शेतकऱ्यांसमोर यक्षप्रश्‍न; विविध कारणे सांगून सीसीआयकडून नाकारला जातो कापूस - Cotton is rejected by the CCI for various reasons | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यांसमोर यक्षप्रश्‍न; विविध कारणे सांगून सीसीआयकडून नाकारला जातो कापूस

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 11 मे 2020

सीसीआय व नाफेड सध्या शेतमालाची खरेदी करीत आहे. यांना ए ग्रेडचाच माल लागतो. त्यामुळे इतर मालाचे काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

राळेगाव (जि. यवतमाळ) : सरकारच्या एजन्सी असलेल्या सीसीआय व नाफेड सध्या शेतमालाची खरेदी करीत आहे. यांना ए ग्रेडचाच माल लागतो. त्यामुळे इतर मालाचे काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

सीसीआय सद्यस्थितीत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करीत आहे. पण त्यांना ए ग्रेडचाच एफ ए क्‍यू कापूस हवा आहे. शेतकऱ्यांकडे सगळाच कापूस ए ग्रेडचा कसा राहील, अनेकवेळा कापूस वेचताना पाऊस येतो. त्यामुळे कापूस ओला होतो. यावेळी पाऊस जास्त झाल्याने शेतकऱ्यांचे काही वेचे ओले झाले.

शेतकरी तो कापूस सुकत घालतो. पण काही प्रमाणात तो कापूस खराब होतो. या शिवाय इतके दिवस कापसाची गंजी लावून ठेवायची. त्यामुळेही काही कापूस खराब होते. तसेच शेवटचा कापसाची ग्रेड पहिले निघालेल्या कापसासारखी नसते. 

कापूस वेचण्यासाठी अनेक स्त्री मजूर लावावे लागतात. प्रत्येक मजूर सारखा कापूस वेचत नाही. शेतकऱ्यांकडे इतक्‍या प्रकारचा कापूस ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था नसते. एकाच ठिकाणी त्याला हा कापूस ठेवावा लागतो.

जेव्हा शेतकरी कापूस विकण्यासाठी नेतो तेव्हा त्याला हा कापूस बरोबर नाही, कापूस हिट झाला, कापसात पत्ती आहे, ओलावा आहे, शेवटचा कापूस आहे, असे म्हणून त्याच्या कापसाला नाकारले जाते.

यावर्षी खासगीमध्ये कापसाचे भाव अतिशय कमी आहेत. त्यामुळे शेतकरी सीसीआयला कापूस देतो. पण सीसीआयला केवळ चांगलाच कापूस पाहिजे. थोडी जरी कापसाची प्रत कमीजास्त असली तरी सीसीआय कापूस नाकारतो किंवा खूप कमी ग्रेड लावतो.

अशावेळी सीसीआयने शेतकऱ्यांचा सगळा कापूस चांगल्या भावात विकत घ्यायला हवा, सरकार - प्रशासनाने यात पुढाकार घेऊन सीसीआयमध्ये योग्य ग्रेड ठेवून शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस विकत घ्यायला हवा. 

सीसीआय सारखीच स्थिती नाफेडची आहे. नाफेड शेतकऱ्यांचा चना व तूर खरेदी करीत आहे. चना व तूर खरेदी करण्यापूर्वी नाफेड शेतकऱ्यांची तूर व चना चाळणीवर टाकतात. माल हाताने घोळल्या जातो. यामुळे मालातील डाळ बारीक माल खाली पडतो व केवळ चांगला माल नाफेड खरेदी करते. मालातील काडीकचरा नाफेड काढतेच.

साधारणतः 10 क्विंटल तुरीतील 25 किलो माल शेतकऱ्याला घरी परत न्यावा लागतो अनेकवेळा ज्या थ्रेशरने शेतकरी माल काढतात ते योग्य नसते, कधी वातावरणामुळे माल बारीक होतो. नाफेडणेसुद्धा मालातील काडीकचरा काढावा पण, चाळणी लावून माल घेणे म्हणजे शेतकऱ्यांचे नुकसान करणे होय.
 

धोरणात थोडी लवचिकता आणावी

सीसीआय व नाफेड या एजन्सी शेतकऱ्यांच्या हितासाठीच बनविण्यात आल्या आहेत. अडचणीच्या काळात याच संस्था आतापर्यंत शेतकऱ्यांना आधार देत आल्या. भविष्यातही देतील. या संस्था आहेत म्हणूनच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळत आहे. पण, माल घेण्याबाबत थोडे धोरण बदलल्यास या संस्था शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा देऊ शकतात, एवढे मात्र निश्‍चित.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख