`मी मुख्यमंत्र्यांना मॅनेज झालोय का? माझ्यावर छत्रपतींचे संस्कार!` - Sambhajiraje clears his stand on discussion with govt on Maratha Reservation | Politics Marathi News - Sarkarnama

`मी मुख्यमंत्र्यांना मॅनेज झालोय का? माझ्यावर छत्रपतींचे संस्कार!`

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 27 जून 2021

कोरोना काळात समाजाला रस्त्यावर आणायचे का, असा सवाल संभाजीराजे यांनी केला. 

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी केलेल्या मूक आंदोलनानंतर पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठकीसाठी जाण्याचा आग्रह केला. बैठकीतून समाजाच्या मागण्या होत असतील तर मी मॅनेज झालोय का? माझ्यावर छत्रपती घराण्याचे संस्कार आहे हे का विसरता, असा प्रश्न संभाजीराजे यांनी उपस्थित केला. 

मुख्यमंत्री ठाकरे आणि संभाजीराजे हे सध्या एकमेकांवर स्तुतीसुमने उधळत आहेत. त्यावरून संभाजीराजे हे महाविकास आघाडी सरकारशी सलोख्याने घेत असल्याचा आरोप होत आहे. त्या आरोपाला संभाजीराजे यांनी अप्रत्यक्षरित्या उत्तर दिले. तसेच कोरोनामुळे समाजाला पुन्हा रस्त्यावर आणण्याची वेळ आहे का, असा सवाल करत राज्य सरकारच्या हातातील मागण्या मान्य करून आधार देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मी तर केवळ समाजाचा शिपाईगडी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

ही बातमी वाचा : काहींना वाटेल मी संभाजीराजेंना पटवलयं...

संभाजीराजे यांनी शासनाशी चर्चा करून मागण्या मान्य केल्याबद्दल सकल मराठा समाजातर्फे त्यांचे 
भवानी मंडप येथे आज स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. संभाजीराजे यांनी ओबीसींना धक्का न देता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे सांगत कोल्हापुरातील मूक आंदोलनानंतर शासनासमवेत झालेली बैठक, मान्य झालेल्या मागण्या व मूक आंदोलनामागील भूमिका मांडली. 

संभाजीराजे म्हणाले, "बहुजन समाजाची स्थिती जाणून घेण्यासाठी २००६ पासून मी महाराष्ट्राचा दौरा सुरु केला. विशेषतः मराठवाड्यात जातीय विषमता पाहायला मिळाली. बहुजन समाजाला न्याय देण्याची भूमिका स्वीकारून माझा लढा सुरू झाला. मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी रस्त्यावर उतरलो. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर त्यावरील पर्यायांवर कोणी बोलले नाही आरक्षणासाठी सर्वांना एकत्रित घेऊन जाण्यात मला कोणाचीही अडचण नाही. 
माझी भूमिका जी २००७ला होती, तीच आजही आहे."

माजी महापौर आर. के. पोवार यांनी संभाजीराजे यांचे नेतृत्व मान्य करा, असे आवाहन केले. 
कमलाकर जगदाळे यांनी मराठा समाज संभाजीराजे यांच्या सोबत असल्याची ग्वाही दिली. धनंजय जाधव यांनी शासनासमवेत झालेल्या बैठकीची माहिती दिली.

ठोक मोर्चा काढण्याचा लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे. मी लोकशाहीचा पाईक आहे.  
छत्रपती घराण्याचे माझ्यावर संस्कार आहेत. कोणी आंदोलन केले म्हणून बघून घेण्याची माझी भाषा असणार नाही, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख