पोलिस म्हणाले, डोक्याला त्रास नको! : आमदार नितेश राणे आणि वैभव नाईक दोघांवरही गुन्हा!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलेले..
पोलिस म्हणाले, डोक्याला त्रास नको! :  आमदार नितेश राणे आणि वैभव नाईक दोघांवरही गुन्हा!
Nitesh Rane-Vaibhav Naik

कणकवली : भाजपच्या जनआशीर्वाद यात्रा (Janashirwad Yatra) आणि मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात झालेला जमाव तसेच शिवसेना कार्यालयातील कार्यकर्त्यांची रात्री उशिरापर्यंत असलेल्या गर्दीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन झाले. बेकादेशीर जमाव करून रात्री आठ ते अकरा यावेळीत आक्षेपार्ह घोषणाबाजी दिल्याप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) तसेच विरोधी भाजपचे आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांच्यासह दोन्ही पक्षाच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांवर येथील पोलिस ठाण्यात आज गुन्हे दाखल करण्यात आले. काल रात्री उशिरा सहायक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे आणि पोलिस उपनिरिक्षक अनमोल रावराणे यांनी फिर्याद दिली.

राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात शुक्रवारी सायंकाळी दाखल झाली. खारेपाटण, तळेरे, वैभववाडी, फोंडाघाटमार्गे यात्रा कणकवलीत रात्री उशीरा आली. जिल्ह्यात साथरोग नियंत्रण प्रतिबंधात्मक कलम लागू आहे. रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत जमावबंदीचा आदेश आहे. त्याचवेळी जिल्ह्याधिकाऱ्यांनी ७ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू केला आहे. त्चे उल्लंघन भाजप आणि शिवसेनेच्या नेते तथा कार्यकर्त्याकडून झाल्याचा पोलिसांनी फिर्यादीत म्हटले आहे.

उपनिरीक्षक रावराणे यांच्या फिर्यादीनुसार शिवसेनेच्या आमदार वैभव नाईक यांच्यासह जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, नगरसेवक कन्हैया पारकर, राजू राठोड, शैलेश भोगले, हर्षद गावडे, संजय आग्रे, रिमेश चव्हाण, भूषण परूळेकर, सचिन सावंत, भाई कासवकर, प्रसाद आडावकर, यतीन खोत, बबन शिंदे यांच्यासह पंधरा ते वीस जणांवर गुन्हे दाखल आहेत.

निरीक्षक खंडागळे यांच्या फिर्यादीनुसार आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, सभापती मनोज रावराणे, कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, शहरप्रमुख सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे, संदेश उर्फ गोट्या सावंत, संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री, राकेश परब, बबलू सावंत, बाळा जठार, राजन चिके यांच्यासह ४० ते ४५ जणांवर गुन्हे दाखल आहेत. या सर्वांवर बेकादेशीर जमाव करून रात्री आठ ते अकरा यावेळीत आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याचा आक्षेप आहे.

भाजपच्या वैभववाडी तालुकाध्यक्षांवरही गुन्हा
वैभववाडी वैभववाडीत जनआर्शिवाद यात्रेचे आयोजन केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपाचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांच्यावर जमावबंदी आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला. आयोजनात सहभागी असलेल्या आणखी २० ते २५ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या यात्रेचे वैभववाडीत तालुका भाजपतर्फे आयोजन केले होते. रात्री साडेच्या सुमारास यात्रा वैभववाडीत आली. संभाजी चौकात श्री. राणे आणि आमदार आशिष शेलार यांनी जनतेशी संवाद साधला. जिल्हयात १४४ कलम लागु आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने गर्दी नको, असा शासनाचा निर्णय आहे. तरीही काझी आणि सहकाऱ्‍यांनी यात्रेचे आयोजन केल्याबद्दल पोलिसांनी काझी यांच्याविरोधात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि जमावबंदी कायद्यातर्गंत गुन्हा दाखल केला आहे. आयोजनात आणखी कोण सहभागी होते, याची खातरजमा करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येतील, असे पोलिसांनी सांगितले.

भाजपाच्या यात्रा आयोजकांवर गुन्हा दाखल

जमावबंदी आणि कोरोना काळात शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरात नुकत्याच झालेल्या जन आशीर्वाद यात्रेतील भाजपच्या संयोजक, आयोजकांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरवात झाल्यानंतर रत्नागिरी दौऱ्यात त्यांचे ढोल ताशांच्या गजरात मारुती मंदिर येथे त्यांचे स्वागत करण्यात आले होते. जमावबंदी व कोरोना संसर्ग असतानाही या कार्यक्रमात गर्दी पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी गर्दी केली होती. या वेळी गर्दींचा फायदा घेऊन चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याच्या घटना घडली होती. या जन आशीर्वाद यात्रेत जमावबंदी आदेश देण्यात आले होते. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यामुळे भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, संकेत बावकर, प्रफुल्ल पिसे अशा चार जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in