चिपळूण ते मुंबई प्रवासासाठी रुग्णवाहिकेचा दर तब्बल ३५ हजार...! - Ambulance Operators looting Patients Relatives | Politics Marathi News - Sarkarnama

चिपळूण ते मुंबई प्रवासासाठी रुग्णवाहिकेचा दर तब्बल ३५ हजार...!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

कोरोनाबाधित व संशयित रुग्णांच्या उपचाराच्या नावाखाली खासगी रुग्णालये लाखोंची लूट करीत असल्याचा बोलबाला सोशल मीडियावर सुरूच आहे. त्यातच रुग्णवाहिकाधारकांकडूनही लूटमार सुरू झाल्याच्या आरोपाची भर पडली आहे

चिपळूण : कोरोनाबाधित व संशयित रुग्णांच्या उपचाराच्या नावाखाली खासगी रुग्णालये लाखोंची लूट करीत असल्याचा बोलबाला सोशल मीडियावर सुरूच आहे. त्यातच रुग्णवाहिकाधारकांकडूनही लूटमार सुरू झाल्याच्या आरोपाची भर पडली आहे. तातडीने रुग्णवाहिका मिळवून देण्यासाठी काही कर्मचारीच एजंट बनले, अशी तक्रार शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

चिपळूण ते मुंबई प्रवासासाठी कार्डियाक रुग्णवाहिकेसाठी तब्बल ३५ हजार रुपये भाडे घेण्यात आले, तर भाड्यातील दहा हजार रुपये एजंट बनलेल्या कर्मचाऱ्याला देण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचाराची बिले अवास्तव येत असल्याच्या तक्रारी तालुकाप्रमुख शिंदे यांच्याकडे आल्या. अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत वैद्यकीय बिलांच्या लूटमारीची त्यांनी माहिती दिली होती. त्यानुसार खासगी रुग्णालयात उपचार बिलांची तपासणी करण्यासाठी नायब तहसीलदार तानाजी शेजाळ व अधीक्षक डॉ. सानप यांची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांकडून झाली. हे अधिकारी रुग्णालयात जाऊन तपासणी करत असतानाच रुग्णवाहिकेच्या अवास्तव भाडेसंदर्भात तक्रार पुढे आली आहे. त्यामुळे श्री. शिंदे यांनी कामथे रुग्णालयात भेट देऊन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय सानप, निवासी नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्याशी रुग्णवाहिकेसंदर्भात तक्रारीवर चर्चा केली.

यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, काही दिवसांपूर्वी कामथे रुग्णालयातून एका रुग्णाला मुंबईला हलवायचे होते. त्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिकेची गरज होती. एका कर्मचाऱ्यानेच रुग्णवाहिका मिळवून दिली. त्यावर चालकही त्यानेच मिळवून दिला; मात्र मुंबईला गेल्यावर रुग्णाच्या नातेवाइकाकडून चालकाने ३५ हजार रुपये घेतले. रुग्णवाहिकेच्या मालकाने २५ हजार रुपये भाडे मिळाल्याचे कबूल केले, तर उर्वरित दहा हजार रुपये एजंट कर्मचाऱ्याने घेतल्याचे स्पष्ट केले.

सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नाहीत. त्या उपलब्ध करून देण्यासाठी काही एजंटही निर्माण होत आहेत. चिपळूण ते कराडला जाण्यासाठी दहा हजार रुपये मोजावे लागतात. प्रशासनाने रुग्णवाहिकांचे दर जाहीर करावेत, अशी मागणी शिंदे यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख