आतातरी, मुख्यमंत्र्यांनी सूत्रे हाती घ्यावीत...!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनावर कोणतेही नियंत्रण राहिले नसून राज्याचा कारभार फक्त मुख्य सचिव एकहाती दामटत आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

मुंबई : कोरोनाचा सामना करताना केरळ राज्य अव्वल ठरत असतानाच सर्व बाबतीत एक नंबरचा टेंभा मिरविणाऱ्या राज्याची अवस्था दयनीय झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनावर कोणतेही नियंत्रण राहिले नसून राज्याचा कारभार फक्त मुख्य सचिव एकहाती दामटत असल्याने मंत्रालय प्रशासनातील अनुभवी आणि ज्येष्ठ आयएएस अधिकारी हवालदिल झाल्याचे चित्र आहे. 


बाहेरील देशातील प्रवासी भारतात आल्यावर सर्वप्रथम कोरोनाचे रुग्ण केरळ आणि महाराष्ट्रात आढळून आले. ही परिस्थिती केरळ राज्याने अतिशय यशस्वीपणे हाताळण्यात मुख्यमंत्री पिणाराई विजयन आणि आरोग्यमंत्री श्रीमती के. के. शैलजा यांनी महत्वाची भूमिका बजावली. यात त्यांनी प्रशासनाला सोबत घेतले असले तरी पूर्ण नियंत्रण मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्रयांचे होते, अशी माहिती एका प्रधान सचिवाने "सकाळ" ला दिली.

या तुलनेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनावर कोणतेही नियंत्रण राहिले नाही. पंतप्रधान यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्स असेल तेव्हाच ते वर्षा निवासस्थानी येतात आणि मंत्रालयाकडे फिरकत नाहीत, अशी भावना मंत्रालयातील प्रशासनात ऐकायला मिळत आहे. 

राज्यात कोरोनाचा आकडा 50 हजारांच्या घरात पोहोचला असताना उद्धव ठाकरे फक्त मुख्य सचिवांवर अवलंबून कारभार करत असल्याची चर्चा अन्य आयएएस अधिकार्यात आहे. कोरोनाचा सामना तीव्र असताना मुंबई महापालिका आयुक्त पदावरून प्रविणसिंह परदेशी यांना कुणाच्या सांगण्यावरून हटविण्यात आले, आणि आता नवीन आयुक्त असताना मुंबईची परिस्थिती समाधानकारक आहे का, असा सवाल मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकारी विचारत आहेत.

बँकांमध्ये फ्रॉड करणाऱ्या वाधवान यांना महाबळेश्वरला जाण्यासाठी प्रवासाचे पत्र देणाऱ्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्तां यांना कुणाच्या सांगण्यावरून क्लीन चिट देण्यात आली, असे अनेक प्रश्न आयएएस अधिकारी विचारत आहेत.

केरळ राज्याने कोरोनाचा सामना यशस्वीपणे केला असताना महाराष्ट्रातील सरकार काय करत आहे, अशी विचारणा अन्य राज्यातील आयएएस अधिकारी करत असल्याची माहिती प्रधान सचिव दर्जाच्या अधिकार्याने दिली. राज्याचा संपूर्ण कारभार मुख्य सचिव हाकत असल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांचे अस्तित्व कुठे दिसत नाही, असे हा अधिकारी म्हणाला.
 

शरद पवार यांच्याही मर्यादा

महाविकास आघाडी सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करत आहेत. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचा पवार यांना दांडगा अनुभव आहे, मग राज्यात ही परिस्थिती का, असा प्रश्न विचारला असता संबंधित आयएएस अधिकारी म्हणाला की, मार्गदर्शन करणे आणि स्वतःच्या  हातात यंत्रणा असणे या दोन्ही वेगळ्या बाबी आहेत. शरद पवार ठराविक मर्यादेपेक्षा जास्त हस्तक्षेप करू शकत नाहीत, त्यामुळे राज्याची परिस्थिती हालाखीची झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आतातरी राज्याची प्रशासकीय सूत्रे हातात घावीत, अशी अपेक्षा मंत्रालयातील अधिकारी व्यक्त करत आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com