दाऊदच्या मुंबकेतील मालमत्तेचा लिलाव; किंमत ७० लाखांच्या घरात - Dawood's Propertied in Konkan will be auctioned | Politics Marathi News - Sarkarnama

दाऊदच्या मुंबकेतील मालमत्तेचा लिलाव; किंमत ७० लाखांच्या घरात

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम आहे. संपूर्ण पोलिस यंत्रणा त्याच्या मागावर आहे. मात्र अजूनही तो पोलिसांना चकवा देत आहे. त्यामुळे शासनाने फरार असलेल्या दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे

रत्नागिरी : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जिल्ह्यातील मुंबके (ता. खेड) येथील वडिलोपार्जित संपत्तीचा लिलाव करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. निश्‍चित केलेली किंसत सुमारे ७० लाखांच्या दरम्यान आहे. स्मगलर्स ऍण्ड फॉरेन एक्‍स्चेंज मॅनिप्युलेटर्स ऍक्‍ट (एसएएफईएमए) कायद्याअंतर्गत त्यांच्या एकूण ७ मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. यातील सहा मालमत्ता मुंबके येथील आहेत.

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम आहे. संपूर्ण पोलिस यंत्रणा त्याच्या मागावर आहे. मात्र अजूनही तो पोलिसांना चकवा देत आहे. त्यामुळे शासनाने फरार असलेल्या दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबके (ता. खेड) गावात वडिलोपार्जित संपत्ती आहे. दाऊदच्या मालमत्तेचा आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा लिलाव आहे. कोरोनाच्या महामारीमुळे दाऊदच्या संपत्तीची लिलाव प्रक्रिया लांबणीवर पडली होती; मात्र आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लिलाव होणार आहे. 

या संपत्तीच्या लिलावासाठी बोली लावणारे २ नोव्हेंबरला संपत्तीची पाहणी करू शकतात. त्यानंतर ६ नोव्हेंबरपर्यंत ४ वाजण्याच्याआधी सफेमाकडे संबंधितांना अर्ज करावा लागणार आहे. या अर्जासोबत डिपॉझिटदेखील जमा करावे लागणार आहे. यानंतर १० नोव्हेंबरला ई-लिलाव, टेंडर तसेच सार्वजनिक असे तिन्ही पद्धतीने या संपत्तीचा लिलाव केला जाणार आहे. १० नोव्हेंबरला ऑनलाइन करण्यात येणाऱ्या लिलावामध्ये मुंबकेतील सहा मालमत्तांचा समावेश आहे. सुमारे ७० लाखाची निश्‍चित किंमत असलेल्या या मालमत्तेला किती बोली लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मुंबकेतील सहा मालमत्ता अशा
२७ गुंठे जमीन -----२ लाख ५ हजार
२९.३० गुंठे जमीन--- २ लाख २३ हजार
२४.५० गुंठे जमीन---१ लाख ८९ हजार
२० गुंठे जमीन ----- १ लाख ५२ हजार
१८ गुंठे जमीन ---१ लाख ३८ हजार
२७ गुंठे जमिनीसह एक घर ---६१ लाख ४८ हजार
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख