स्वाभिमानीच्या इशाऱ्याने साखर कारखानदारांत अस्वस्थता - Sugar Factories Upset over Stand taken by Raju Shetty | Politics Marathi News - Sarkarnama

स्वाभिमानीच्या इशाऱ्याने साखर कारखानदारांत अस्वस्थता

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या भागातून तोडणी कामगार आणून हंगाम सुरु करण्याच्या नियोजनाला आता धक्का बसला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्राबल्य जास्त असल्याने ऊसतोडणी सुरु केली तरी तोडफोडीची भिती कारखानदारांना असते. यामुळे जो पर्यंत निर्णय होत नाही तो पर्यत कारखानदार ऊसतोडणी पूर्ण क्षमतेने सुरु करत नसल्याचा आजवरचा अनुभव आहे

कोल्हापूर  : यंदाचा साखर हंगाम सुरु होण्यास काही दिवसांचाच कालावधी उरला असता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या इशाऱ्याने पुन्हा एकदा पश्‍चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारी अस्वस्थ बनली आहे. जो पर्यंत स्वाभिमानीची ऊस परिषद होत नाही तो पर्यंत कारखाने सुरु करु देणार नाही असा इशारा स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिल्याने आता कारखाना लवकर सुरु करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या कारखानदारांना धक्का बसला आहे. अगोदरच मजूर टंचाईमुळे हतबल असणाऱ्या कारखान्यांना स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे आणखी अडचणीत टाकले आहे.

यंदा कोरोनामुळे ऊस हंगामाचे चित्र बदलले आहे. यंदा ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने काही कारखान्यांना लवकर उसतोडीचे नियोजन केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या भागातून तोडणी कामगार आणून हंगाम सुरु करण्याच्या नियोजनाला आता धक्का बसला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्राबल्य जास्त असल्याने ऊसतोडणी सुरु केली तरी तोडफोडीची भिती कारखानदारांना असते. यामुळे जो पर्यंत निर्णय होत नाही तो पर्यत कारखानदार ऊसतोडणी पूर्ण क्षमतेने सुरु करत नसल्याचा आजवरचा अनुभव आहे. 

यंदा कोरोनामुळे ऊस परिषदही लांबणीवर गेली आहे. नोव्हेंबरमध्ये काही अटी शिथिल होतील या शक्‍यतेने स्वभिमानीने नोव्हेंबरमध्ये ऊस परिषद घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. दराचा निर्णय झाल्याशिवाय हंगाम सुरु करु देणार नाही अशी घोषणा केल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील हंगाम लवकर सुरु होण्याबाबत प्रश्‍नचिन्ह उभे ठाकले आहे. केंद्राने दोन महिन्यापूर्वी एफआरपीत शंभर रुपयांची वाढ केली असली तरी स्वाभिमानी शेतकरी संघटना या मागणीवर समाधानी नाही. यामुळे परिषदेत काय निर्णय होतो याबाबत अद्यापही साशंकता आहे. अगोदरच मजूर येण्यास टाळाटाळ करीत आहे. आता आंदोलनाची शक्‍यता असल्याने मजूर कधीा आणायचे ही चिंता असल्याचे कारखाना प्रतिनिधींनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख