याच कारणांमुळे राणेंच्या अटकेसाठी पोलिसांनी संगमेश्वर निवडले 

संगमेश्वरमध्ये पोलिस कारवाईत जेवढा वेळ गेला, तेवढा वेळ रत्नागिरीत गेला असता तर तेवढ्याच वेळात त्यांची सिंधुदुर्गमधील यंत्रणा रत्नागिरी दाखल झाली असती.
याच कारणांमुळे राणेंच्या अटकेसाठी पोलिसांनी संगमेश्वर निवडले 
So the police arrested Narayan Rane in Sangameshwar

चिपळूण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली. २३ ऑगस्टच्या रात्रीपासून अटकेच्या हालचाली सुरू होत्या. २४ ऑगस्टला संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथे राणेंना ताब्यात घेण्यात पोलिसांनी हुशारी दाखवली. चिपळूण अथवा रत्नागिरीत पोलिस कारवाई झाली असती तर पोलिसांवर मोठा ताण आला असता. (So the police arrested Narayan Rane in Sangameshwar)

राणेंना अटक करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्याची माहिती चिपळूण मुक्कामी राणेंना मिळाली होती. त्यामुळे आमदार नीतेश राणे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत होते. चिपळूणमधून जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली, तेव्हा माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याची मला माहिती नाही, अटक करण्यासाठी मी काय लहान माणूस आहे का? असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. परंतु त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडत असलेले पोलिस अधीक्षक मोहीतकुमार गर्ग यांनी, राणेंना संगमेश्वरपर्यंत नेऊन तेथेच कारवाईचा करेक्ट कार्यक्रम केला.

चिपळूण हे राजकीयदृष्ट्या नेहमीच संवेदनशील राहिलेले आहे. येथे भाजपपेक्षा शिवसेनेची ताकद जास्त आहे. राणेंना चिपळुणात अटक झाली असती तर शिवसेनेचे कार्यकर्ते अतिउत्साही झाले असते. चिपळूणमध्ये राणे यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे जनआशीर्वाद यात्रेत झालेल्या राड्यापेक्षाही मोठा राडा राणेंच्या अटकेनंतर चिपळुणात झाला असता. 

रत्नागिरीच्या न्यायालयाने राणेंना जामीन नाकारला. उच्च न्यायालयानेही तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला, तेव्हा राणेंनी चिपळूण सोडले होते. जामीन नाकारल्यानंतर राणे कुठेही न थांबता राणे थेट रत्नागिरीत दाखल झाले असते आणि संगमेश्वरमध्ये पोलिस कारवाईत जेवढा वेळ गेला, तेवढा वेळ रत्नागिरीत गेला असता तर तेवढ्याच वेळात त्यांची सिंधुदुर्गमधील यंत्रणा रत्नागिरी दाखल झाली असती. नंतर राणेंना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना मोठ्या बळाचा वापर करावा लागला असता. राणे समर्थकांच्या उद्रेकालाही सामोरे जावे लागले असते. हे सर्व टाळण्यासाठी पोलिसांनी संगमेश्वर तालुका निवडल्याची चर्चा आहे.

पोलिस बळासमोर कार्यकर्त्यांचा टिकाव लागला नाही...

संगमेश्वरपासून काही अंतरावरील गोळवलीत राणे पोचले. ही जागा महामार्गापासून काही अंतरावर आहे. ठराविक मोबाईल कंपन्यांचे येथे नेटवर्क आहे. धामणी येथे राणेंचे जोरदार स्वागत झाल्यावर पोलिसांचा कार्यक्रम सुरू झाला. भाजप कार्यकर्त्यांसमोर पोलिस राणेंना ताब्यात घेऊन महाडला घेऊन गेले. कार्यकर्त्यांनी विरोध केला; परंतु पोलिस बळासमोर त्यांचा टिकाव लागला नाही.


तर राणे स्वतः पोलिसांच्या गाडीत बसले असते

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी फार मोठा गुन्हा केलेला नाही. पोलिसांनी अटकेचे आदेश दाखवले असते, तर राणे स्वतः गाडीत बसले असते. परंतु पोलिसांनी त्यांना जेवणाच्या ताटावरून उटवले. पाच मिनिटांत राणेंना उचलण्यासाठी आमच्यावर दबाव आहे, असे पोलिस सांगत होते. तरीही राणे यांनी कायद्याचा आदर करत ते पोलिसांना शरण गेले, असे भाजप नेते प्रमोद जठार यांनी सांगितले. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचे वरिष्ठांकडून आदेश होते. अटकेची कारवाई सुरू असताना भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध झाला. पण काही गोष्टी संयमाने घ्याव्या लागतात. आम्हीही तेच केले.
- उदय झावरे, पोलिस निरीक्षक, संगमेश्वर पोलिस ठाणे

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in