपशील जाहीर करा 

""मुंबई-पुण्यातून येणाऱ्या मूळच्या कोल्हापूरकरांना अडवले जात आहे. पण, मानवतेच्या भावनेतून आणि ज्यांच्या घरातले लोक अडकले आहेत, त्यांची तगमग लक्षात घ्यायला नको का? परप्रांतीय मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च राज्य सरकारच्या मार्फत करण्यात आला आहे. या शिवाय केंद्र सरकारनेही मुळात त्यासाठी सवलत दिली आहे. तरीही आपणच परप्रांतीयांच्या प्रवासाचा खर्च केला, असा आव आणणाऱ्यांनी रेल्वे खर्चाचा तपशील जनतेच्या माहितीसाठी एकदा जाहीर करावा,'' असे आव्हान माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना दिले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख