लॉकडाउनचा परिणाम : सहकार क्षेत्र हैराण; कर्जमुक्ती थांबली, निवडणुका लांबल्या

कोरोना विषाणूचा संसर्ग महाराष्ट्रात येण्यापूर्वी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्या अजेंडावरील विषय म्हणजे शेतकरी कर्जमुक्ती योजना हा होता. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कर्जमुक्तीसाठी प्रयत्न करणारे जिल्हा प्रशासन आता कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर कामाला लागले आहे
Co-operative Sector Hampered by Corona Lock Down
Co-operative Sector Hampered by Corona Lock Down

सोलापूर  : सहकाराची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सहकारावर लॉकडाउनचा मोठा विपरीत परिणाम झाला आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे काम पूर्णपणे ठप्प झाले असून सोलापूर जिल्हा दूध संघ, सोलापूर जनता सहकारी बॅंक, सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखाना यासह महत्त्वाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुकाही लांबणीवर पडल्या आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग महाराष्ट्रात येण्यापूर्वी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्या अजेंडावरील विषय म्हणजे शेतकरी कर्जमुक्ती योजना हा होता. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कर्जमुक्तीसाठी प्रयत्न करणारे जिल्हा प्रशासन आता कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर कामाला लागले आहे. त्याचा परिणाम कर्जमुक्तीचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील ३८ हजार ८६ व इतर बॅंकेतील २५ हजार १४७ अशा ६३ हजार २३३ शेतकऱ्यांना ५६४ कोटी रुपये कर्जमुक्ती योजनेतून मिळाले आहेत. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात दोन लाखांपर्यंतच्या कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. 

दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील कर्जमुक्तीबाबत उत्सुकता

दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेले शेतकरी व नियमित कर्जफेड करणारे शेतकरी यांच्यासाठी राज्य सरकारकडून दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील योजना अपेक्षित होती. राज्य सरकारपुढे सध्या कोरोना हा एकमेव महत्त्वाचा विषय असल्याने कर्जमुक्तीच्या उर्वरित दोन टप्प्यांचे काय होणार? याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. लॉकडाउनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील योजनेचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. कर्जमुक्तीच्या योजनेमुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कर्जमुक्तीचे काम थांबले; परंतु कोरोनाला रोखण्याचे काम राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाला लागले आहे. त्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.

जिल्ह्याच्या अर्थकारणाला खीळ

सोलापूर जिल्ह्यात नागरी सहकारी तत्त्वावरील 35 बॅंका आहेत. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसह गावपातळीवरील साडेबाराशे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पतसंस्था या सर्वांचे कामकाज जवळपास ठप्प झाले आहे. कर्जवाटप आणि कर्ज भरणे ही प्रक्रियाही थांबली आहे. जिल्ह्यातील अंदाजे तीन ते चार लाख हेक्‍टर क्षेत्र खरिपाखाली येत असून खरिपासाठी शेतकऱ्यांना पतपुरवठा करणे व लॉकडाउनचे नियम पाळणे, अशी दुहेरी कसरत जिल्ह्यातील सोसायट्या व डीसीसी बॅंकेला करावी लागणार आहे. मार्चअखेर लॉकडाउनमध्ये गेल्याने कर्जवसुलीचे मोठे आव्हान जिल्ह्यातील नागरी बॅंक, पतसंस्थांसमोर उभे राहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com