पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे कालवश; मुख्यमंत्र्यांनी अर्पण केली श्रद्धांजली - Wrestler Shripati Khanchnale Passes Away | Politics Marathi News - Sarkarnama

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे कालवश; मुख्यमंत्र्यांनी अर्पण केली श्रद्धांजली

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 डिसेंबर 2020

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे (वय ८६ ) यांचे आज पहाटे निधन झाले. प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

कोल्हापूर : पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे (वय ८६ ) यांचे आज पहाटे निधन झाले. प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.

खंचनाळे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना शहरातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तेथे ते तीन दिवस उपचार घेत होते. प्रकृती नाजूक झाल्याने त्यांना महावीर महाविद्यालयाच्या परिसरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.

खंचनाळे मूळचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा येथील. त्यांनी १९५९ ला पंजाब केसरी बनाता सिंग याला पराभूत करत हिंदकेसरी गदा मिळवून कोल्हापूर जिल्ह्याचे नाव उज्वल केले. याच वर्षी त्यांनी कराड येथे आनंद शिरगावकर यांना दोन मिनिटांत अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. त्यांनी १९५८, १९६२ व १९६५ ला झालेल्या ऑल इंडिया चॅम्पियन स्पर्धाही जिंकल्या

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुंबई  कुस्ती ही लढवय्या महाराष्ट्राची शान आहे. मातीतल्या या खेळावर महाराष्ट्राचे नाव कोरले ते  पहिला हिंदकेसरी किताब पटकावून श्रीपती खंचनाळे यांनी. त्यांच्या निधनामुळे अनेक हिंदकेसरींचे आणि  होतकरू कुस्तीगीर पैलवानांचे वस्ताद  म्हणजे मार्गदर्शक छत्र हरपले आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात.... कुस्ती ही महाराष्ट्राची शान आणि मान आहे. महाराष्ट्राने कुस्तीला लोकाश्रय आणि राजाश्रय दिला. या कुस्तीवर महाराष्ट्राचे नाव कोरण्याची किमया ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांनी केली. देशातला  पहिला हिंदकेसरी किताब पटकावून त्यांनी महाराष्ट्राचा आणि कुस्तीचा गौरव उंचावणारी कामगिरी केली. ते आयुष्यभर कुस्तीत येणाऱ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करत राहीले. अनेक हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी यांच्यासह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्तीत नाव कमावलेल्या पैलवानांचे ते वस्ताद ठरले. काळानुसार या खेळातील बदलांकडेही त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले. त्यांना क्रिडाक्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील  क्रिडा क्षेत्रातील आणि विशेषतः कुस्तीच्या क्षेत्रातील मार्गदर्शक असे छत्र हरपले आहे. ज्येष्ठ कुस्तीपटू हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख