सहकार मंत्र्यांच्या रडारवर चंद्रपूरची जिल्हा बॅंक - Chandrapur District Bank on Radar of Co operative Minister Balasaheb Thorat | Politics Marathi News - Sarkarnama

सहकार मंत्र्यांच्या रडारवर चंद्रपूरची जिल्हा बॅंक

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

बॅंकेला लागलेल्या या गैरव्यवहाराच्या वाळवीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे संचालकांसह अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

चंद्रपूर : तत्कालीन अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांनी केलेल्या खरेदी आणि नोकर भरती घोटाळ्यातून जिल्हा मध्यवर्ती बॅंक सावरण्याआधीच नवे अध्यक्ष संतोष रावत यांच्याही कार्यकाळातील कोट्यवधी रुपयांचा अपहाराने खळबळ उडाली आहे. बॅंकेला लागलेल्या या गैरव्यवहाराच्या वाळवीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे संचालकांसह अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

दरम्यान, मागील दोन दिवसांत दोन कोटी आठ लाख ५६ हजार रुपये गहाळ झाल्याच्या तक्रारी बॅंकेला प्राप्त झाल्या आहे. पुढील सात दिवस तक्रारी स्वीकारण्यात येणार आहे. त्यामुळे अफरातफरीचा आकडा पाच कोटींच्या घरात जाण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, बॅंकेने मंगळवारी (ता. १६) पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. कोणत्याही ग्राहकांची ठेवी बुडणार नाही, असे बॅंकेचे अध्यक्ष रावत यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शाखेतील रोखपाल निखिल घाटे यांनी ठेवीदारांच्या खात्यातील कोट्यवधींची रक्कम हडपली. ठेवीदारांना हादरवून टाकणाऱ्या या घोटाळ्याची माहिती स्थानिक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सहकारमंत्र्याच्या कानावर घातली. वारंवार बॅंकेत घोटाळे होत आहे. संचालक मंडळाची मुदत संपली आहे, हेसुद्धा लक्षात आणून दिले. त्यानंतर त्यांनी यासंदर्भातील दस्तऐवज पाटील यांनी मागाहून घेतले. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे, असे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

घाटे अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यांच्या कक्षातून महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहे. त्यांच्या दररोजच्या आर्थिक व्यवहाराची 'डायरी' पोलिसांच्या हाती लागली आहे. तो कुणाला रक्कम द्यायचा यातून समोर येणार आहे. त्यामुळे अनेक संचालक आणि अधिकारी धास्तावले आहेत. फरार घाटे याने बॅंकेच्या खात्यात वीस लाख रुपये जमा केले. आज दुसऱ्या दिवशी आणखी अकरा तक्रारी प्राप्त झाल्या. तक्रारीची एकूण संख्या ४० झाली असून दोन कोटी आठ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आठवडाभर तक्रारी घेणे सुरू राहणार आहे. त्यामुळे घोटाळ्यांचा आकडा पाच कोटीपर्यंत पोहोचू शकतो, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.

ठेवीदारांनी घाबरू नये- रावत
तक्रारकर्त्या सर्व ग्राहकांना त्यांच्या ठेवी परत मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांना घाबरू नये. बॅंकेतील कोणत्याही ठेवीदारांनी रक्कम काढली नाही. यात जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांना पत्रकार परिषदेत सांगितले. या घोटाळ्यात संचालकांचा हात असल्याची शक्‍यता मात्र त्यांनी फेटाळून लावली. महावितरणने सहा महिन्यांपूर्वी घाटे यांच्या संदर्भात अपहाराची तक्रार केली होती. ते पत्र आपल्यापर्यंत आले नाही. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी एम. व्ही. पोटे यांना स्पष्टीकरण मागितले आहे. बॅंकेने ग्राहकांच्या ठेवीच्या सुरक्षिततेसाठी बॅंकर्स इंडेमिटी इन्शुरन्स काढला आहे. त्यामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई रक्कम मिळण्याबाबत प्रयत्न सुरू आहे. बॅंकेच्या तपासणी पथकाकडून इतर शाखांची झाडाझडती सुरू आहे, असे रावत यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला संचालक शेखर धोटे, रवींद्र शिंदे, नंदा अल्लुरवार, संदीप गड्डमवार, डॉ. विजय देवतळे, नंदाताई अल्लुरवार आदी उपस्थित होते.

'त्या' संचालकांना खडसावले
बॅंकेला साध्या रोखपालाने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्यानंतर ठेवीदारांची चिंता करण्याऐवजी तक्राकर्त्यालाच चोर ठरविण्याचा प्रयत्न काही संचालकांकडून होत आहे. बॅंक ग्राहकांना व्यवहाराचे 'एसएमएस' पाठवितात. पासबुकावरील नोंदी तपासण्याचे काम ठेवीदारांचे असते. या घोटाळ्यात तक्रारकर्त्यांचा हलगर्जीपणा तेवढाच कारणीभूत असल्याची जुनीच रेकॉर्ड काही संचालकांनी वाजविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पत्रकारांनी त्यांना चांगलेच खडसावले. सर्व जबाबदारी ग्राहकांची. मग बॅंकेच्या विश्‍वासाचे काय. एवढी मोठी यंत्रणा कोणत्या कामाची असे विचारताच 'त्या' संचालकांची बोलती बंद झाली.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख