"The system will not work unless the Chief Minister takes to the streets. | Sarkarnama

''मुख्यमंत्री रस्त्यावर उतरल्याशिवाय यंत्रणा हलणार नाही..''

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 मे 2020

महाराष्ट्रातील जनजीवन सुरळीत करण्यासाठी पन्नास हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करा.

कोल्हापूर : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मातोश्रीवर बसून लोकांच्या समस्या कळणार नाहीत, ते स्वत: आणि त्यांचे मंत्रीमंडळ रस्त्यावर उतरल्याशिवाय यंत्रणा हलणार नाही, त्यांना मुख्यमंत्र्याचे वर्षा निवासस्थान आवडत नसेल तर त्यांनी तर्षा काढावे, पण मुख्यमंत्री निवासस्थानातूनच आपला कारभार चालवावा, महाराष्ट्रातील जनजीवन सुरळीत करण्यासाठी पन्नास हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी माजी महसूलमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली. 

राज्यसरकार कोरोनावर मात करण्यासाठी अपयशी ठरले असल्याच्या निषेधार्थ भाजपाने आज 'मेरा अंगण, मेरा रणांगण' नावाचे आंदोलन केले. स्वत: दारात उभे राहूनच पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांनी हे आंदोलन केले. या आंदोलनानंतर चंद्रकांतदादा पाटील बोलत होते. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. राज्यातील 250 पोलिसांवर हल्ले झाले. 1400 पोलिसांना कोरोना झाला. 15 पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचे मृत्यू झाले आहेत. हे सर्व आम्ही म्हणत नाही. पण पोलिस आजारी पडला तरी त्याला रुग्णालयात दाखल करायला रुग्णवाहिकाही नाही. हे चित्र काही बरोबर नसल्याने आम्ही आंदोलनाच्या रुपाने काही विषय जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

कोरोना संकटात आम्ही गेल्या दोन महिन्यापासून राज्यसरकारला सहकार्य केले आहे, यापुढेही सहकार्य करत राहू. संकट खूप मोठे आहे. या संकटाशी सर्वांनी मिळून लढलं पाहिजे. पण सरकार आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडणार नसेल, काम करणार नसेल, तर हे काही बरोबर नाही. कोरोना संकटाच्या काळात महाराष्ट्राच्या सरकारने एक रुपयाचेही पॅकेज दिले नाही. रेशनवरचे धान्य ही केंद्र सरकारची योजना आहे. त्या माध्यमातून गहू आणि तांदूळ दिला जात आहे.

दुकानदाराचे कमिशन आणि रेशन ट्रान्सपोर्टचा खर्चही केंद्र सरकार देते. महाराष्ट्रातील हातावरचे पोट असणाऱ्या जनतेसाठी राज्य सरकाने आत्तापर्यंत एक रुपयाचेही पॅकेज दिले नाही. त्यामुळे आता त्यांनी महाराष्ट्रातील हे जनजीवन सुरळीत करण्यासाठी तातडीने पन्नास हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर कराव, रेशनवर धान्याप्रमाणेच किराणा मालही द्यावा, मास्क, सॅनेटायजरही द्यावे, अशा मागण्या करतानाच त्यांनी रिक्षावाला, भाजी विक्रेता, पेपर विक्रेता, मोलकरणी आणि हातावरचे पोट असणाऱ्या प्रत्येक घटकाच्या खात्यावर पैसे जमा करणे गरजेचे आहे.

मध्यमवर्गीयांना आर्थिक दिलासा देण्यासाठी त्यांच्या गृहकर्जाच्या, वाहनकर्जाच्या हप्त्यासाठी तीन महिने सवलत देण्याची घोषणा ज्याप्रमाणे केंद्र सरकारने केली, त्याचप्रमाणे यापुढच्या काळासाठी राज्यसरकारने योजना जाहीर करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. 

 

महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था पुर्णपणे कोलमडली आहे. ती नीट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर उतरावे लागेल. मातोश्रीवर बसून त्यांना हा कारभार करता येणार नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यासाठी असलेल्या वर्षा निवासस्थानामध्ये राहिले पाहिजे. त्यांना वर्षा आवडत नसेल तर त्यांनी तर्षा असे नाव करावे. पण त्यांनी राज्यकारभार रस्त्यावर उतरु केला पाहिजे. जीवावर उधार होऊन कारभार करा, असे आम्ही म्हणणार नाही. ते मोठे नेते आहेत. त्यांनी स्वत:ची काळजी घेउनच काम करावे, पण क्वारंटाइन राहून या आजारावर नियंत्रण ठेवता येणार नाही. मुख्यमंत्र्यापासून ते मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांच्यापर्यंत सर्वांनीच रस्त्यावर उतरले पाहिजे. ते अत्यावश्‍यक सेवेचा एक भागच आहेत. त्यांना पासचीही आवश्‍यकता नाही.

चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख